09 August 2020

News Flash

कौशल्य सारे.. रचनेत आहे!

वर्ग बदलला. तुकडी बदलली. शिकवणारे शिक्षक नवीन होते.

|| मीरा कुलकर्णी

नवाकोरा ड्रेस, नवी स्कूलबॅग, नवी कोरी करकरीत वह्य-पुस्तकं, बुट-सॉक्स असं सगळं नवेपण मिरवत मुक्ता आज लवकरच शळेसाठी तयार झाली होती. सुट्टीचा निवांतपणा संपून आता नव्यानं सुरू झालेल्या शाळेची नवलाई तर होतीच, पण सगळ्याच नवीन वस्तू.. त्या नव्याचीही नवलाई होती.

वर्ग बदलला. तुकडी बदलली. शिकवणारे शिक्षक नवीन होते. तुकडी बदलून नव्यानं वर्गात आलेले मित्र-मैत्रिणीही नवीनच होते.. आणि वॉटरबॅग, डबा, कंपास बॉक्स या सगळ्या नव्या गोष्टी मिरवण्यात मुक्ता रमून गेली होती. मस्त पोझ देऊन फोटोही काढला होता. नव्या युनिफॉर्ममधल्या नव्या नवलाईचा.

बाईंनी आता वर्गात शिकवायला सुरुवात केली. मुलं वर्गात छान रमली होती. पण वरच्या इयत्तेत आल्यावर मुलं जास्त विचारी आणि समंजस झालीत असं बाईंना सारखं जाणवत होतं. दोन दिवस शिकवताना केलेल्या निरीक्षणानंतर आज बाईंनी मुक्ताला विचारलं, ‘‘मुक्ता.. अगं, मी रोज बघते शाळा सुरू झाल्यापासून.. कित्ती कोरून, सावकाश आणि छान अक्षरात लिहितेस वहीमध्ये. अगदी नीटनेटकं! आणि पुस्तकंसुद्धा कित्ती सावकाशीनं वापरतेस!’’

मुक्ता काही बोलायच्या आधीच शेजारी बसलेली राधा म्हणाली, ‘‘हो बाई.. ती हातही लावू देत नाही आम्हाला.. वह्य पुस्तकांना. साऽऽरखी बघत असते पुस्तकावर चिकटविलेल्या तिच्या नावाच्या स्टिकरकडे.’’ एवढय़ात हसत हसत मुक्ता म्हणाली.. ‘‘हो बाई! मला नव्या वह्य- पुस्तकांचा वास खूप आवडतो आणि नव्या- कोऱ्या, करकरीत पानावर छान अक्षर काढायलाही मजा येते. वही उघडल्यावर सुरुवातीचं अक्षर छानच दिसायला हवं नं!’’

‘‘फस्ट इंप्रेशन इज दि लास्ट इंप्रेशन’ हो नं बाई?’’ मुक्ता अगदी मोकळेपणानं बोलत होती.

मुक्ताचं बोलणं ऐकून बाई हसायला लागल्या. पण हसता हसता समजावण्याच्या स्वरात त्या म्हणाल्या, ‘‘मुक्ता, फक्त ‘फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन’ म्हणून नाही चालणार हं.. आता वरच्या इयत्तेत आलात तुम्ही; आता नेहमीच अगदी शेवटच्या ओळीपर्यंत चांगलं अक्षर काढायचा प्रयत्न करायचाच. आपण कोणतंही काम करताना ते नीटनेटकं, टापटिपीत करण्याची सवय लावून घ्यायला हवी नं! मुलांनो, एकदा का चांगलं काम करण्याचं वळण हाताला लागलं की मग आपल्या हातून होणारं प्रत्येक काम सर्वागसुंदरच असतं.’’

‘‘हो बाई.. आता मी सुट्टीत माझ्या शांताआजीकडे गेले होते ना, तीपण आम्हा सगळ्या मुलांना रोज हेच सांगायची. कोणतंही काम मनापासून आणि छान करावं. मग ते घरकाम असो, एखादा छंद जोपासणं असो नाहीतर अभ्यास.. असं सांगत ती खूप उदाहरणं द्यायची. तिला इंग्रजी नीट येत नाही, पण बोलायची फार हौस.. सारखं ‘शिस्टीमॅटिक’ असं म्हणायची.’’ रसिकानं असं सांगताच सगळे हसायला लागले.

‘‘कोणती उदाहरणं दिली ते आम्हाला सर्वाना सांग नं.’’ बाईंनी रसिकाला बोलतं केलं. रसिका सांगायला लागली.. ‘‘म्हणजे शांताआजीचं म्हणणं असं असतं की, कपडे तुम्ही स्वच्छ धुतले आणि कसेही वाळत टाकले, तर चुरगळलेले, चुण्या पडलेले कपडे घालायला बरं वाटत नाही. म्हणून कपडे कसे धुतले याबरोबरच ते आपण कसे वाळत टाकतो हे महत्त्वाचं आहे. कपडय़ाला एकही सुरकुती न पडता झटकून छान वाळत टाकायचे- एकही चुणी न पडू देता.. आणि वाळल्यावर लगेच नीट घडी घालून ठेवले की ते कपडे वापरताना चांगलं वाटतं. कसेही चुरगळून टाकलेले कपडे घालायला चांगलं वाटेल का? म्हणून माझी शांताआजी सारखी म्हणते- ‘कौशल्य सारे.. रचनेत आहे.’ आपण एखादी गोष्ट कशी सादर करतो त्याला महत्त्व आहे.’’

