18 October 2019

News Flash

नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा!

गजाली विज्ञानाच्या

|| डॉ. नंदा हरम

सोनं कुठे आणि कथिल कुठे? येतय ना लक्षात? कथिलाचा कोणत्या प्रक्रियेशी संबंध आहे? थोडं कठीण आहे तुमच्या लक्षात येणं. कारण कल्हई म्हणजे काय, हेच मुळात माहिती नाही. त्यानिमित्ताने कल्हई म्हणजे काय, हे आता प्रथम बघू. पूर्वी तांब्याची आणि पितळेची भांडी स्वयंपाकाला वापरली जायची. पण आंबट पदार्थ मात्र यात वापरता यायचे नाहीत, कारण त्यांची या धातूंशी रासायनिक प्रक्रिया होऊन पदार्थ खराब व्हायचे. म्हणूनच या भांडय़ांना आतून कथिल या धातूचा (टिन, रल्ल) पातळ थर दिला जायचा. याच प्रक्रियेला म्हणायचे कल्हई करणं. असो. आता आपल्या म्हणीकडे वळू या.

तुम्ही सगळीच मुलं लिहिताना किंवा चित्रं काढताना पेन्सिल वापरता. साधारणपणे आपण त्याला काय म्हणतो? बरोब्बर! शिसपेन्सिल. त्यामुळे आपल्याला काय वाटतं? त्यात शिसं वापरलं आहे. गंमत म्हणजे यात शिशाचा (लेड, ढु) कुठे अंशच नसतो. या पेन्सिलीत जी काडी वापरलेली असते ती असते ग्रॅफाइटची. ग्रॅफाइट हे एक कार्बनचंच रूप आहे.

तुमच्या मनात प्रश्न आला असेल, की मग ‘शिसपेन्सिल’ हे नाव का रूढ झालं? त्याची कथा अशी- सोळाव्या शतकात इंग्लंडमधील बॉरोडेल येथे प्रथमच शुद्ध घनरूपी ग्रॅफाइटचे मोठ्ठे साठे सापडले. धातू वैज्ञानिकांना हे नेमकं काय आहे ते कळलं नाही. त्यांना वाटलं की, हे बहुतेक काळसर रंगाचं शिसं असावं. ते त्याला ‘प्लमबॅगो’ संबोधू लागले. हा शिशाकरिता असलेला लॅटिन शब्द ‘प्लंबम’ यावरून तयार झाला. ते ग्रॅफाइट आहे, हे कळल्यानंतरही शब्द तसाच राहून गेला.

ग्रॅफाइट घनरूप असलं तरी ठिसूळ असतं. पटकन मोडतं. म्हणून ते वापरताना लोकांनी पोकळ लाकडात टाकून किंवा त्याभोवती कातडं गुंडाळायची युक्ती शोधली. कागदावर किंवा इतर पृष्ठभागावर लिहिण्यासाठी किंवा खुणा करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर आपोआपच पेन्सिलीचा जन्म झाला आणि मूळ नाव ‘ब्लॅक लेड पेन्सिल’ तसंच राहिलं.

nandaharam2012@gmail.com

 

First Published on April 21, 2019 12:02 am

Web Title: story for kids 21