28 January 2020

News Flash

प्रिय.. ‘मे’

उन्हाळ्याची सुट्टी लागली तसे दरवर्षीप्रमाणे रोहन आणि रीमा लगेचच आत्याकडे पोहोचले.

उन्हाळ्याची सुट्टी लागली तसे दरवर्षीप्रमाणे रोहन आणि रीमा लगेचच आत्याकडे पोहोचले. त्यांना आत्याकडे जायला फार आवडायचं. तिथे आत्याची मुलं निनाद आणि इशा होती ना त्यांच्याबरोबर खेळायला! बरोबरच प्रतीक, हर्ष, ओवी, आर्या, तन्वी, वरद अशी बरीच मोठी गँग होती त्यांच्या बिल्डिंगमध्ये आणि इकडे यांच्या जवळपास मुलंच नव्हती खेळायला, त्यामुळे सुट्टी म्हणजे आत्याकडे जायचं आणि धमाल मस्ती करायची हे ठरलेलंच. यावर्षी आत्याकडे आल्यावर त्यांना एक नवीन मित्र मिळाला होता, तो म्हणजे गांगणकाका. काका आत्याच्या शेजारी नव्यानेच राहायला आले होते आणि ते शाळेत शिक्षक होते. पण सगळ्या मुलांना पटतच नव्हतं हे! ते शिक्षक होते- कारण ते सगळयांशी एकदम फ्रेंडली वागत होते. ना ओरडत होते, ना करवादत होते. आणि गंमत म्हणजे या सगळ्या कंपनीला जे काही करायचं असेल ते करायला देत होते. एव्हढंच नव्हे, तर जे काही करायचं असेल त्यात स्वत:ही सामील होत होते. त्यामुळे सगळे उठसूठ गांगणकाकांच्याच घरी जात होते. आत्या तर म्हणालीसुद्धा, ‘‘अरे, तुम्ही आमच्या घरी पाहुणे म्हणून आलात, गांगणसरांच्या घरी नाही हे तरी लक्षात आहे ना तुमच्या.’’ यावर लगेच, ‘लगेचच परत येतो आत्या,’ असं म्हणत सगळे पळालेच होते गांगणकाकांकडे.
आज गांगणकाकांकडे गेल्यावर मजाच झाली. काकांनी प्रत्येकासाठी एक रायटिंग पॅड, कागद आणि पेन तयार ठेवलं होतं. ‘‘शी.. बुवा.. अभ्यास..’’ सगळ्यांनीच नाक मुरडलं. पण काका म्हणाले, ‘‘हा अभ्यास नाहीए, ही फक्त मजा आहे. आजकाल काय होतं फोन, चॅटिंग यामुळे आपण पत्राला पूर्णपणे विसरून गेलो आहोत, पण तुम्हाला माहीत आहे का, फोन किंवा चॅटिंग यापेक्षा पत्रामधून भावना चांगल्या रीतीने व्यक्त करता येतात, म्हणूनच मी आज तुम्हाला पत्र लिहिण्याची संधी देणार आहे. आणि ज्याचं पत्र उत्तम असेल त्याच्यासाठी एक गंमतही आणलीए मी. आणि हे पत्र तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मत्रिणीला लिहायचं आहे. तो किंवा ती तुम्हाला का आवडते ते तर सांगायचं आहे. बरोबरच काही न आवडणाऱ्या गोष्टी असतील तर त्याही सांगायच्या आहेत. कोणी आनंदाने, कोणी कंटाळत, तर कोणी थोडंसं कुरकुरत पॅड समोर ओढलं आणि पत्र लिहायला लागले. काकांनी मायना म्हणजे काय, तो कसा लिहायचा ते सांगितलं आणि पत्राचा शेवट कसा करायचा तेही सांगितलं. पहिल्यांदा कंटाळलेले, कुरकुरत असलेलेही नंतर मजेने लिहू लागले. कोणी इथल्याच मित्राला पत्र लिहिलं, तर कोणी शाळेतल्या, तर कोणी कॉलनीतल्या मित्राला किंवा मत्रिणीला लिहिलं. प्रत्येक जण पत्र लिहून झाल्यावर काकांकडे देत होते. काका ती पत्रं वाचायचे आणि बाजूला ठेवायचे. पण प्रत्येकाला उत्सुकता होती कोणाचं पत्र चांगलं असेल याची!
