‘‘अमू उठ रे, चल आवर पटपट.’’ आईने आठव्यांदा ते दहाव्यांदा हाक मारली. अमू पाच-सहा हाकांपूर्वीच जागा झाला होता, पण त्याची ही रोजचीच गंमत होती. पांघरूणाच्या आडून तो कानोसा घेई आणि त्यावरून आता आई काय करतेय ते अचूक ओळखे. त्यात आज शेजारच्या मंडपातून देवीच्या आरतीचे स्वरही कानी पडत होते. चर्र्र.. भाजी फोडणीला पडल्याचा रोजचा आवाज कानाने अचूक टिपला. म्हणजे कणीक भिजवूनही झालेली होतीच. आजी-आजोबांनी चहा पिऊन रिकाम्या झालेल्या कपबशा मघाशीच किणकिणल्या होत्या. आता आई दादाचा डबा पुसतेय. तो दोन डबे नेतो नं. एक खाऊचा आणि एक पोळीभाजीचा. ‘‘अरुण, टॉवेल ठेवलाय बाथरूममध्ये’’ हे बाबांसाठी होतं. पहिली पोळी तव्यावर पडली होती. तिचा वास अमूपर्यंत पोहोचलाच. ‘‘अमू, उठ रे आता’’ आईची काकुळती. भाजीत मीठ-मसाला पडला होता. त्याचा वासही अमूच्या नाकापर्यंत पोहोचला.
आज नाश्त्याला उप्पीट. दादाचा चमचा भरभर वाजतोय. उप्पीट म्हणजे एकदम फेव्हरिट डिश होती त्याची. परफेक्ट अंदाज. ‘‘हे काय गं? उप्पीटात शेंगदाणे नाहीत?’’ दादाची कुरकुर. ‘पुढच्या वेळी घालीन हं.’ बोलता बोलताच आईची पावलं वाजली. दादासमोर दुधाचा ग्लास ठेवला असणार. ‘‘उदबत्त्या माझ्या पर्समध्ये आहेत.. काल आणल्यात.’’ हे बाबांसाठी. मध्येच किचनमधला नळ चालू होतोय, बंद होतोय, फ्रिज उघडतोय, मायक्रोवेव्ह चालतोय. मिक्सर आवाज करतोय, सगळं कसं झटझट चालू आहे. साडेआठपर्यंत हे सगळं चालेल. डबे, बाटल्या भरणं, नाश्ते-चहा करणं, आजी-आजोबांचा स्वयंपाक बनवणं, संध्याकाळच्या खाण्याची तयारी. मग आई अमूला घेऊन बाहेर पडेल. टीचरनी शाळेत गोष्टीत सांगितलं की, झाशीची राणी आपल्या बाळाला पोटाशी बांधून इंग्रजांशी लढली. ते आठवलं अमूला. गाडीवर आपल्याला पाठीशी घेऊन वाहनांची गर्दी, खड्डे, सिग्नल यांच्यावर मात करत जपत जपत त्याला शाळेत सोडेल. जाता जाता त्याला अनेक सल्ले देईल. त्याच्या शंकांचं निरसन करील. ते करतानाच वाटेत फुलवालीकडून गजराही घेईल. आजीला त्या कोणा माईंना डब्यातून काही पोहचवायचं असेल तर दोन मिनिट थांबून तो डबाही देईल. शाळेत बाईंशी हसून बोलेल. बाईंकडे अमूची व्यवस्थित चौकशी करील.
 तशीच ती पुढे ऑफिसला जाईल. केवढं ते आईचं ऑफिस. बाप रे बाप! कित्ती कित्ती धावपळ चाललेली असते सगळयांची. कित्ती प्रकारचे क्लाएंटस् येतात तिथे. त्यांचे अनेक प्रश्न, शंका, सल्ले, सूचना.  एकदा अमू गेला होता ना आईबरोबर तिच्या ऑफिसात. एक-दोन तासांतच कंटाळला. आईला क्षणाचीही उसंत नव्हती. सतत काहीना काही काम होतंच. पण ती ते हसतमुखानं करत होती. ना चिडचिड ना वैताग. ‘‘आई, असंच काम असतं का गं रोज?’’ अमूने हळूच विचारलं होतं. ‘‘हो रोजचंच आहे हे.’’  हे सगळं आठवत असतानाच आरतीचे स्वर कानी पडतच होते- ‘अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो।। उदो बोला उदो..’ आरती ऐकता ऐकताच तो आईचा विचार करू लागला. एवढं सगळं काम करून परत येताना आई भाजी आणते, कधी कधी बिलं भरते, दादा किंवा अमूसाठी काही गिफ्ट्सही आठवण ठेवून आणते. आजी-आजोबांची औषधं न विसरता खरेदी करते. रात्री परत स्वयंपाक, अमूचा अभ्यास, उद्याची तयारी वगरे वगरे आहेच. कित्ती कित्ती काम करते नं आई! आत्ता अमूला जाणवलं. आईच नाही काही फक्त तर रिमामावशी, निलूआत्या, वीणाकाकू, माधवीमामी सगळ्याच असं दिवसरात्र काम करत असतात. त्याच का कामवाल्या सखूबाई, पाळणाघरातल्या ताई, शाळेतल्या टीचर सगळ्या असंच काम करत असतात. आजीही असंच दिवसभर कामात असायची म्हणे! अमूला आजी म्हणत होती ते आठवलं. म्हणजे बापरे, या सगळ्याजणी या वेगवेगळ्या आघाडय़ा किती यशस्वीपणे सांभाळत असतात. आरतीचे स्वर कानी आले- ‘चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो. उपासकां पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो।। उदो बोला उदो’ हे ऐकता ऐकता त्याचं मन विचार करून लागलं, आमच्या वर्गातली सायलीही असंच करील मोठेपणी? अमू एकदम चपापला. त्याला आठवलं, काल आपण सायलीशी भांडताना ती मुलगी आहे म्हणून कित्ती टोमणे मारून बोललो होतो आणि प्रत्येक वेळी ‘मुलगी आहेस नं तू, तुला काय समजतंय’, असं हिणवलं होतं. आज शाळेत गेल्या गेल्या सायलीला ‘सॉरी’ म्हणायचं या विचारासरशी तो ताडकन अंथरूणातून बाहेर पडला आणि समोर त्याचीच वॉटरबॅग भरून घेऊन येत असलेल्या आईला बिलगत म्हणाला, ‘‘लव्ह यू आई.’’ पाणी सांडून आई ओरडली तरी त्याला पर्वा नव्हती.