तेवढय़ात ऋ जुतानं हात वर केला. बाईंनी ‘बोल ऋ जुता,’ असं म्हणताच हसत हसत ऋजुता म्हणाली, ‘‘हो बाई, जेवायला बसल्यावर ताटामध्ये सगळे पदार्थ छान वाढले की जेवावंसं वाटतं, म्हणून चटणी, कोशिंबीर, भाजी यांच्या जागा ठरलेल्या असतात. ‘डावं-उजवं नीट वाढावं,’ असं माझी आई नेहमी म्हणते. वरण, ताक यासाठी आपण वाटी घेतो. आई स्वयंपाक केल्यावर छान डब्यात भाजी काढून वरून कोथिंबीर वैरते. मस्त वाटतं बघायला आणि खायलासुद्धा! पदार्थ कसे वाढतो तेपण महत्त्वाचंच ना.. कारण कौशल्य सारे..’’ रसिकानेही सूर ओढला.. ‘‘रचनेत आहे!’’

मुलांनो, हे अगदी बरोबर आहे; पण ते अभ्यासालासुद्धा लागू पडतं बरं का! तुम्ही कित्ती सुरेख अक्षरात लिहिता त्याबरोबरच त्या लिखाणाची मांडणी कशी आहे तेसुद्धा महत्त्वाचं असतं. नव्या मुद्दय़ाचे नवीन परिच्छेद कसे करता, महत्त्वाच्या शब्दाला, वाक्याला अधोरेखन कसं करता. चिन्हांचा वापर कुठे आणि कसा करता, हे सगळं म्हणजे लिहिण्याची कौशल्यपूर्ण रचनाही महत्त्वाची असते नं. पुस्तकातले धडे, कविता बघा नं! वरती छान ठळक, आकर्षक शीर्षक असतं. मग धडा, कविता, सोबत बाजूला एखादं छानसं चित्र. यामुळे तो धडा, कविता कित्ती आकर्षक होते, हो की नाही?

‘‘हो बाई!’’ मुक्ता म्हणाली.

‘‘आपण शाळेचे प्रोजेक्ट करतानाही छान आकर्षक पेन, रंगीबेरंगी चित्र, कागद वापरतो. बॉर्डर करतो. चित्रकलेच्या वहीत सुंदर चित्र काढतो. कारण प्रोजेक्टचे मार्क अभ्यासाबरोबर माहिती आणि कौशल्यपूर्ण रचनेलाही असतात.’’

‘‘मीपण बॅगमध्ये एका बाजूला वह्य, एका बाजूला पुस्तकं, पुढच्या कप्प्यात डबा, वॉटरबॅग, अशी छान बॅग लावते.’’ आदिती म्हणाली, ‘‘घरीपण माझ्या कपडय़ांचं, पुस्तकांचं कपाट मीच लावते.’’

‘‘मुलांनो, आज किती छान विषयावर आणि महत्त्वाच्या मुद्दय़ांवर बोललो आपण. तास संपेलच आत्ता एवढय़ात. पण बरं का, हे नेहमी लक्षात ठेवायचं की, परीक्षेमध्ये पायऱ्या-पायऱ्यांनी गणित सोडवतो. चांगल्या अक्षरात मुद्देसूद उत्तर लिहितो. असे पेपर तपासताना परीक्षकही खूश होतात.’’ बाई सांगत होत्या, ‘‘शाळेला येताना व्यवस्थित, युनिफॉर्म, केसांची रचना.. या गोष्टी जशा महत्त्वाच्या, तसं वहीतलं सुंदर अक्षर, परीक्षेतले अचूक आणि आकर्षक लिहिलेले पेपर यालाही महत्त्व आहे. प्रयोगवही, चित्रकलेची वही, निबंधवही, अभ्यासाची वही किंवा प्रोजेक्ट.. तुमचं सादरीकरण, कौशल्यपूर्ण असायला हवं. एखाद्या नृत्यात मुलांना उभं करण्याची, नृत्य सादरीकरणाची पद्धत यामध्ये कौशल्यच असते. शाळेत प्रार्थनेला उभं राहणं. पीटीच्या तासाला ग्राऊंडवर जाणं, कोणत्याही खेळात नियमानुसार कौशल्यपूर्ण पद्धतीत उभं राहणं महत्त्वाचं असतं. फळ्यावर लिहिताना आपण वेगवेगळ्या रंगाचे खडू वापरतो. अक्षरांचा आकार लहान-मोठा करतो. अशा कौशल्यपूर्ण रचनेमुळे वाचनाचा उत्साह वाढून लक्षात राहतं. चला तर मग.. वर्षभर सगळं काम मुद्देसूद, आकर्षक, नीटनेटक्या पद्धतीनं करायचं. कारण?’’ बाईंनी प्रश्न विचारताच मुलं एका सुरात म्हणाली.. ‘‘कौशल्य सारे रचनेत आहे.’’

meerackulkarni@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2019 4:26 pm

Web Title: stories for kids 7
Next Stories
1 पालक खाणार त्याला..
2 डोकॅलिटी
3 आम्ही सारे चमत्कारी!
Just Now!
X