दुसरीतली ओवी खूप वेळ लिहित होती म्हणून काकांना वेळ लागला. पण ओवीने ऋषीदाला म्हणजे तिच्या भावालाच पत्र लिहिलं होतं आणि तो तिचा खूप चांगला मित्रही आहे, असं पत्रात म्हटलं होतं.
आता काकांनी सगळ्यांना जवळ बोलावलं आणि त्यातलं सुंदर पत्र वाचायला सुरुवात केली. ते पत्र तर चक्क ‘मे’ महिन्यालाच लिहिलं होतं.
प्रिय मित्र,
‘मे’
तुझा लख्खपणा मला खूप आवडतो, म्हणूनच तुझी माझी भेट कधी होते याची मी वाट पहात असतो. तू म्हणजे स्वच्छ, निर्मळ वातावरण. तू म्हणजे एकदम रिलॅक्स मूड. तुझी भेट म्हणजे मागे कोणतंही बंधन किंवा काच नसलेली मुक्तता.
‘नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा’, याचं मूíतमंत उदाहरण म्हणजे तू. आजकाल आमचं आयुष्य म्हणजे मोबाइलच्या अलार्मला चिकटलेलं असतं. त्याच्याभोवतीच फिरत असतं. पण तू आलास की त्यातून मुक्तता मिळते आणि तुझं महत्त्व जास्त पटतं, कारण तुझ्याआधी येणारा एप्रिल म्हणजे आमच्यासाठी अभ्यास, सबमिशन्स, परीक्षा, टेंशन्स आणि सारं काही.. पण हे सगळं संपतं आणि तू येतोस. स्वच्छ लख्ख ऊन हे तुझं वैशिष्टय़ आणि त्या उन्हाबरोबरच असलेल्या मोठमोठय़ा सावल्या मला खूप भावतात. या सावलीमुळेच मला कधीच एकटं वाटत नाही. म्हणतात ना, तुमच्या आजूबाजूला पराभवाचा काळोख पसरला की तुमची सावलीही तुम्हाला सोडून जाते, पण तू मोठेमोठ्ठे दिवस आणि लहान लहान रात्री घेऊन येतोस म्हणूनच आमच्या सावल्या आमची फार काळ सोबत करतात. बरं, दिवस मोठा असल्याने काळोखाची भीतीही नाहीशी होते आणि उत्साहाचे तासही वाढतात. त्यामुळेच तू मला उत्साहाचा झरा वाटतोस. हे खरंच, की तू आलास की पाण्याचे झरे मात्र कोरडेठाक होतात, पण हा काही तुझा दोष नाही. कारण तू येणार हे वर्षभर माहीत असूनही आम्ही तिकडे डोळेझाक करतो आणि ऐनवेळी तुला दोष देत आमची जबाबदारी झटकतो. तू येणार हे माहीत असूनही का नाही आम्ही तुझ्या आगमनाची पूर्वतयारी करत? हे मात्र खरं की आमची शिबिरं, दहावी, बारावी तुझ्या आणि माझ्या दंगामस्तीवर थोडंसं विरजण घालतात, पण मित्रांबरोबर थोडी कट्टीबट्टी असेल तरच मजा येते ना! सगळं सुरळीत चाललं तर सांग बरं कशी गंमत येईल?
