‘‘..तर बच्चे लोक, परवा सगळ्यांनी आपले आपले संवाद छान पाठ करून यायचं हं. मग आपण प्रॅक्टिसला सुरुवात करू या. पण थांबा.. त्याआधी आता सगळ्यांनी पावभाजी खाऊन जायचंय हं.’’ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मल्हारची आई सोसायटीतल्या मुलांचे छोटेसे नाटुकले बसवणार होती. ती स्वयंपाकघरात जाणार तोच तोंड लहान करून जय तिला म्हणाला, ‘‘मावशी.. एक सांगू?’’

‘‘हो, बोल ना.’’ – मावशी.

Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

‘‘मला ना या नाटकातल्या राजाचं किंवा प्रधानाचं काम करायचंय. सैनिकाचं नको.. ते छोटं आहे.’’ – इति जय.

‘‘हो आणि मलापण.. दासीचं काम नको.’’- वीरजा.

मावशी चकितच झाली. ती म्हणाली, ‘‘अरे, पण असं का? म्हणजे मला मान्य आहे की तुमचे रोल लहान आहेत, पण छोटे असले तरी महत्त्वाचे आहेत ना.’’

‘‘अं.. तरी पण.’’ – जयची कुरकुर.

‘‘अरे पण, नाटक तर सगळ्यांनी मिळून करायचं असतं ना? बरं मला सांगा, नाटकातून तुमचे दोघांचे रोल लहान आहेत म्हणून काढूनच टाकले तर? मग आपलं नाटक पूर्ण तरी होईल का? तेव्हा.. आपलं काम- रोल छोटा असो की मोठा, ताक महत्त्वाचाच आहे असं समजायचं आणि प्रत्येकाने ते छान मन लावून करायचं. तेव्हाच आपलं नाटक मस्त होईल ना! कारण नाटक म्हणजे सगळ्यांनी मिळून एकजुटीने करायचं असतं. किंवा तुमच्या भाषेत सांगायचं तर ते टीमवर्क असतं. त्यात प्रत्येकानं सारखंच सहभागी व्हायचं असतं. त्यात कुणी मोठा किंवा छोटा नसतो.’’ मावशीने स्पष्टीकरण दिलं.

सगळीच मुलं गप्प होऊन विचारात पडलेली पाहून मावशी एकदम आठवून म्हणाली, ‘‘तुम्ही दहीहंडी बघितली की नाही?’’

‘‘हो, पण त्याचा काय संबंध इथे?’’ – वीरजाचा निरागस प्रश्न.

‘‘अरे, तुम्हाला सगळ्यांना कृष्णाच्या गोष्टी माहीत आहेत, हो की नाही? छोटय़ा कृष्णाला दूध, दही, लोणी खूप आवडायचं. आणि तो तर होता गोकुळातल्या नंदराजाचा मुलगा. आता राजाचा मुलगा म्हटलं की त्याचे खाण्यापिण्याचे हवे तेवढे लाड आई-वडिलांकडून होणारच की नाहीत? मनात येईल तेव्हा तो हवं तेवढं लोणी, दही वगैरे खाऊ  शकत होता. पण.. आपल्याबरोबर आपल्या इतर मित्रांनासुद्धा आपल्यासारखंच खायला मिळावं आणि सर्वानी मिळून एकत्रपणे ते वाटून खावं असं त्याला वाटायचं म्हणून तो काय करायचा?’’

‘‘मी सांगतो.’’-जयने लगेच हात वर करून सांगायला सुरुवात केली. ‘‘तो ना.. आपल्या सगळ्या मित्रांना एकत्र जमवून एकमेकांच्या पाठीवर चढून घरात उंचावर शिंक्यात टांगलेले लोणी वगैरे काढायचा आणि मग सगळे मिळून ते फस्त करायचे.’’

‘‘अगदी बरोब्बर. म्हणजे बघा हं, त्या काळात त्या छोटय़ाशा बाळकृष्णाने हे टीमवर्कचं छान उदाहरण घालून दिलंय की नाही आपल्याला. त्याचंच प्रतीक म्हणून आपल्याकडे गोकुळाष्टमीला दहीहंडय़ा फोडतात. त्या फोडायची पद्धत कशी असते ते कोण सांगेल मला?’’ – मावशी

‘‘मी सांगतो.’’ – मल्हार.

