19 October 2019

News Flash

टीपकागद

शाळेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लागली आणि ती पाहण्यासाठी खूप झुंबड उडाली.

|| मेघना जोशी

शाळेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लागली आणि ती पाहण्यासाठी खूप झुंबड उडाली. खरं तर हल्ली शाळेत खूप कमी वेळा असं व्हायचं की, नोटीस बोर्डपाशी मुलांचा गलका असायचा. शाळेतून आई-बाबांना जाणारे मेसेजेस, शाळेमध्ये भेटी देत आई-बाबांनी सतत मिळवलेली माहिती यामुळे मुलांना नोटीस पाहण्याची फारशी गरजच नसायची. पण आजची नोटीस सुट्टीशी संबंधित, पण सुट्टी जाहीर करणारी नव्हती. खूप रंगीबेरंगी, मस्त गुळगुळीत कागदावरची आणि सर्वाना सहज आकर्षति करून घेणारी अशी होती, म्हणूनच सगळे गोळा झाले होते नोटीस बोर्डपाशी. शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीमध्ये होणाऱ्या शिबिराची नोटीस होती ती. पण शिबिराची गंमत अशी होती की, त्या शिबिरात पहिल्या सत्रासाठी सर्वानी हजेरी लावायची होती आणि त्यानंतरची गंमत नंतर कळणार होती. काय असेल बरं हे? बरं, हे सगळं एकदम मोफत, त्यामुळे कोणी ते का बरं चुकवावं? एकंदर ती नोटीस पाहून अवघ्या विद्यार्थीवर्गात बरीच खळबळ माजली हे खरं आणि सर्वाची उत्सुकता तर ताणलीच गेली होती.

शिबिराचा दिवस उजाडला. जवळजवळ ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मुलं हजर होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ‘काय असणारे यात,’ असा असणारा भाव काही लपत नव्हता. खरं तर, काहींनी आपल्या आवडत्या शिक्षकांना वगैरे मस्का मारत बातमी काढण्याचा प्रयत्न केला होता, तर काहींनी चक्क आई-बाबांना मध्यस्थ करत कुठे काही सुगावा लागतोय ते पाहिलं होतं, पण व्यर्थ! दोन्हींचाही उपयोग झाला नव्हता. शाळेमध्ये कुणाला काहीच माहीत नव्हतं. शिबिरासाठी जे पाहुणे येणार होते त्यांनाच माहीत होतं म्हणे सारं! त्यामुळे उत्सुकता बरीच ताणली होती सर्वाची. फक्त विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांच्याही भुवया थोडय़ा उंचावलेल्याच होत्या. अगदी शिबिराच्या वेळीच मुख्याध्यापकांसोबत एक-दोन नाही तर चक्क सहा पाहुणे समोर येऊन बसले. बापरे, एवढे सगळेजण आपल्याला काहीबाही शिकवणार आहेत! कुणी या विचाराने आनंदित झाला, कुणी वैतागला, कुणी त्रस्त झाला, तर कुणी चिडला. पण समोर बसलेले सारे जण मात्र या सगळ्याची मजा लुटत होते असं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. मुख्याध्यापक भाषण करण्यासाठी उभे राहिले आणि परत सगळ्यांच्या माना आणि भुवया उत्सुकतेने आणखीनच उंचावल्या. पण सरांनी विशेष काही सांगितलंच नाही. ते म्हणाले, हे सारे पाहुणे आवर्जून आपल्या शाळेत आले त्याबद्दल त्यांचे आभार आणि तेच आत्ता तुमच्याशी बोलतील. उत्सुकता आता शिगेला पोहोचली होती. मधल्या काळात काही विद्यार्थ्यांनी काही पाहुण्यांबाबत अंदाज बांधला होता- ‘पण आमच्या छोटय़ाशा शाळेत हे मोठ्ठे लोक येणार असले तर जाहिरात नाही का करणार शाळा?  बरं, आत्ता तरी सरांनी सांगितलं असतं ना!’ त्यांच्याबद्दल असा मनात विचार करत ते गप्पच राहिले होते. इतक्यात पाहुण्यांमधले एक जण उठले आणि म्हणाले, ‘‘आम्ही सारे कोण आहोत हा विचार विसरा आणि आम्ही का आलो आहोत याबाबत बोलू या. आज आम्ही सारे टीपकागद तुमच्या भेटीला आलो आहोत. टीपकागद म्हणजे, प्रयोगशाळेत वापरतात तो!’’ परत साऱ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.

