12 November 2019

News Flash

जाणिजे यज्ञकर्म

सकाळीच सांगून ठेवलंय की पानं तुम्ही मुलांनी घ्यायची,’’ रतीने हळूच सगळ्यांना जागं केलं.

‘‘ए रती, खेळायला चल ना..’’ नुकतीच अमेरिकेतून आलेली रतीची मामेबहीण मुक्ता, तिचा वेळ जात नसल्यामुळे सारखी रतीच्या मागे मागे असायची.
‘‘इतका वेळ खेळलो की नाही आपण, आता नको. जरा वेळाने खेळूया. आज आपल्याकडे खूप पाहुणे आले आहेत ना तुम्हाला भेटायला. आजीने मला सकाळीच सांगून ठेवलंय की पानं तुम्ही मुलांनी घ्यायची,’’ रतीने हळूच सगळ्यांना जागं केलं.
‘‘मीपण हेल्प करू का?’’ मुक्ताने हळूच विचारलं. तिला हे सगळं नवखं होतं.
‘‘हो ये ना, आपण हॉलमध्ये पंगत मांडू या.’ रती म्हणाली.
‘‘पंगत म्हणजे काय?’’ मुक्ताला प्रश्न पडला.
‘‘अगं, अशी एका ओळीत पानं मांडली की तिला पंगत म्हणतात.’’ रतीने समजावून सांगितलं. सुबोध, विराज तर भूक लागल्यामुळे एका पायावर तयार झाले. दोघांचं लक्ष बासुंदीकडे होतं.
‘‘सतरंजीचे पट्टे आहेत ना ते घाला तिन्ही भिंतींना लागून.’’ आजीच्या सूचना चालू झाल्या. ‘‘आणि मग धुऊन पुसून ठेवलेली केळीची पानं मांडा. मांडी घालून व्यवस्थित बसता येईल अशी पुरेशी जागा सोडा हं मधे. बघू तुमची भूमिती कशी आहे?’’
‘‘मुक्ता, मी केळीची पानं ठेवते. तू पाणी प्यायचं भांडं केळीच्या पानाच्या खालच्या डाव्या कोपऱ्यावर ठेव असं, म्हणजे पान उडणार नाही.’’ रतीने बावरलेल्या मुक्ताला आपल्यात सामावून घेतलं.
‘‘विराज, तू दोन दोन वाटय़ा पानाच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात ठेव.’’ आजीने चळवळ्या विराजला कामाला लावलं.
‘‘सुबोध, ती पिवळ्या शेवंतीची फुलं आहेत ना, त्यातलं एकेक फूल प्रत्येक पानासमोर साधारण मधोमध ठेव.’’ ‘दे धक्का’ करत सुबोधनं फुलं ठेवली.
इतक्यात विराज हातात मावतील तेवढय़ा पुऱ्या घेऊन ‘मी पुरी वाढतो’ म्हणत धावत आला.
‘‘अरे हे काय विराज, जा पुऱ्या आत ठेवून ये, आजी सांगेल तसं वाढायचं,’’ म्हणत रतीने त्याला धपाटा दिला.
कोणीतरी हातात चॉकलेट कोंबल्यामुळे त्याची वाजंत्री वाजली नाही. इतरांचेही गाल फुगले.
‘‘रती, तू पाण्याचे तांबे घेऊन ये,’’ रतीने तांबे आणून ठेवले.
‘‘आता मी सांगते तसं आणि तितकं वाढायचं. घाई करायची नाही. सांडलवण करायची नाही.’’ मुक्ताला आजीचं ‘सांडलवण’ कळलंच नाही.
‘‘डाव्या बाजूचे पदार्थ आधी वाढायचे. रती, तू पानाच्या वरच्या टोकाशी मधोमध मीठ वाढ. थोडंसं वाढ, जास्त नको. विराज, तू लिंबाची फोड मिठाच्या डाव्या बाजूला वाढ. मुक्ता तू त्याच्या बाजूला चटणी वाढ, मधे थोडीशी जागा सोड. ही बघ अशी.’’ आजीने तिला प्रात्यक्षिक दाखवलं.
‘‘ए, मी आता काय वाढू?’’ लिंबाच्या फोडी वाढल्यामुळे विराजला यातही गंमत वाटत होती.
‘‘थांब जरा. रती तू कोशिंबीर वाढ. चटणीपासून थोडं अंतर ठेवून वाढ. विराज तू अर्धा अर्धा पापड वाढ. वाढताना तोंडात टाकायचा नाही. कोशिंबीरीत तो बुडता कामा नये बरं का? आणि वाकून वाढायचं आईसारखं.’’
