News Flash

खेळायन : साप-शिडी

सापशिडीचा खेळ मस्त रंगात आला होता. खेळाबरोबरच दोघांच्या गप्पाही रंगत होत्या.

हेरंब आणि हर्षल म्हणजे एकदम अॅक्टिव्ह भावंडं! शाळा, अभ्यास, खेळ हे सगळं करता करता कधीतरी सुट्टी मिळाली आणि घरी असले तरी दोघांचे सतत काहीतरी उद्योग सुरू असायचे. एकदा रविवारी दुपारी दोघेही घरी होते. ‘अजिबात दंगा करायचा नाही,’ असं घरातल्या मोठय़ांनी बजावलेलं होतं. त्यामुळे आवाज न करता काय खेळता येईल याचा विचार हेरंब करत असताना त्याला अचानक सापशिडीची आठवण झाली. खेळण्यांच्या खणातला सापशिडीचा खोका बाहेर काढत त्याने हर्षूला खाली बसायला सांगितलं. रंगीत सोंगटय़ा, खेळायचे फासे, सापशिडीचा पट असं सगळं खोक्यातून बाहेर काढून हेरंबने नीट मांडलं. ‘मला लाल सोंगटी हवीय!’ हर्षू जवळजवळ ओरडलाच होता. हेरंबने तोंडावर बोट ठेवत त्याला ‘शूऽऽ’ केलं आणि लाल सोंगटी त्याच्याकडे दिली. स्वत:ची निळी सोंगटी पटावरच्या सुरुवातीच्या घरात ठेवत त्याने पहिला डाव खेळण्यासाठी समजूतदारपणे फासा हर्षूच्या हातात दिला.
सापशिडीचा खेळ मस्त रंगात आला होता. खेळाबरोबरच दोघांच्या गप्पाही रंगत होत्या. पहिल्यांदा सापशिडीचा खेळ कुणी खेळला असेल, कधी खेळला असेल, कुठल्या देशात हा खेळ तयार झाला असेल, खेळ ज्या कुणी तयार केला असेल त्याला त्यात साप आणि शिडी असावी असं का वाटलं असेल, असे अनेक प्रश्न दोघांच्या बोलण्यातून समोर येत होते. आई-बाबांना हे सगळं ऐकून एक मस्त कल्पना सुचली. ‘‘आम्ही जसं ऑफिसमध्ये एखाद्या विषयावरचं प्रेझेंटेशन देतो तसं ‘सापशिडी’ या विषयावरचं प्रेझेंटेशन पुढच्या रविवापर्यंत तुम्ही दोघे मिळून कराल का?’’ असं त्यांनी हेरंब आणि हर्षूला विचारलं आणि दोघांनीही आनंदाने ‘हो’ म्हटलं!
शाळेतल्या शिक्षकांशी बोलून, पुस्तकं वाचून, थोडी इंटरनेटची मदत घेऊन आठवडाभरात दोघांनीही सापशिडीविषयी बरीच माहिती गोळा केली. जुन्याकाळच्या सापशिडीची चित्रं इंटरनेटवर बघून तसे एक-दोन पट स्वत: चित्र काढून तयारही केले. अखेर प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला. आजी-आजोबा, आई-बाबा उत्सुकतेने समोर येऊन बसले आणि दोघांनीही उत्साहाने माहिती द्यायला सुरुवात केली.
हेरंब म्हणाला, ‘‘सापशिडी हा खूप जुन्या काळातला भारतीय खेळ आहे. त्याकाळी या खेळाला ‘मोक्षपट’ असंही म्हटलं जायचं. सापशिडी तेव्हाच्या काळी मनोरंजनासाठी खेळली जायचीच, पण थोडा वेगळा दृष्टिकोनही या खेळात होता. तो कोणता, ते मी सांगण्याआधी हर्षू तुम्हाला चित्रं दाखवील.’’ हेरंबने असं म्हटल्यावर हर्षलने जुन्याकाळातली सापशिडी असलेली चित्रं दाखवली आणि हातातल्या पट्टीने चित्रातला एक-एक भाग दाखवत सांगायला लागला.
‘‘पूर्वीच्या काळी सापशिडीच्या पटाच्या बाहेर ही अशी खूप चित्रं काढलेली असायची. देव-देवता, देवदूत, प्राणी, माणसं, पानं-फुलं अशी चित्रं सापशिडीच्या आजूबाजूला असत.’’
हर्षलचं बोलणं संपल्यावर हेरंब पुढे म्हणाला, ‘‘सापशिडी खेळण्यामागचा एक वेगळा दृष्टिकोन मी मगाशी सांगणार होतो. पूर्वी सापशिडीचा वापर नैतिकतेचे धडे देण्यासाठीही होत असायचा. म्हणजे आयुष्य हा सापशिडीचा पट आहे, असं मानून हाव, क्रोध, मत्सर, अभिलाषा असे साप आणि सत्कर्म, सदाचार, परोपकार अशा शिडय़ा त्यात डिझाइन केलेल्या असत. चांगलं वागणाऱ्या माणसांना मोक्ष मिळतो आणि वाईट वागणाऱ्या माणसांना सापाच्या तोंडातून खाली येऊन पुनर्जन्म घ्यावा लागतो, अशी काहीशी त्याकाळच्या सापशिडीची शिकवण होती.’’
हेरंब जरा मोठा असल्याने हे सगळं समजून घेऊन बोलत होता. हर्षूला ते मोक्षबिक्ष फारसं समजत नसलं तरी आठवडाभरात दादाकडून ऐकून त्याला त्या संकल्पना माहितीच्या झाल्या होत्या.
‘‘ब्रिटिशांच्या काळात सापशिडीचा खेळ इंग्लंडमध्ये गेला आणि त्यांनी त्यांच्या संस्कृतीतली प्रतीकं वापरून सापशिडीचं थोडं वेगळं रूप तयार केलं. वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या संस्कृतीतली प्रतीकं सापशिडीमध्ये वापरली गेली.’’ हे सगळं हर्षू एका दमात बोलला.
हेरंब त्याच्याकडे कौतुकाने पाहत पुढे सांगू लागला, ‘‘नंतरच्या काळात मात्र नैतिकतेचे धडे वगळून फक्त साप आणि शिडय़ा असलेले पट दुकानात मिळायला लागले. काही काही देशांमध्ये तर शाळेतल्या मुलांना अंक मोजणं आणि इंग्लिश शब्द शिकवण्यासाठीसुद्धा सापशिडीचा वापर केला जातो. सापशिडी खेळताना अनेकदा पटावर पुढे जाऊन पुन्हा मागे यावं लागतं, त्यामुळे ‘बॅक टू स्क्वेअर वन’ असा शब्दप्रयोगही सापशिडीमुळे रूढ झाला असं म्हटलं जातं.’’
हेरंब आणि हर्षूचं प्रेझेंटेशन संपल्यावर सगळ्यांनी कौतुकाने टाळ्या वाजवल्या. आजी-आजोबा जरा विश्रांती घ्यायला आतल्या खोलीत गेले आणि हेरंब-हर्षल आई-बाबांबरोबर सापशिडी खेळत बसले!
n anjalicoolkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 1:01 am

Web Title: snake and ladder
Next Stories
1 गंमत विज्ञान : फुग्याची जादू
2 डोकॅलिटी
3 मराठी तितुकी वाढवावी..
Just Now!
X