एक लांडगा जंगलात राहून राहून खूप कंटाळला होता. पाय मोकळे करायला म्हणून तो जंगलाबाहेर आला. जंगलाबाहेर उभं राहून त्यानं दूरवर नजर टाकली, तर त्याला एक मेंढी हिरव्यागार कुरणाची राखण करताना दिसली.
लांडगा त्या मेंढीकडे गेला आणि जोरात तिच्यावर ओरडला, ‘‘माझ्या कुरणावर पाय ठेवून ते घाण करायची तुझी हिंमतच कशी झाली?’’
‘‘हे कुरण तुझे नाही, ते तर माझ्या मालकाचे (मेंढपाळाचे) आहे.’’- मेंढीने शांतपणे लांडग्याला उत्तर दिले.
‘‘मेंढपाळाचा जन्मदेखील झाला नव्हता, त्या वेळेपासून हे कुरण माझ्या मालकीचे आहे.’’
‘‘नाही, नाही, नाही! हे कुरण फक्त माझ्या मालकाचेच आहे, मला हे अतिशय चांगले माहीत आहे. याच ठिकाणी मी लहानाची मोठी झाले, आमचा मेंढय़ांचा कळप याच कुरणावर चरतो.’’
मेंढीच्या या उत्तराने लांडगा मात्र चांगलाच चिडला. या क्षणी मेंढीला मारून तिचा बदला घ्यावा, असं त्याला वाटलं. पण त्यानं थोडा विचार केला की, आज आपलं पोट खूप भरलं आहे, जर या मेंढीला आपण उद्यापर्यंत ‘जीवदान’ दिलं तर उद्याचा आपल्या जेवणाचा प्रश्न सुटेल. उद्या मस्तपैकी या मेंढीवर ताव मारू या, असा मनोमन लांडग्याने विचार केला.
लांडगा मेंढीला दमात घेत म्हणाला, ‘‘ऐक, आपण असं करू या, ते समोर झुडूप दिसतंय ना, त्याच्या साक्षीनं आपण उद्या सर्व सोक्षमोक्ष लावू या, तर तू उद्या इथेच यायचं! त्या झुडपासमोर जाऊन जो प्रार्थना करेल, शपथ घेईल त्याच्याच मालकीचं हे कुरण असेल. दुसऱ्यानं काहीही न बोलता इथून निघून जायचे.
‘‘ठीक आहे.’’ मेंढी उत्तरली.
नंतर दोघेही दोन विरुद्ध दिशेला निघून गेले. लांडगा जंगलात तर मेंढी आपल्या मालकाकडे खेडय़ात.. भल्या पहाटे मेंढी कुरणाकडे जायला निघाली. मेंढी मात्र हुशार होती. तिनं कुरणावर जाताना आपल्या मित्राला- म्हणजे शिकारी कुत्र्यालाही बरोबर घेतलं. तिनं त्या कुत्र्याला लांडग्याविषयी कल्पना देऊन ठेवली होती. शिकारी कुत्रा त्या झुडपाच्या मागे लपून बसला अन् मेंढी आपलं चरण्याचं काम करू लागली.
इकडे लांडगाही जंगलातून कुरणाकडे येण्यास निघाला. वाटेत त्याला कोल्हा भेटला. कोल्ह्य़ाने त्याला विचारलं, ‘‘एवढय़ा सकाळी सकाळी घाईत कुठे निघालास?’’ त्यावर लांडग्याने त्याला सर्व हकीकत सांगितली. कोल्ह्य़ानेही आपल्याबरोबर यावे आणि मेंढीला ठामपणे सांगावे की, हे कुरण फक्त लांडग्याच्याच मालकीचं आहे. याच्या बदल्यात मेंढीचे पाय कोल्ह्य़ाला बक्षीस म्हणून देण्याचं लांडग्यानं काबूल केलं. दोघेही जंगलाबाहेर पडले. लांडग्यानं कुरणाकडे एक दृष्टिक्षेप टाकला. त्याला मनातल्या मनात खूप आनंद झाला. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं, तो मनातल्या मनातच म्हणाला, ‘‘आज कोणतेही कष्ट न घेता आपल्याला खाद्य मिळणार आहे. माझी शिकार माझी वाट पाहतंय तर..’’
लांडगा आणि कोल्हा दोघेही मेंढीजवळ आले. दोघेही मेंढीला विचारू लागले, ‘‘मग काय ठरवलंय? का आजपण म्हणणार आहेस की, हे कुरण तुझ्या मालकाच्या मालकीचं आहे म्हणून?’’
‘‘हो, हे कुरण माझ्याच मालकाचं आहे.’’ मेंढीनं अधिकच ठामपणे विश्वासानं सांगितलं.
