News Flash

निसर्गाशी कट्टी? नाही, गट्टी!

डॉ. स्वरूपा भागवत bhagwatswarupa@yahoo.com ‘‘अगं चिऊताई, जरा उंच उडून बघशील का आपले छोटे दोस्त कुठे दिसतायत ते?’’ खारुताई म्हणाली. आंबेझाडकाकांच्या खांद्यावर बसलेली चिऊताई उंच उडाली

निसर्गाशी कट्टी? नाही, गट्टी!

डॉ. स्वरूपा भागवत bhagwatswarupa@yahoo.com

‘‘अगं चिऊताई, जरा उंच उडून बघशील का आपले छोटे दोस्त कुठे दिसतायत ते?’’ खारुताई म्हणाली. आंबेझाडकाकांच्या खांद्यावर बसलेली चिऊताई उंच उडाली आणि इकडे तिकडे पाहून मान हलवतच परत आली. ‘‘नाही खारुताई, आपले छोटे मित्र कुठ्ठे म्हणजे कुठ्ठेच दिसत नाहीयेत.’’ आंबेझाडकाकांनाही दोस्तांची खूप आठवण येत होती. आपल्या फांद्या हलवत ते म्हणाले, ‘‘बाळांनो, तीन दिवस झाले, तुम्ही बागेत का नाही येत? आम्हाला का नाही भेटत?’’  शेजारीच असलेला गुलाबदादा म्हणाला, ‘‘तो बघा, पोपटदादा आलाच. त्याने गावातून नक्की काहीतरी बातमी आणली असेल.’’ धापा टाकत पोपटदादा म्हणाला, ‘‘हो. मला माहीत आहे आपले दोस्त कुठे आहेत ते. माणसांमध्ये करोना नावाचा एक आजार पसरला आहे म्हणे. त्यामुळे कुण्णी कुण्णी घरातून बाहेरच पडत नाहीत. आपले सगळे सवंगडीपण आपापल्या घरांमध्येच थांबणार आहेत. आता थोडे दिवस तरी ते आपल्याला भेटणार नाहीत.’’ हे ऐकून बागेमधले सर्व जण खूप उदास झाले. आपल्या पारंब्या हलवत वडआजोबा म्हणाले, ‘‘छोटय़ा दोस्तांची आठवण येतेय ना तुम्हाला? त्यांची काळजीही वाटतेय ना?’’ त्यावर बकुळीताई म्हणाली, ‘‘हो आजोबा. आणि घरात बसून त्यांना किती कंटाळा येत असेल याचंही आम्हाला वाईट वाटतंय.’’ खारुताई म्हणाली, ‘‘आपले मित्र आपल्याला विसरून तर जाणार नाहीत ना? त्यांनाही आपली आठवण येत असेल का?’’ त्यावर वडआजोबा म्हणाले, ‘‘तुम्ही मुळीच काळजी करू नका. आपले दोस्त आपापल्या घरांमध्ये आहेत ना.. मग तिथे ते त्यांच्या आई-बाबांबरोबर सुरक्षितच असतील. जरासा  कंटाळा येत असेल त्यांना.. पण थोडेच दिवस. माझी खात्री आहे, सगळी काळजी घेतली ना तर माणसांमधला करोना नावाचा हा आजार लवकरच पळून जाईल आणि मग आपले मित्र आपल्याला भेटायला नक्कीच येतील. तोपर्यंत आपण त्यांची वाट बघू या.’’ वडआजोबांचं म्हणणं सगळ्यांना पटलं. ‘‘होऽऽ आजोबा.’’ सगळे एका सुरात म्हणाले.

वाट बघता बघता बरेच दिवस निघून गेले. मुलं आलीच नाहीत. आता मात्र सगळे कंटाळून गेले आणि काळजीही करू लागले. चिऊताई, पोपटदादा आणि त्यांची पिल्लं किलबिल करायचं विसरून गेले. गुलाबदादांच्या कळ्याही रुसून बसल्या. त्यांनी उमलायचं सोडून दिलं. रंगीबेरंगी फुलपाखरांचं बागडणंही थांबलं. खारुताई आता तुरुतुरु धावेनाशी झाली. हिरव्या मऊ गवतानं वाऱ्यावर डोलणं सोडून दिलं. ‘काय बरं झालं असेल? इतके दिवस का लागताहेत मुलांना यायला?’ आंबेझाडकाका आणि वडआजोबा दोघांनाही प्रश्न पडला होता.

