News Flash

चिमणीची गोष्ट

दोन दिवसांत नाही आठ दिवसांत मात्र गजांच्या खिडक्या तयार झाल्या. आजीने पडवीचे दार बंद केले.

मागच्या अंगणात चिमण्या जमल्या होत्या. कावळे त्यांना हुसकून लावीत होते. त्यातील एक शहाणी चिमणी म्हणाली, ‘‘त्या घरातील माणसे फार चांगली आहेत. ती निसर्गावर, पशुपक्ष्यांवर प्रेम करतात. मीच आज त्या आजींना सांगते की आम्हाला तुमचं अंगण फार आवडतं.’’
इतक्यात आजी बाहेर आल्या. त्यांनी आजोबांचे धोतर पसरले आणि भराभरा त्यावर सांडगे घातले. सांडग्यांवर चौकोनी जाळी ठेवली. शहाणी चिमणी त्यांच्या खांद्यावर बसली. आजींनी मान तिरपी करून पाहिले आणि त्या चिमणीला म्हणाली, ‘‘तुला काय हवंय बयोऽऽ’’
शहाणी चिमणी आजीच्या कानाशी फड्फड् पंख करीत बोलत होती. आजी मान हलवत होती. आजी म्हणाली, ‘‘बयोऽ कळली मला तुझी अडचण. ‘कावळे आम्हाला सतावताना आणि आम्हाला दाणे मिळत नाही. संरक्षण नाही. आणि काय काय!’’
‘‘मी करते तजवीज. पहाल तुम्ही.’’ आजीच्या आश्वासनाने चिमणी आनंदून गेली आणि उडून गेली.
दुसऱ्या दिवशी आजीने आजोबांना फर्मान सोडले. ‘‘दोन दिवसांत मागची पडवी गजांच्या खिडक्या लावून बंद करा. खिडकीतून चिमणी आत येईल.’’
दोन दिवसांत नाही आठ दिवसांत मात्र गजांच्या खिडक्या तयार झाल्या. आजीने पडवीचे दार बंद केले. खिडकीच्या गजातून चिमण्या आत आल्या. सुधावहिनीने सकाळी पडवीत तांदूळ पाखडले होते. त्याच्या कण्या पडल्या होत्या. चिमण्या कण्या फस्त करू लागल्या. आजीने मूठभर तांदूळ परत टाकले. शहाणी चिमणी आजीच्या खांद्यावर बसली आणि आजीला म्हणाली- ‘थँक्यू! थँक्यू’
सुधावहिनी म्हणाल्या, ‘‘चिमण्यांचे फार लाड चाललेत, जणू माहेरवाशिणी.’’
आजी हसून म्हणाली, ‘‘आहेतच माहेरवाशिणी. ही पडवी केली. त्याच्यावर मुद्दाम कौले घातलीत. रात्री या नळ्याच्या कौलात चिमण्या घरटी करून सुखेनैव झोपतील. माणसे तक्रार करतात ना, की चिमण्या गेल्या कुठे! आता प्रत्येकाने पडवीला नळ्यांची कौले घालावी, मी सांगणारच आहे सर्वाना.
सुधावहिनी हसून म्हणाल्या, ‘‘घरातल्या माणसांसारखे जपतात आजी पाखरांना. छान आहे!’’
चिमण्या मनातल्या मनात हसत होत्या. खूप खूश होत्या. एक दिवस आजींचा नातू सुजय पुण्याहून आला. रोज त्याला गोष्ट सांगावीच लागे. आजी निरनिराळ्या गोष्टी सांगायच्या. कधी फुलांच्या कथा, कधी पक्ष्यांच्या कथा, कधी जुन्या कहाण्या, तर कधी म्हणींच्या कथा. चिमण्या म्हणायच्या, ‘‘आजींना कथा येतात तरी किती?’’
..आणि एक दिवस गंमत झाली. आजी चिमण्यांचीच गोष्ट सांगू लागली. शहाण्या चिमण्या चिव चिव न करता खिडकीच्या गजात रांगेत बसल्या. सुजयला गंमत वाटली. तो म्हणाला, ‘‘आजी या चिमण्या शिस्तीत बसल्यात पाहा.’’
‘‘त्या गोष्टी ऐकायला बसल्या आहेत.’’- इति आजी.
‘‘त्यांना गोष्टी समजतात?’’ सुजयने प्रश्न केला.
‘‘या रांगेत खिडक्या आहेत ना त्या गजावर जादू आहे. चिमण्या तिथे बसल्या की त्यांना समजते.’’ सुजयला अशा गमतीची गोष्ट आवडे. सुजयला गंमत वाटली. आजी पुढे गोष्ट सांगू लागली.
‘‘एक मोठे कोठार होते. त्या कोठाराला एका वेळी एक चिमणी जाईल असे भोक होते. एक चिमणी यायची एक दाणा घ्यायची आणि निघून जायची. दुसरी चिमणी यायची एक दाण घेऊन जायची. तिसरी चिमणी यायची एक दाणा घेऊन जायची. चौथी चिमणी यायची एक दाणा घेऊन जायची. पाचवी चिमणी यायची एक दाणा घेऊन जायची.’’
‘‘आजी काय चाललंय? सगळे कोठार संपल्यावर गोष्ट पुढे सांगणार की काय?’’ अजयच्या या प्रश्नावर आजी हसून म्हणाली, ‘‘ही साधी गोष्ट नाही. याच्यात महान अर्थ आहे, म्हणून तर ही गोष्ट पिढय़ान् पिढय़ा टिकून आहे.’’
मागच्या पडवीत झोपाळ्यावर झुलत सुजय कथा ऐकत होता. आजी शेजारी बसली होती. शहाणी चिमणी आजीच्या खांद्यावर बसली. आजी म्हणाली, ‘‘बैस बाई. तूपण गोष्ट ऐकायला आलीस का? छान आहे?’’
शहाण्या चिमणीने मान तिरपी केली. सुजयला गंमत वाटली. तो म्हणाला, ‘‘आजी गोष्ट पुढे सांग ना?’’
‘‘सुजय या गोष्टीला महान अर्थ आहे. कोठाराचे धान्य कधी संपत नाही. तसेच ज्ञानाचे भांडार कधी संपत नाही. आपण सारखं ज्ञानाच्या कोठारात डोकावले पाहिजे. तरच आपण मोठे होणार ना?’’
‘‘आजी समजले मला. भाषेत रूपक अलंकार कालच गुरुजींनी शिकवला. म्हणजे इथे चिमणीचा रूपक अलंकार वापरला आहे.’’
‘‘सुजय मी विसरलेच, तू आता नववीत गेलास नाही का? बरोबर ओळखलेस. कोठार म्हणजे ज्ञानभांडार आणि चिमणी म्हणजे ज्ञानाची असोशी असलेला माणूस.’’
खरंच मावशी किती महान अर्थ आहे या गोष्टीत. खिडकीच्या गजावर बसलेल्या चिमण्या फडफडल्या, त्यांना आनंद झाला. चिमणीची ही गोष्ट म्हणजेच आपलीच गोष्ट. शहाणी चिमणी खूश झाली.
डॉ. लीला दीक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2016 2:04 am

Web Title: story for kids 17
टॅग : Kids Story,Story
Next Stories
1 पुस्तकांशी मैत्री : चांदोबा ते आजोबा
2 फुलपाखरू
3 चित्ररंग : चित्र कापा आणि जोडा
Just Now!
X