24 January 2020

News Flash

सर्वाना आले ‘डोळे’!

दोन आठवडय़ांपूर्वी म्हणजे ‘कार्टूनगाथा’च्या मागील लेखात इमोजी-स्माईलीचा सराव दिला होता.

|| श्रीनिवास बाळकृष्णन

दोन आठवडय़ांपूर्वी म्हणजे ‘कार्टूनगाथा’च्या मागील लेखात इमोजी-स्माईलीचा सराव दिला होता. हा शाळेचाच ‘प्रोजेक्त’ समजून काही पालकांनीच करून पाठवलाही. अनेक मुलांनी मात्र तो मनातल्या मनातच केला.

व्हाट्सअ‍ॅपवर रेडी इमोजी असताना नवे कशाला बनवायचे, हा आळशी विचार अनेकांनी केल्याचे आम्हाला आमच्या खास खबऱ्यांकडून कळाले हो. पण आजची गंमत मात्र मनातल्या मनात करायची नाही. तर खरोखरीच करायची आहे. आपल्या घरात सजीव आणि निर्जीव अशा दोन प्रकारच्या वस्तू असतात. सजीव आणि निर्जीव म्हणजे ‘ज्या वस्तूसाठी आपण हट्ट करतो त्या निर्जीव.’आणि ‘त्या वस्तूंसाठी ज्यांच्याकडे हट्ट धरतो त्या सजीव!’

आई, बाबा, आजी, भाऊ, बहीण, मामा इत्यादी सर्व सजीव तर टीव्ही, फ्रीज, फॅन, दरवाजा, बॅट, बॉल, खेळणी, खिडक्या, भांडी, फोन इत्यादी सर्व निर्जीव वस्तू आहेत. कार्टून सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टींचे करता येते. माणसांचे कार्टून करणे तसे सोपे असते, कारण त्यांचे डोळे, भुवया, तोंड, खूप बोलके असतात. त्यात भावना पटकन दाखवता येतात व समजतात. पण काही सजीवांच्या भावना मात्र काही केल्या समजत नाहीत. उदा. कुंडीतले रोप सजीव आहे, पण ते हसतंय की रडतंय हे कळत नाही. कुत्रा, मांजर रागावलेला कळतो, पण हसताना कळत नाही. मुंगी, झुरळ, माशी, मच्छर, पाल, कोंबडी, बकरी, कावळे यांचा देखील सजीव असूनही चेहरा पाहून भावनेचा काहीच पत्ता लागत नाही.

तसेच घरातील अनेक निर्जीव वस्तू काय भावना व्यक्त करतात हेच कळत नाही. कसं कळणार? तुम्ही म्हणाल की, त्यांना डोळे, भुवया, तोंड कुठं असतं? तुमचं बरोबरच आहे. पण निर्जीव वस्तूंना काही अपवाद आहेत. कसं ते सांगतो. मला महित्येय की तुम्हाला चार चाकी गाडय़ा आवडतात. काहींना तर ट्रक, बस, ट्रॅक्टर, जेसीबीही आवडतो. अशा जवळपासच्या चार चाकी गाडय़ांना तुम्ही समोरून पाहा. म्हणजे त्या बंद असताना त्यांच्या समोर उभे राहा आणि त्यांचा चेहरा पाहा. तुम्हाला त्या गाडय़ा कुठलेतरी भाव व्यक्त करताना भासतील.

रागावून, हसून, तोंड वेंगाडून पाहतायेत असं वाटेल. असं का वाटलं? याचं उत्तर साधं आहे. गाडीचे दोन दिवे (हेडलाइट) आपल्याला डोळ्यांसारखे भासतात, तर त्यामधली इंजिनमध्ये हवा जाण्यासाठी असणारी जाळी आपल्याला तोंडासारखी भासते.

थोडक्यात, जगातील कुठल्याही वस्तूला आपण २ डोळे लावले की ती वस्तू जिवंत माणसासारखी भाव व्यक्त करताना भासते. करून पाहू या? हे करून पाहिलं की आपल्या राहत्या घरात १०० पाहुणे वाढल्याचा फिल येईल.

त्यासाठी तुम्हाला कात्री, काळा स्केचपेन किंवा मार्कर, सेलोटेप किंवा दोन्ही बाजूने चिटकवू शकतो (टू वे टेप) अशी चिकटपट्टी! आधी सोप्या वस्तू घेऊ.

साधारण प्रत्येक घरात फ्रीज असतो. त्यात ५ ते १० अंडी असतात. ती सर्व अंडी एकेक करून गादीवर नेऊन ठेवायची. आणि स्केचपेनने त्यावर डोळे व तोंड काढायचं आणि पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायची. काही दिवस फ्रीज उघडल्या उघडल्या तुम्हाला हसायला येईल. आणि टरफल फेकून देत असल्याने यात काहीच नुकसान नाही.

हे करताना आपण केलेला इमोजी-स्माईलीचा सराव कामास येईल. अशा सोप्या वस्तूकडून आपण कठीण वस्तूंकडे हळूहळू जाऊ. पण इथं आपण थेट वस्तूवर डोळे काढणार नाही, तर कागदावर गडद रेषांनी डोळे काढून ते कात्रीने कापून घेणार. चित्रात दाखवल्याप्रमाणे कापलेल्या डोळ्यांमागे टू वे टेप लावावी. तसेच तोंडाचे आकार करून कापून घ्या. त्यालाही डबल साईड टेप लावा. म्हणजे कुठल्याही वस्तूला ते चिटकवता येतील आणि ती वस्तू खराबही होणार नाही. आता प्रत्येक वस्तू भाव व्यक्त करेल. हाच प्रयोग सोसायटी-चाळीतील मोठय़ा झाडांसोबतही करू शकता. झाडेही मित्र झाल्यासारखे वाटतील- नारीयलअण्णासारखे!

लक्षात घ्या, चुकूनही फेव्हिकॉल किंवा फेविक्विकसारखे कायमस्वरूपी प्रकार वापरू नका. तसेच आपल्याला पालकांची ‘कले’ची समज व कार्टुनची आवड पाहून पहिल्यांदा बिनकामाच्या किंवा तुमच्याच वस्तूंना निवडाल अशी खात्री बाळगतो. नाहीतर आधीच टीव्हीस्क्रीन किंवा त्यांच्या लॅपटॉपला डोळे वगरे चिटकवून ठेवाल.. मग पालक जाम वैतागतील आणि याच वर्तमानपत्राची गुंडाळी करून झोडपतील. आणि वर्तमानपत्र सजीव झाल्याचा भास होईल.

chitrapatang@gmail.com

First Published on May 26, 2019 12:02 am

Web Title: stories for kids srinivas balakrishnan
Next Stories
1 हा छंद जिवाला लावी पिसे!
2 एकमेकां सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ!
3 ..आणि हत्तीला सोंड मिळाली
Just Now!
X