‘‘अरे वीर, आटप लवकर शाळेची बस येणार आहे.’’ वीरच्या आईचा हा जप सकाळपासून चार वेळा म्हणून झाला होता. पण वीरची स्वारी आटपायला टंगळमंगळ करीत होती.
‘‘आई पोटात दुखतय गं, असं आतून नं गुडगुडतंय. प्लीज आज शाळेत जात नाही न मी.’’  bal07वीरची आईला विनवणी.
‘‘अरे, गेल्या आठवडय़ातही याच कारणाने शाळा बुडली तुझी. या शनिवारी चूर्ण देते तुला. तरीसुद्धा नाही बरं वाटलं तर मग डॉक्टरकाकांकडे जाऊ. आता हा ओव्याचा अर्क घे आणि अंघोळीला पळ. मलाही ऑफिसला उशीर होतोय.’’- इति आई.
अखेर आपली पोटदुखी अनेक प्रकारांनी पटवल्यावर आई-बाबांनी त्याला घरी राहायची परवानगी दिली आणि आजोबांना वीरच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास सांगून दोघे ऑफिसला गेले.
गेल्या आठवडय़ापासून पोटदुखीची तक्रार करणाऱ्या वीरकडे पाहून आजोबांच्या लक्षात आले होते, की शाळेची बस निघून गेल्यावर पोटदुखीने त्रासलेला वीर नॉर्मल वागत असे. आजही दोघांनी गप्पा मारत सकाळचे सर्व आटपले. दुपारी हसत-खेळत जेवले. थोडा वेळ अभ्यास करून वीरने मग आजोबांच्या परवानगीने कम्प्युटरवर गेम्स खेळायला सुरुवात केली. आजोबांना त्याच्या चेहऱ्यावर पोटदुखीचे कोणतेच भाव दिसले नाहीत. संध्याकाळी चहा पिताना ‘‘काय वीरोबा, पोटदुखी थांबली का तुझी?’’ असे आजोबांनी विचारल्यावर तो क्षणभर गोंधळलाच. आणि मग सावरून म्हणाला, ‘‘हो, औषध घेतल्यावर थांबलीच की!’’
पुन्हा शुक्रवारी या पोटदुखी प्रकरणाची मायलेकांच्या संवादाची पुनरावृत्ती झाली. ‘‘हे सर्व ना तुझ्या अरबट-चरबट खाण्याने होत असणार, उद्याच्या उद्या डॉक्टरकाकांकडे जाऊया आपण.’’  या वेळी आईचा सूर थोडा काळजीचा होता. आजोबांना औषधाच्या सूचना देऊन ते दोघे बाहेर पडले आणि वीर त्याच्या अंथरुणातून बाहेर पडला.
आजोबांचे आज वीरकडे बारकाईने लक्ष होते. नाश्ता करताना त्याच्याकडे रोखून पाहात विचारले, ‘‘बाळा, खरंच तुझे पोट दुखते की शाळेत न जाण्यासाठी ही सबब सांगतोयस? मला खरंखरं सांग पाहू. वाटल्यास मी तुला काही मदत करीन.’’ आजोबांच्या या बोलण्यावर वीर म्हणाला, ‘‘आजोबा, बुधवारी आणि शुक्रवारी आमचे पी.टी.चे तास असतात. आम्हाला मैदानात नेऊन टीचर खूप व्यायाम करायला सांगतात, मला खूप थकायला होतं.’’ वीरने सर्व खुलासा केला. प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवून आजोबा म्हणाले, ‘‘हे ऐकून नं मला लोकमान्य टिळकांची तुझ्यासारखेच विद्यार्थीदशेत असतानाची गोष्ट आठवली. तेसुद्धा खूप बुद्धिमान होते. पण शरीराने काहीसे अशक्त होते. एकदा त्यांनी मनाशी निश्चय केला, की यापुढे एकवेळ अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष करीन, पण  नियमित जोरबैठका, सूर्यनमस्कार वगैरे व्यायाम करून शरीर सुदृढ करीनच! टिळकांचाच निश्चय तो! मग काय विचारता? वर्षभरातच लोकमान्य त्यांच्या खऱ्या नावाप्रमाणे बळवंत झाले. त्यांच्या या सुदृढ प्रकृतीमुळेच स्वातंत्र्य लढय़ातील हालअपेष्टा ते सहन करू शकले. तूही अभ्यासात खूप हुशार आहेस. तुला चित्रकला उत्तम जमते. कम्प्युटर या वयात चांगला हाताळतोस, म्हणजेच तुझ्या मेंदूला, डोळ्यांना खूप व्यायाम होतो. पण पूर्ण शरीराला काहीच व्यायाम मिळत नाही. शाळेतून घरी आलास की तासन् तास टीव्हीवर कार्टून बघतोस, नाहीतर कम्प्युटरवरचे गेम्स खेळतोस. त्यापेक्षा मैदानावर जाऊन प्रत्यक्ष शरीराला व्यायाम मिळेल असे खेळ खेळायला जा की! सोसायटीत मित्रमंडळी नसली तर पोहायला जा. पळण्याचा व्यायाम कर. सायकलिंग कर. म्हणशील तर मी उद्यापासून तुला योगासने, सूर्यनमस्कार शिकवीन. तुझ्या शरीराची हालचाल करायची सवयच गेलीय. साधे आपल्या तिसऱ्या मजल्यावर यायलासुद्धा तुला या वयात लिफ्टची गरज भासते. कधी जिन्याने आलास तर धापा टाकतोस. अरे, आजकाल तुमच्या पिढीला शिक्षणासाठी, नोकरीसाठी किती धावपळ करावी लागते बघतोय न आम्ही. त्यासाठी बुद्धीबरोबरच शारीरिक ताकद नको का? नियमित व्यायाम करायचा. टिळकांसारखा निश्चय केलास तर तुझे शरीर काटक आणि कणखर होईल, मग पी.टी.च्या तासाला थकवा येणार नाही आणि दरवेळी पोटदुखीचे नाटक करून आई-बाबांशी खोटे बोलावे लागणार नाही. शिवाय, खूप मेहनत झाली की कडकडून भूकही लागेल; म्हणजे आपोआप भरपूर जेवशील. मग आईही खूश. पण हो.. सकाळी आई म्हणाली तसे रोजरोज ते नूडल्स, पिझ्झासारखे निकस पदार्थ न खाता छान घरगुती भाजीपोळी, कोशिंबिरीचा डबा संपवून यायचं बरं का!’’ आपले सांगणे वीरला पटतेय हे त्याच्या चेहऱ्यावरून आजोबांना कळले तेव्हा त्यांनी विचारले, ‘‘काय मग, कधीपासून सुरू करू या सूर्यनमस्कार?’’ त्यावर उत्साहाने वीर उत्तरला, ‘‘आजोबा आज न आपण मस्तपैकी मैदानाला दोन राउंड मारायला जाऊ  आणि उद्यापासून मी रोज तुमच्याबरोबर निदान ११ सूर्यनमस्कार तरी घालणारच! आणि टिळकांसारखेच माझेही वीर नाव सार्थ करणार.’’