|| श्रीनिवास बाळकृष्णन

नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वत:कडे पाहून हसताय ना?

मागील लेखात आपण ‘जुळ्याच्या कार्टून’ या नावाखाली स्वत:चेच कार्टून काढले. ते पाहून हसायला आलंच असेल! कार्टूनचित्र पाहून आपण हसतो, कारण चित्रात काढलेला आकार हा ‘माणसा’चा असतो किंवा तो माणसाप्रमाणे काहीतरी भावना व्यक्त करतो. आज विविध भावनांना चित्रात आणण्याचा एक छोटा सराव करणार आहोत.

सुट्टीत हे ‘सराव’ वगरे शब्द ऐकून मेंदूत डराव डराव झालं असेल. पण इथं जमलेल्या माझ्या बंधू-भगिनींनो, कार्टून शिकायचं तर हे मस्तच आणि मस्टच आहे. त्याला पर्याय नाही.

हा सराव मुलींना एकदमच फ्री करता येईल तर मुलांना मात्र पसे लागतील.

चला तर मग, त्यासाठी प्रत्येकाने १०-१० रुपये काढा. म्हणजे १० रुपयाचं एक नाणं सोबत घ्या. आणि एक पेन्सिल किंवा काळ्या रंगाचा स्केचपेन!

मुलींनी मात्र हातातली बांगडी वापरली तरी चालेल. थोडा मोठा आकार होईल, इतकंच. थोडक्यात आपल्याला कागदावर नाणं व बांगडी ठेवून त्याआधारे खूप सारी वर्तुळं काढायची आहेत.

हे सोप्पय, आपण शाळेत पहिली-दुसरीलाच केलंय. आपल्यासारख्याच कुणा आळशी देवमाणसाने वर्तुळ काढायला हीच सर्वात सोपी व जलद पद्धत शोधली आहे.

तर अशी १०-१५-२०.. बसतील तितकी वर्तुळं एका कागदावर एकत्र काढून घ्या. खूपच आळशी असाल तर याच कागदाची २-३ फोटोकॉपी (झेरॉक्स) करून घ्या. किंवा असेच हाताने कष्ट करा. पण आपल्याला

३०- ५० – १०० अशी कितीही वर्तुळं चालणार आहेत.

चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रत्येक वर्तुळात २ काळे ठिपके द्या. लांब- लांब- जवळ- जवळ- तिरपे-  तारपे- वर- खाली- ठळक- पुसट- भरीव- पोकळ.. काहीही कसेही ठिपके काढले तरी चालतील. म्हणजे ठिपके चालणार नाही, तर आपल्या सरावचित्राला चालेल.

मात्र सर्व वर्तुळात दोनच ठिपके असतील. तीन नाही- अजिबात नाही. सर्व वर्तुळात ठिपके काढून झाल्यावर त्या एकेका वर्तुळाकडे नीट पहा. ते वर्तुळ म्हणजे डोकं तर दोन ठिपके म्हणजे आपले डोळे आहेत. आता आपल्याला त्या खाली केवळ ओठांच्या रेषा काढत भावना द्यायची आहे. सरळ पट्टीने काढल्यासारखी रेषा – , प्त,  सुलटा

कंस ), उलटा कंस ( , अर्धचंद्र , उलटा अर्धचंद्र  असे कसेही आकार!

हळूहळू त्यात दात, जीभही येऊ देत.

हं हं.. मला वाटलंच तुम्हाला आपल्या व्हाट्स अ‍ॅपवरचे ईमोजी आठवले असणार आणि काहींनी कॉपी करायला म्हणून व्हाट्स अ‍ॅप उघडलंदेखील असणार! ते पाहायला हरकत नाही पण शिकताना ‘व्हाट्स अ‍ॅप’चं असं रेडिमेड ईमोजी वापरणे लई मोठं पाप असतं.

हे वर्तुळ आता वर्तुळ राहिलेले नाहीत.. तर ती विविध भावना दर्शवणारी माणसं झाली आहेत आणि यात कान व नाकाला कमी महत्त्व आहे. त्यामुळेच या पहिल्या पानावरच्या सरावात त्याची इतकी गरज नाही.

दुसऱ्या कागदावर मात्र याच डोळ्यांवर भुवया देऊन पहा. चेहऱ्यावरील भावना अधिक स्पष्ट होईल. तरी ही सर्व माणसं केसविरहित आहेत. म्हणजे सफाछट टकली.

टक्कल नको असेल तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावर कागदावर त्यांना केसही काढू शकता. िझज्या, वेणी, टिकली, हनिसिंग कट, दाढी, मिश्या, टोपी, चष्मा वगरे काहीही! ते तुमची चित्र अधिक मजेदार करतील, पण चेहऱ्याच्या चित्रात खरी गंमत आणतात ते डोळे, भुवया आणि ओठ. भावना व्यक्त करायला तितकेसे पुरे. (म्हणूनच व्हाट्स अ‍ॅप ईमोजी आधी साधे सिम्पल होते तर मग मात्र त्या चेहऱ्यात अनेक डिटेिलग आलं.)

कुठल्याही माणसाला, वस्तूला असे

दोन डोळे व ओठांचे आकार दिले, की त्या वस्तू हसऱ्या रडक्या होतात. रागावतात- ओरडतात.

संवाद साधतात, जिवंत भासतात. आपल्याला छान वाटतं. चेहऱ्यावर भावना नसलेल्या लोकांसोबत आपण जगूच शकणार नाही. कारण आपल्यासारख्या माणूस नावाच्या प्राण्याला अशी भावनांची देवाणघेवाण करणारे खूप आवडतात. घरातील पाळीव प्राणीही या चेहऱ्यावरील डोळे-ओठा आधारेच तुमच्याशी संवाद साधतात.

सतत पुस्तकात किंवा मोबाइलमध्ये डोकं खुपसून बसलेले प्राणी दुसऱ्या प्राण्याला अजिबात आवडत नाहीत. आता वर्तमानपत्रातून डोकं बाहेर काढून आरशासमोर न्या बरं!

chitrapatang@gmail.com