मे महिन्यात जय आई-बाबांबरोबर सिमल्याला जाणार होता, पण अचानक बाबांचे नवे प्रोजेक्टचे काम निघाले म्हणून तो प्लॅन रद्द झाला. जयचे १-२ मित्र समर कॅम्पला जाणार होते. तिथे म्हणे त्यांना खूप काय काय स्विमिंग, रॅपलिंग वगैरे शिकवणार होते. जयने उत्साहाने आईला कॅम्पला जाण्याबद्दल विचारले, पण आईने चक्क नकार दिला. त्याबदल्यात तिने त्याला आजीबरोबर कोकणात मामाआजोबांकडे जाण्यास सुचवले, नव्हे आग्रहच केला. अखेर अगदी नाराजीनेच तो आजीबरोबर त्या गावी पोहोचला. गाव म्हणजे अगदी खेडेगाव नव्हते. टी.व्ही., कम्प्युटर वगैरे सर्व काही होते, पण तरीही त्या अनोळखी वातावरणात जाय नव्हता हे नक्की. तिथे पोचल्यावर, त्यांच्या खूप मोठय़ा घरात शिरल्यावर मात्र, ‘हाय जय, मी मानस’ ‘आणि मी आयुष’ म्हणत त्याच्याएवढय़ाच दोन मुलांनी हसत हसत स्वत:ची ओळख करून दिली. आपल्याबरोबरची ही मुले पाहून जयला बरे वाटले.

नमस्कार-चमत्कार, खाणी-पिणी उरकल्यावर ‘‘अरे, जयला आपले घर आणि आवार वगैरे फिरवून आणा की..’’ असे मामाआजोबांनी म्हटल्याबरोबर आयुष आणि मानसने जयला घर बघायला बोलावले. त्यांचे घर जुन्या पद्धतीचे, पण खूप खोल्यांचे होते. एका संपूर्ण खोलीत तर पेपरवर खूप आंबे पिकायला ठेवले होते. घरभर आंब्याचा गोड वास पसरला होता. मागच्या अंगणात गेल्यावर मात्र त्या गोड वासाऐवजी जयला कसला तरी उग्र वास आला.

‘‘ए, हा कसला वास येतोय?’’ जय.

‘‘अरे, इथे आपल्या पमी-ठमीचा म्हणजे म्हशींचा गोठा आहे ना त्यांचा आणि शेणाचा वास आहे.’’ – आयुष म्हणाला.

‘‘ई.. इथे घरात म्हशी.. आणि शेण?’’- जयने तोंड वाकडं केलं.

तिघेही गोठय़ाकडे गेले ‘‘या बघ पमी आणि ठमी.. सरलामावशी आता त्यांचे दूध काढून आपल्याला प्यायला देतील. तुला आवडते का असे धारोष्ण दूध प्यायला?’’ – मानस.

कायम प्लॅस्टिकच्या पिशवीतून आलेले दूध पाहणाऱ्या जयला त्या मोठय़ा बादलीत काढले जाणारे दूध पाहून मोठे नवल वाटत होते. ‘‘धारोष्ण म्हणजे काय.. मी असे कधीच पाहिले नाही.’’ – जय

‘‘हे घे, आज पिऊनच बघ. परत मागशील,’’ म्हणत सरलामावशीने तिघांना दुधाचे ग्लास दिले. जयने ग्लास एक मिनिटात रिकामा केला कारण त्याला ते दूध मनापासून आवडले होते. घराच्या दुसऱ्या टोकाला एका खोलीत १-२ बायका चुलीवर मोठय़ा पातेलीत आंब्याचा रस ढवळीत होत्या. तिथे रस आटवून बाटलीबंद करायचे काम चालू होते. म्हशीच्या गोठय़ाप्रमाणेच जयला मातीच्या चुलीही पहिल्यांदाच पाहण्यास मिळाल्या. पुढच्या अंगणात बांबूच्या छोटय़ाशा मांडवावर खूप साऱ्या चटयांवर काही तरी पसरलेले दिसत होते. ‘‘हे काय आहे?’’ – जयने विचारले.

‘‘अरे, हा आंबा आणि फणसाचा रस. आता उन्हात तो खडखडीत वाळला की बनली आंबापोळी आणि फणसपोळी.’’ मानसने त्याला सामजावून सांगितले. एरवी डायरेक्ट पाकिटातील आंबापोळी खाणाऱ्या जयने ही आंबापोळी बनवायची पद्धतही प्रथमच बघितली. आंबापोळी म्हणजे जयचा वीक पॉइंट होता. बोलता बोलता आयुषने अंगणातल्या रायआवळ्याच्या झाडावरून आवळ्याचा घोस काढून जयच्या हाती दिला. घर आणि या सर्व नवलाईच्या गोष्टी पाहून खूश झालेल्या जयला पाहून आजीलाही समाधान वाटले.

