18 October 2019

News Flash

एकीचं बळ मोठं असतं

गजाली विज्ञानाच्या - ही म्हण वाचल्यावर एक काठी आणि काठय़ांची मोळी हे चटकन आठवलं असेल, नाही!

|| डॉ. नंदा हरम

ही म्हण वाचल्यावर एक काठी आणि काठय़ांची मोळी हे चटकन आठवलं असेल, नाही! आज आपण एवढय़ा चिटुकल्या मुंग्या एकत्र येऊन कसं आश्चर्यजनक काम करतात ते बघू या.

लॉंगहॉर्न क्रेझी अँट, म्हणजे या मुंग्यांना िशगासारख्या दोन लांब मिशा किंवा स्पृशा असतात. इतर मुंग्या सरळ रेषेत चालतात, तर या कशाही वेडय़ावाकडय़ा चालतात म्हणून क्रेझी. या मूळ आफ्रिकेतील, पण आता जवळजवळ जगभर सापडतात. मुंग्यांना जेव्हा अन्नाचा साठा सापडतो तेव्हा त्या फेरामोन म्हणजे विशिष्ट रसायनाच्या मदतीने एकमेकांशी संपर्क साधतात. त्यांना ते अन्न आपल्या वारुळात न्यायचं असतं. हे अन्न वारुळात घेऊन जायच्या दोन पद्धती-एकतर अन्नाचा कण चावून चावून छोटा करून प्रत्येक मुंगी तो कण घेऊन जाते. किंवा तो तुकडा आकाराने मोठा असेल, तर सर्व मुंग्या मिळून तो तुकडा वाहून नेतात. दुसऱ्या पद्धतीत अन्न वेगाने घेऊन जाता येतं, म्हणून परिणामकारक आहे.

या दुसऱ्या पद्धतीत मुंग्यांमध्ये सुसंगती असणं महत्त्वाचं असतं. दुसरी अडचण अशी की, अन्नाचा तुकडा पकडलेला असताना त्यांच्या स्पृशांना मिळणाऱ्या रासायनिक संवेदनेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वारुळाकडे चाललेलं त्यांचं मार्गक्रमण थोडंसं भरकटतं. पण आजुबाजूला मोकळ्या फिरणाऱ्या मुंग्यांना वारुळाची दिशा नीट माहिती असते. त्या तिथे येऊन त्यांना योग्य मार्गावर आणतात. थोडय़ा अंतरावर गेल्यानंतर परत त्या भरकटतात, तर दुसरी मोकळी असलेली मुंगी येऊन योग्य दिशा दाखवते.

अशीच एक नवलाई दक्षिण अमेरिकेतल्या फायर अँटस्ची. जेव्हा त्यांच्या वारुळाजवळ पाण्याची पातळी वाढते, तेव्हा त्या एकमेकींना धरून जणू काही तराफाच तयार करतात, जो पाण्यावर तरंगतो. या तराफ्यात कामकरी मुंग्या बाहेरच्या बाजूला तर राणी मुंगी आतल्या बाजूला असते. अंडकक्ष सर्वात वरच्या बाजूला हलविला जातो, तर काही वेळेला अंडी आणि छोटय़ा अळ्यांना वगळून अंडकक्षाचा तराफ्याचा पाया म्हणून वापर केला जातो. अशा तऱ्हेने हा तराफा १२ दिवस राहू शकतो. पाण्यात बुडालेल्या मुंग्या बुडबुडय़ांच्या आधारे वर पृष्ठभागावर येतात.

nandaharam2012@gmail.com

First Published on May 5, 2019 12:05 am

Web Title: story for kids 24