|| श्रीनिवास बालकृष्णन

कुठल्याही वयातल्या माणसांना गोष्ट ऐकायला आवडत असते. गोष्टी ऐकताना-वाचताना आपल्या मनात एकेक चित्र तयार होत असतं. ‘एका निळ्या तलावात एक बेडूक राहत होता..’ असं म्हणायचा अवकाश, की लागलीच तुमच्या मनात निळा तलाव व हिरवा बेडूक येतो. आपण मनात चित्र आणल्याशिवाय त्या गोष्टीचा आनंद घेऊच शकत नाही. हे जरी खरं असलं तरी भारतात एकेकाळी आजही चित्र काढून त्यानुसार गोष्ट-कथा सांगण्याची परंपरा आहे. म्हणजे तुमच्या पुस्तकात असते तशी लिखित गोष्ट नसतेच. पण खूप चित्रं असतात. आपल्या भारतात गोष्ट सांगण्या-ऐकण्याच्या अजब तऱ्हा आहेत. आज मात्र आपण अशाच एका चित्रावरून गोष्ट लिहूयात. गोष्ट तुमच्या मनातली पाहिजे. कुठेही ऐकलेली-वाचलेली नको. अट एकच- तुमच्या शब्दांत तुमची कल्पना असूदेत.

उदाहरणार्थ, इथं छापलेल्या चित्रातील पहिल्या चौकटीबद्दल (फ्रेम) गोष्ट कशी बनेल, तर- कोकणातल्या गावात राहणाऱ्या चंदा, कुंदा, मंदा अशा तीन जिवलग मैत्रिणी शाळा संपवून उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईदर्शन करायला आल्या. त्यांनी मुंबई कधीच पाहिली नव्हती, फक्त ऐकली होती. मुंबईतही त्यांना रेल्वेगाडीत बसण्याची जाम इच्छा होती. जेव्हा चंदाने पहिल्यांदा रेल्वे समोरून पाहिली तेव्हा तिला ती मोठय़ा तोंडाची राक्षसीण वाटली. पण मंदाला तोच चेहरा मोठय़ा बोक्याचा वाटला. कुंदाला मात्र गर्दीमुळे रेल्वे समोरून कशी दिसते हे पाहताच आले नाही..  अशा प्रकारे विनोदी, गंभीर, वैज्ञानिक अशा भन्नाट गोष्टी तयार करा आणि आम्हाला पाठवा. चला, लिहा गोष्ट बिनधास्त!

chitrapatang@gmail.com