संध्याकाळी समुद्रावर जायची तयारी करताना ‘‘आपल्याला बीचवर कोण घेऊन जाणार? इथून लांब आहे ना. कसे जाणार आपण?’’ या जयच्या प्रश्नावर, ‘‘हॅट आपल्याबरोबर कोण कशाला यायला पाहिजे? आणि एवढा काही लांब नाही आपण तिघे जाऊ  की रमतगमत.’’ हे मानसचे उत्तर ऐकून जयचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

जयला त्याच्या बिनधास्तपणाचे आश्चर्य वाटले. कारण मुंबईत जय आणि त्याचे मित्र कधी कुणाच्या सोबतीशिवाय एकटे फिरत नसत. आणि त्यांचे चालणे तर फारच कमी असायचे. बाहेर पडल्यावर त्यांना वाटेत आणखी २-३ मित्र भेटले. खरोखरच गप्पा मारत जाताना ते समुद्रावर कधी पोचले कळलेच नाही. तिथेही सगळ्यांनी खूप धम्माल केली. दमून भागून आलेल्या, पण उत्साहात असलेल्या जयकडे पाहून आजीला नवल वाटत होते.

रात्री मामा मामी म्हणजे मानस-आयुषचे आई-बाबा त्यांच्या क्लिनिकमधून आल्यावर एकत्र जेवताना पुन्हा एकदा सगळ्यांच्या भरपूर गप्पागोष्टी झाल्या. मामाने आकाश निरभ्र आहेसे पाहून मुलांना गच्चीवर तारे दर्शनाचा आणि तिथेच झोपण्याचा प्लॅन ठरवला. त्याने त्याच्याकडील इंपोर्टेड दुर्बिणीतून मुलांनी तारे दाखवून त्याची खूप छान माहिती सांगितली. हळूहळू सगळ्यांचे डोळे पेंगुळले तेव्हा सगळे बिछान्यावर आडवे झाले. तिथे ए.सी. किंवा पंखा नसूनही गार वाऱ्यात आकाशातील तारे मोजता मोजता जय गाढ झोपून गेला.

अंगणातल्या विहिरीत पोहण्याचा मानस आणि आयुषचा सुट्टीतला नियम होता. ‘‘जय तुला पोहायला येते का? नाही तर हा फ्लोट लावून विहिरीत ये. आम्ही शिकवतो तुला.’’ आयुषने सूचना देत विहिरीत उडी मारली. स्विमिंग पूलमधल्या गर्दीत जेमतेम हात मारत पोहायला शिकलेल्या जयला त्या दोघांनी छान सांभाळून घेतले. हळूहळू जयलाही सफाईने पोहता येऊ  लागले. पुढच्या चार दिवसांत तर तो फ्लोटशिवाय आरामात पोहायला शिकला. याशिवाय त्याला विहिरीत रहाटावरून बादली सोडून ती भरलेली बादली वर ओढायला खूप मजा वाटायची. खरं तर घरात नळ असल्याने त्या पाण्याची गरजच नव्हती, पण जयचा तो आवडता टाइमपास झाला होता.

एक दिवस आजोबांनी मुलांची आमराईची सफर ठरवली. एरवी तिथे रिक्षा किंवा गाडीने जाणाऱ्या आजोबांनी जयसाठी खास सदाकाकांची बैलगाडी मागवली. पोटभर नाश्ता करून निघालेल्या जयला बैलगाडीत बसायची खूपच उत्सुकता होती. बैलगाडीतली सुक्या गवतावर चादर टाकून तयार केलेली गुबगुबीत सीट त्याला जाम आवडली. तिन्ही मुलांनी सदाकाकांच्या मदतीने बैल हाकायची हौस पुरवून घेतली. आमराईत झाडावरचे आंबे उतरवून पेटय़ा भरण्याचे काम चालू होते. लांबलचक पसरलेल्या आमराईत भटकताना कुठे चिंचेचा आकडा काढ, कुठे पेरू काढ, ते शर्टला पुसून फस्त कर मधेच तिथल्या विहिरीत डुबक्या मार असे करताना दिवस कसा संपला कुणाला कळलेच नाही.

‘‘जयबाळा, आता आपले सामान मी आवरून ठेवलेय पुन्हा इकडे तिकडे पसरू नकोस हं. उद्या आपल्याला निघायचेय ना.’’ असे आज्जीने म्हटल्यावर जयच्याही आधी मानस आणि आयुषचे चेहरे पटकन उतरले. जयला तर काही बोलताच येईना. रात्रभर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून तिघांनी एकमेकांना पुन्हा पुन्हा भेटायचे प्रॉमिस दिले. दुसऱ्या दिवशी जड मनाने सगळ्यांचा निरोप घेऊन जय गाडीत बसला तेव्हा त्याला त्याने आई-बाबांकडे समर कॅम्पला जाण्यासाठी सिमल्याला जाण्यासाठी केलेला हट्ट आठवत होता. कोकणात न जाण्यासाठी केलेली रुसारुशी आठवत होती. अगदी नाखुशीने गेलेल्या त्याला कोकणात जे नवीन बघायला मिळाले होते, शिकायला मिळाले होते, जी धम्माल त्याने इथे केली होती तशी त्याला सिमल्याला किंवा समरकॅम्पमध्येही करता आली नसती. मनातल्या मनात त्याने आई-बाबा आणि आजीला थँक्स म्हणून टाकले. आता या वेगळ्या प्रकारच्या कॅम्पची म्हणजेच कोकण कॅम्पची मजा आई-बाबा आणि सगळ्या दोस्तांना कधी एकदा सांगतो असे जयला झाले होते.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com