‘‘दहीहंडी उंचावर बांधलेली असते. ती फोडण्यासाठी खूपजणांचा ग्रुप हंडीखाली जमतो. मोठी आणि जरा अंगाने स्ट्रॉंग मुले तळाशी मोठासा गोल करून उभी राहतात. त्यांच्या खांद्यावर दुसरी मुलं उभी राहून दुसरा थर तयार होतो. पुन्हा त्यांच्या खांद्यावर आणखी मुले उभी राहून तिसरा गोल थर तयार करतात. तरीही त्यांचा हात हंडीपर्यंत पोचत नसेल तर चौथा किंवा पाचवा थरही तयार करतात.’’

‘‘आणि सर्वात शेवटी एक छोटासा पण तुडतुडीत मुलगा वर चढून हंडीपर्यंत पोचून हंडी खेचतो आणि फोडतो.’’ – वीरजा.

‘‘अगदी बरोब्बर.. म्हणजे हे टीमवर्कच झालं ना! खालची मुलं म्हणतात का की मीच सर्वात वर जाऊन हंडी फोडणार! आम्हीच नेहमी सगळ्यांचं वजन का पेलायचं? की वरची मुलं कधी म्हणतात का की, आम्ही नाही कुणाच्या खांद्यावर उभे राहून बॅलन्सिंग करणार. आम्ही जमिनीवरच उभे राहणार. उलट सगळेजण एकमेकांना खूप सांभाळून सावरून घेत असतात. त्यामुळेच त्यांचा दहीहंडी फोडायचा कार्यक्रम यशस्वी होतो. गोकुळाष्टमीसारखा सण आपल्याला एकजुटीने काम करण्याचं महत्त्व शिकवतो. आपल्या सणांकडे आपण अशाही पद्धतीने पाहायला हवं, पण आजकाल मात्र आपल्या आजूबाजूला गोविंदाच्या उत्सवात आपल्याला दिसतो फक्त गोंगाट आणि हुल्लडबाजी. ते सर्व आपण टाळलं पाहिजे. टीमवर्कमध्ये कुठलंही काम आणि ते करणारा माणूसही श्रेष्ठ मोठा वगैरे नसतो तसंच लहानही नसतो. आपल्या बऱ्याच खेळातसुद्धा जिंकण्यासाठी संघभावना म्हणजेच एकजूट आवश्यक असते, माहितेय ना.. जय सांगू शकशील असे खेळ?’’

‘‘क्रिकेट, हॉकी.’’ – जय.

‘‘आणि कबड्डी, फुटबॉलसुद्धा!’’- वीरजा.

‘‘छान. यातही एकटा प्लेअर छान खेळून मॅच जिंकता येत नाही. सगळ्यांचे प्रयत्न तितकेच महत्त्वाचे असतात, हो की नाही? आणि गंमत म्हणजे या एकजुटीचं.. टीमवर्कचं महत्त्व फक्त खेळात वगैरे असतं असं नाही बरं का.. आज आता मी पावभाजी घरी केलीय, पण जेव्हा आपण ती खायला एखाद्या हॉटेलात जातो तेव्हा तिथे काय होतं  माहितेय ना.. ऑर्डर घेणाऱ्या वेटरपासून, ती बनवणाऱ्या आचाऱ्यापासून ते टेबल साफ करणाऱ्या माणसांपर्यंत.. सगळ्यांचं मस्तपैकी शिस्तीत  टीमवर्क चालू असतं. काय.. कधी लक्षात आलंय का तुमच्या? त्यातल्या एकाने जरी कधी आपलं काम अचानक थांबवलं तर मोठी गडबड होईल की नाही?’’

अशा टीमवर्कची पुष्कळ उदाहरणं तुम्हाला आजूबाजूला दिसतील. पण आपल्याला आत्ता महत्त्वाचं काय? आपल्याला आपलं नाटक छानपैकी सादर करायचंय ना, तेव्हा काय मग वीरजा आणि जय, करायची ना आपणही आपल्या टीमवर्कची सुरुवात परवापासून?’’

दोघांनी माना डोलावल्याबरोबर सगळेच खूश झाले. आणि मावशी पण समाधानाने पावभाजी गरम करायला आत गेली.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com