‘‘कोल्हा एकदम मेंढीच्या अंगावर धावून गेला आणि म्हणाला, ‘‘तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत? हे कुरण फक्त लांडग्याच्याच मालकीचं आहे हे जगजाहीर आहे.’’
‘‘हो? तुला रे कसं माहीत याबाबत?’’ मेंढी आत्मविश्वासानं कोल्ह्य़ाला म्हणाली. तिच्या या प्रश्नाने कोल्ह्य़ाला चांगलाच राग आला आणि तो एकदम गोंधळलासुद्धा. नंतर तो मेंढीला म्हणाला, ‘‘कोणाकडून ऐकले असे तू विचारतेस? अगं तू कोणालाही विचार, सर्व जण तुला सांगतील, की हे कुरण लांडग्याच्याच मालकीचे आहे. मी खूप छोटा होतो तेव्हा माझे आई-वडील नेहमी या कुरणाबद्दल बोलताना म्हणत, ‘‘लांडग्याच्या कुरणावर खूप उंदरं सापडतात. मग आता तूच सांग, जर हे कुरण मेंढपाळाचं असतं तर लांडग्याचे कुरण असं कोणी म्हटलं तरी असतं का?’’
‘‘तू हे खरं बोलतो आहेस, हे शपथेवर सांगशील?’’ मेंढीनं विचारलं.
‘‘का नाही?’’ कोल्हा उत्तरला.
‘‘कुठे शपथ घ्यायची?’’
‘‘शपथ घेण्याची जागा लांडग्यानं कालच ठरवून ठेवली आहे. तुला ते झुडूप दिसतंय? त्या ठिकाणी जा, तुझा पंजा त्या झुडपाच्या फांदीवर ठेव आणि म्हण, ‘मी शपथेवर सांगतो, की हे कुरण लांडग्याच्या मालकीचे आहे.’’ कोल्हा त्या झुडपाजवळ आला, पण क्षणभरात त्याच्या लक्षात आलं की, झुडपाच्या बारीक फांद्यांमधून कोणाचे तरी डोळे चमकत आहेत. तो एकदम मागे फिरला आणि घाबरलेल्या आवाजात म्हणू लागला, ‘‘खरं सांगायचं तर माझे आई-वडील बोलताना मेंढपाळाचंही नाव घ्यायचे, असं मला पुसटसं आठवतंय. पण हे कुरण नक्की कुणाचं आहे याबाबत खरं काही मी सांगू शकणार नाही. आणि म्हणून उगीचच शपथ घ्यायलाही मला आवडणार नाही.’’
लांडगा एकदम कोल्ह्य़ावर रागावला. कोल्ह्य़ाला बाजूला सारत तो म्हणाला, ‘‘तुला कसे मदतगार म्हणायचे? मला आधीच माहिती होतं, की तुला काहीच आठवत नाही ते! चला आता मीच शपथ घेतो,’’ लांडग्याने आपला पंजा त्या झुडपाच्या फांदीवर ठेवला आणि ‘‘शपथेवर सांगतो.’’ एवढाच शब्द उच्चारला, तेवढय़ात शिकारी कुत्र्याने एकदम झुडपामागून उडी घेतली. लांडग्यावरच त्यानं हल्ला चढवला आणि त्याचे लचके घ्यायला सुरुवात केली. त्यातून कसा तरी सावरत लांडगा कुठेही न पाहता जंगलाच्या दिशेने सुसाट पळत सुटला.
कोल्ह्य़ाने आधीच तेथून धूम ठोकली होती. तो जंगलाच्या कोपऱ्यावर उभा राहून लांडग्याची वाट पहात होता. रक्तबंबाळ झालेला लांडगा तिथे येताच कोल्हा त्याला म्हणाला, ‘‘लांडगोबा रागावू नकोस. ज्या वेळेस मी कुत्र्याला लपलेलं पाहिलं, त्याच वेळेस ओळखलं की, ते कुरण तुझ्या नाही तर मेंढपाळाच्या मालकीचंच आहे!’’
इकडे मात्र मेंढी आणि शिकारी कुत्रा आपल्या कल्पनेवर भलतेच खूश होते. मेंढी शिकारी कुत्र्याला म्हणाली, ‘‘पाहिलंस मित्रा, असत्य गोष्ट कितीही मोठ्यानं ओरडून सांगितली तरी ती असत्यच असते. तिच्यात फार दम नसतोच. आणि कोल्ह्य़ालाही असंगाशी संग नडला.’’
मेंढीच्या या बोलण्यावर शिकारी कुत्रा म्हणाला, ‘सत्याचा विजय असो!’
(मूळ रशियन अनुवादित कथा)

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!