मित्रा, तुझी रसाळता मला आवडते म्हणून तू माझा चांगला मित्र आहेस. तू म्हणजे रसभरे आंबे, ताडगोळे, फणस, लिची, काजू, रातांबे यांची मुबलकता. सगळे कसे रसरसलेले. तू म्हणजे जांभळं, करवंद यांची भेट. जांभळं खाऊन जांभळी झालेली जीभ इतरांना दाखवली तरी कोणी मी जीभ काढून वेडावतो असा अर्थ काढू शकत नाही आणि ‘कोंबडा की कोंबडी?’ असं विचारत करवंद खातानाची मजा इतर दिवसांत मिळत नाही. तू म्हणजे मला पर्वणीच वाटतोस, कारण हवा तेवढा वेळ कार्टून बघणं, मोबाइल वापरायची विनाशर्त परवानगी असणं हे तुझ्यामुळेच मला प्राप्त होतं. नाहीतर एरवी या सगळ्यांवर बॅन असतो बरं का! अजून एक बॅन असलेली गोष्टही मी करू शकतो. ती म्हणजे, मनसोक्त आइस्क्रीम खाणं आणि सरबतं पिणं, त्याबरोबरच पाण्यात डुंबणं, गावाला जाणं, लग्न, मुंजीला जाणं.. हे मोठय़ा माणसांसाठी आता काही नावीन्याचं उरलं नाहीए, असं माझी आजी अनेकदा म्हणत असते, पण आमच्यासाठी मात्र हे मे महिन्यातच शक्य असतं.
म्हणूनच हे मे महिन्या, तू माझा खूप चांगला मित्र आहेस. मंगेश पाडगांवकरांसारखं मला भोलानाथची आळवणी करावी वाटते, की वर्षांतून मे महिने येतील का रे सहादा? तसं झालं तर मला तरी बुवा खूप आवडेल. काही लोक म्हणतात, तू म्हणजे उन्हाचा तडाखा, तू म्हणजे घामाच्या धारा. पण मला असं वाटतं, की हे सगळं जर झालंच नाही, म्हणजे उन्हाचा तडाखा आणि घामाच्या धारा वाहल्याच नाहीत तर पुढचा पावसाळा कसा येणार? आणि तो आला नाही तर पुन्हा तुझी माझी भेट कशी होणार? मला वाटतं, हे तुझ्या दूरदर्शीपणाचं द्योतक आहे. तुझी माझी परतची भेट विनादुष्काळाची जावी म्हणून तू असा वागत असतोस. तुझा आशावाद मला खूप भावतो गडय़ा! मोठे दिवस, लख्ख ऊन, फुललेला पळस, बहावा आणि गुलमोहर, फळांच्या राजाची मनसोक्त भेट, याबरोबरच प्रत्येकाच्या मनात असलेली पुढे येणाऱ्या पावसाळ्याबाबतची आशा हे सगळं तुझ्यातच दिसतं.
तेव्हा मित्रा, आपण सततच असे एकत्र असू. मी वर्षभर तुझी वाट पाहीन कितीही मोठा झालो तरीही!
तुझे इतर अकरा बंधू आहेत त्यांना म्हणावं रागावू नका, ते मला आवडतातच, पण तू माझा खास दोस्त आहेत.
तुझे सारे बंधू आणि तुझे पिता सूर्यदेव यांना शि.सा.न.
कळावे.
तुझाच,
मयंक
मयंकचं हे पत्र वाचून पूर्ण झाल्यावर सगळेच त्याच्याकडे कौतुकाने बघत होते. खरंच कसं सुचलं हे त्याला, असं वाटत असताना गांगणकाका सगळ्यांसाठी आइस्क्रीम घेऊन आले. त्यातला मोठ्ठा कोन अर्थातच मयंकसाठी होता हे वेगळं सांगावं लागलं नाही.
सुवर्णा महाबळ- suvarna71@rediffmail.com

First Published on May 8, 2016 1:05 am

Web Title: story for kids 15
टॅग Kids Story
Next Stories
1 पुस्तकांशी मैत्री : स्वप्नांची खरी दुनिया..
2 खारूताई
3 बालपण देगा देवा!
Just Now!
X