सोनम वांगचुक यांना रेमोन मॅगसेसे पुरस्कार मिळाल्याचं तुम्ही ऐकलं असेल. ‘थ्री इडियट्स’मधला रँचो आठवतो ना? तो शिकवताना आणि जे संशोधन करताना दिसतो, वांगचुक तेच काम गेली कित्येक र्वष लडाखमध्ये करत आहेत.

लडाख हा आपल्या देशाच्या उत्तरेकडचा उंचीवरचा दुर्गम प्रदेश. पाऊस अत्यंत कमी असल्याने रखरखाटच जास्त. मार्चला पर्वतांवरच्या हिमनद्या वितळायला लागल्या की तिथे छान झरे दिसतात. पण त्यातलं पाणी वाहून जातं आणि पुढे एप्रिल-मेमध्ये पाण्याची टंचाई भासायला लागते.

वांगचुक हे सगळं पाहत होते. त्यांना सुचलं, की झऱ्यांना पाणी असेल तेव्हा ते बर्फरूपात साठवायचं, मग ते वितळून पाणी मिळेल.

कल्पना एकदम मस्त होती. वांगचुकनी मग विज्ञानातल्या तीन साध्या संकल्पना घेतल्या. झऱ्याचं पाणी गुरुत्वाकर्षणाने उंचीवरून खाली येतं, ही एक. ते पाणी उभ्या बारीक पाइपमधून कारंज्यासारखं उडतं, ही दुसरी. आणि कमी तापमानात हे तुषार गोठून जातात, ही तिसरी. छोटय़ा पाइपपासून सुरुवात करून पाइपची उंची वाढवत गेलं की या गोठणाऱ्या पाण्याचे एकावर एक थर जमा होतात. त्यातून एक उंच मनोरा उभा राहतो- तोच हिमस्तूप!

लडाखमधल्या फ्यांग गावात जवळजवळ १६ मीटर उंचीचा- म्हणजे पाच मजली इमारतीएवढा हा स्तूप आहे. तो शंकूच्या आकाराचा असल्याने सावकाश वितळतो. त्यामुळे पूर्ण उन्हाळाभर त्याचं पाणी आजूबाजूच्या लोकांना पुरतं. कोणताही पंप किंवा इतर यंत्र न वापरल्यामुळे हिमस्तूप पर्यावरणस्नेही आहे. शिवाय केवळ पाइप घालण्याचा खर्च असल्याने गावोगावी असे स्तूप सहज उभारता येतील. हिमालयातील बर्फाचा साठा झपाटय़ाने कमी होत असल्याने तर त्याचं महत्त्व जास्त आहे.

लडाखमध्ये जागोजागी आढळणाऱ्या स्तूपाला वांगचुकनी सोप्या विज्ञानाची जोड दिली, हे विशेष. या कामगिरीला २०१६ मध्ये रोलेक्स अवॉर्ड मिळालं आहे, तर आता वांगचुकना रेमोन मॅगसेसे पुरस्कार! आपल्या स्थानिक अडचणींवर असा साधा-सोपा उपाय शोधणारे हे भारतीय संशोधक पाहून खास अभिमान वाटतो.

meghashri@gmail.com