‘‘अरे हो, तोच प्रयोगशाळेतला टीपकागद. आम्हीही तसंच टिपतो काहीबाही. बघा हं, आत्ता आम्ही इथे आलोत, तर हे काका तुम्हाला काही गंमत दाखवतील,’’ असं म्हणताच ज्यांच्याकडे बोट दाखवलं त्या काकांनी समोर एक मोठ्ठं पॅड आणि पेन्सिल ओढली आणि काहीतरी करू लागले. थोडय़ा वेळाने हॉलमधल्या प्रोजेक्टरवर त्यांनी काय केलं ते दाखवलं जाऊ लागलं. तिथे बसलेल्या काही मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव अचूक दाखवत त्यांनी त्यांची चित्रं काढली होती. अजून एक मावशी स्वत:समोरच्या वहीत काहीतरी लिहीत होत्या. थोडय़ा वेळाने ती वही त्यांनी शेजारच्या दोन-तीन जणांकडे दिली आणि ते सगळे एक सुंदर नाटुकलं सादर करू लागले. आत्ता जर का मुलांना हवं तसं बोलायची आणि वागायची परवानगी दिली तर ते काय करतील, कसे वागतील, याचं सुंदर दृश्य होतं त्या नाटुकल्यात. हळूहळू आपल्या मनातलं यांनी कसं ओळखलं, याचं आश्चर्य आणि आपलं अचूक वर्णन कसं काय बुवा? या विचाराने हॉलमध्ये हास्याचे लोळ पसरू लागले. मुलं खूप मोकळी झाली. हे सगळं होतं न होतं तोच, दोन ताया समोर आल्या आणि मोकळ्या आवाजात छानसं गाणं गाऊ लागल्या.

‘‘काय बाई, आत्ता इथे करून हे घेतील

खेळायचा वेळ आमचा कित्ती पुढे नेतील,

घरी राहिलो असतो तर गेम्स खेळलो असतो,

नाहीतर आइस्क्रीम, चॉकलेट, आंबा चाखत तरी बसतो

थांब जरा, गडबड नको काय म्हणतात पाहू

आवडलं नाही तर उद्यापासून नकोच ना रे येऊ.’’

अनेक मुलांचा आ वासला होता. यातला कोणता ना कोणता विचार त्यांच्या मनात डोकावला होताच मघापासून.

आता परत ते मघाचेच काका उठून उभे राहिले. म्हणाले, ‘‘पाहिलं का? आम्ही सगळे टीपकागद कसे आहोत ते. आत्ता तुमच्या मनात काय चाललंय ते आम्ही अचूक टिपलं आणि आमच्या आमच्या पद्धतीने मांडलं. म्हणजे चित्र, शब्द, अभिनय, संगीत..’’ इतक्यात सर्वाचं लक्ष स्टेजच्या पाठीमागे गेलं. पाठीमागून एक काका आणि मावशी काही मातीची शिल्प घेऊन येत होती. काही मुलांची अचूक शिल्प पाहून सारा हॉल टाळ्यांनी दुमदुमून गेला. टाळ्या पूर्ण थांबल्यावर तेच काका परत बोलू लागले, ‘‘खरं तर आजचा दिवस हा या शिबिराचा पहिला आणि शेवटचा दिवस आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये असा टीपकागद आहे. आजपासून सुट्टीच्या दिवसांत तो शोधायचा आणि सुट्टी संपल्यावर शाळेच्या पहिल्या दिवशी चित्र, कथा, कविता, एकपात्री, शिल्प, नाटय़ किंवा इतर जे काही तुम्हाला आवडेल, जमेल त्या प्रकारांत इथे सादर करायचं आमच्यासमोर.’’

कोणत्याही औपचारिक सोहळ्याशिवाय समोरचं व्यासपीठ रिकामं झालं, पण हॉलमध्ये नि:शब्द शांतता पसरली होती, कारण सारे जण आपापला टीपकागद शोधत होते ना!

joshimeghana.23@gmail.com

संकल्पना साहाय्य- निलेश जाधव

First Published on April 28, 2019 3:02 am

Web Title: stories for kids 3