आणि काय आश्चर्य! अचानक एके दिवशी संध्याकाळी बागेमध्ये एकच गलका ऐकू आला. सगळे एकमेकांना म्हणाले, ‘‘अरे, उठा! जागे व्हा! आपले दोस्त आले रे आले!!’’ खरोखरच नाचत आणि बागडत बच्चेकंपनी बागेमध्ये आली होती. त्यांच्या हसण्या-खेळण्यामुळे बागेमध्ये  उत्साह पसरला. कोणी गवतावर नाचायला अन् लोळायला लागलं. गवताला खूप आनंद झाला.  छोटय़ा दोस्तांच्या पावलांना ते गुदगुल्या करू लागलं. काही मित्रांनी गुलाबदादाच्या कळ्यांवरून हळुवार हात फिरवला. आणि काय नवल! त्याच्या कळ्या उमलल्या आणि त्यांची फुलं झाली. ते पाहून फुलपाखरांनाही आनंद झाला आणि तीदेखील पुन्हा बागडायला लागली.  बकुळीताईने आनंदाने आपल्या फांद्या हलवल्या तर काय..! टपोऱ्या टपोऱ्या फुलांनी मुलं न्हाऊन गेली. फुलांचा सुगंध सगळ्या बागेत पसरला.  काही सवंगडी आंबेझाडकाकांच्या अंगावर   चढून कैऱ्या काढू लागले, तर काही जण खारुताईच्या मागे धावले. चिऊताई आणि पोपटदादा आनंदाने किलबिलाट करत हवेत गिरक्या घेऊ लागले. काही मित्र वडआजोबांशी सूरपारंब्या खेळू लागले.

‘‘बाळांनो, तुम्ही बरे आहात ना रे? किती आठवण येत होती तुमची! केवढी वाट बघत होतो आम्ही, दोस्तांनो! आम्हाला वाटलं, तुम्ही कट्टी केलीत की काय आमच्याशी!’’ मुलं इकडे तिकडे पाहू लागली. हे सगळे आवाज कुठून येत होते बरं? ‘‘काय वडआजोबा, आंबेझाडकाका, गुलाबदादा, बकुळीताई, पोपटदादा, चिऊताई.. कित्ती छान! बागेतले आपले सवंगडीच आपल्याशी बोलतायत की! त्यांना किती काळजी वाटते आपली! चला, आपणही त्यांच्याशी गप्पा मारू या.’’ पिंटू म्हणाला, ‘‘आमच्या लाडक्या मित्रांनो! आम्हालाही तुमची खूप आठवण येत होती. घरात राहून नुसता कंटाळा आला होता आम्हाला.’’ ‘‘हो ना! ती ऑनलाइन शाळा आणि ऑनलाइन अभ्यास. कुण्णाकुण्णाला भेटायला मिळालं नाही आम्हाला. आज तुम्हाला भेटल्यावर कसं मस्त वाटतंय!’’ चिंगी एकदम खूश होऊन म्हणाली. वडआजोबा म्हणाले, ‘‘पण तुम्ही तुमच्या आई-बाबांचं ऐकलंत आणि घरातच राहिलात म्हणूनच हा आजार पळून जायला मदत झाली ना? आम्ही काय तुम्हाला भेटणारच होतो रे बाळांनो! जास्त महत्त्वाचं काय, तर आपली आणि इतरांची काळजी घेणं. आणि माझी खात्री आहे घरात राहूनसुद्धा खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकला असाल तुम्ही.’’ मुलं म्हणाली, ‘‘हो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आम्ही आज शिकलो आजोबा. तुम्ही सगळे आमच्यावर किती प्रेम करता.. आमची काळजी करता आणि काळजी घेता. आणि आम्ही माणसं- आम्ही मात्र  तुमच्याशी आणि साऱ्या निसर्गाशी किती वाईट वागलो आजपर्यंत. पण यापुढे आम्ही कधीच असं वागणार नाही. उलट, तुमचं रक्षणच करणार. तुम्ही आमचे खरे मित्र आहात, हे आम्ही सगळ्यांना सांगणार..’’

मुलांचं हे बोलणं ऐकून

कित्ती आनंद झाला असेल बरं बागेला! तेव्हा बालमित्रांनो, आपण काय लक्षात ठेवायचं? ‘निसर्गाशी नको आपली कट्टी. नेहमी करू या त्याच्याशी गट्टी.’

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 1:05 am

Web Title: story about environment care for kids story about nature care for kids
Next Stories
1 मन आनंद आनंद छायो!
2 उंदरांच्या गोष्टी
3 संवेदना…
Just Now!
X