‘‘हे डिफिकल्ट आहे हं आजी,’’ मुक्ता हळूच पुटपुटली.
‘‘वा, छान वाढलंत की बाळांनो. आता तुम्ही पानावर बसा बघू. बाकी सगळे पदार्थ गरम आहेत. ते आई, काकू वाढतील. पापडाच्या खाली भजी, पुऱ्या येतील. एका वाटीत आळूची पातळभाजी आणि एका वाटीत बासुंदी. उजव्या बाजूला सगळ्यांची आवडती फ्लॉवर-मटारची भाजी, मटकीची उसळ. त्याच्या खाली शास्त्राला थोडीशी खीर. मधोमध पांढऱ्या भाताची मूद, त्यावर पिवळं धमक साधं वरण आणि तूप.’’
‘‘मुक्ता, पहिल्या भातापासून सुरुवात करायची. मधे पोळी खायची आणि शेवटी दहीभात. असा आमचा जेवणाचा कोर्स असतो.’’ आजीने मुक्ताची शिकवणी घेतली.
‘‘मला चटणी नको.’’ विराज कुरकुरला.
‘‘पहिल्यांदा वाढलेलं आवडीचं असो वा नसो सगळं खायचं बरं का मुक्ता. नंतर मग तुला आवडेल ते खा आणि सुबोध पानात टाकायचं ..’’ आजीचं लक्ष सुबोधकडे होतं.
‘‘ना???? ही,’’ सुबोधने आरोळी ठोकली.
‘‘मुक्ता, आणखी गंमत सांगू का? उजव्या बाजूचे पदार्थ म्हणजे भाजी आमटी उजव्या हाताच्या जवळ असतात. साहजिकच हात लवकर तिथे पोहोचतो. म्हणून ते जास्त खाल्ले जातात. किंबहुना आहारशास्त्राचा विचार करता जास्त प्रमाणात खाल्ले पाहिजेत. डाव्या बाजूला वाढलेले पदार्थ- चटणी, लोणचं, पापड, भजी, मिष्टान्न हे रुचिपालट म्हणून वाढलेले असतात. जेवणाची लज्जत वाढवणे हा उद्देश असतो. त्यामुळे आवश्यक, पण कमी प्रमाणात खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते.
हाताला जरा वळून त्रास घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचावे लागते. तसा त्रास व्हावा आणि पोटात कमी प्रमाणात जावेत म्हणूनच त्यांच्या त्या त्या जागा राखीव असतात. ताटातला मधला भाग ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे त्या प्रमाणात खावा. जेवणाचं ताट करण्यामागे नाहीतर वाढण्यामागेसुद्धा आरोग्याचा विचार दडलेला आहे. शिवाय सौंदर्य, शिस्त तर आहेच. त्यामुळे मन प्रसन्न होतं. ‘वदनि कवळ घेता’ हा श्लोक मन शांत होण्यासाठीच तर म्हणायचा. म्हणून जेवणाला ‘जाणिजे यज्ञ कर्म’ असं म्हणतात.’’
‘‘आजी, हे ग्रीन पानावरचं जेवण इतकं कलरफुल दिसतंय, की केव्हा एकदा जेवतेय, असं झालंय. मी इंडियात असेपर्यंत मला रोज हेच पान हवं जेवायला.’’ मुक्ता अगदी रंगात आली होती.
‘‘समर्थ रामदासांनी ‘मानपंचक’ या ग्रंथात स्वयंपाक कसा करावा, पान कसं वाढावं हा तपशील दिला आहे. शिवाय पुरुष चांगला स्वयंपाक करू शकतात असंपण सांगितलं आहे, बरं का विराज आणि सुबोध.’’
‘‘आजी या पानात वाढलेल्या पदार्थात कुठली कुठली पोषणमूल्यं आहेत ते मी पुस्तकात बघून तुला नक्की सांगीन..’’ रतीला उत्सुकता वाटत होती.
‘‘आणि मी सर्व पदार्थाचे रंग लिहून काढीन.’ विराजला रंगांचं आकर्षण वाटलं.
‘‘अरे वाऽऽऽ, छानच की! मग आता हातातोंडाची गाठ पडू दे लवकर, खरं ना’’, आजीने असं म्हणताच सगळे जेवणात रंगून गेले.
n lokrang@expressindia.com

First Published on February 28, 2016 1:40 am

Web Title: story for kids 10