|| मृणाल तुळपुळे

जेसनच्या रेनडियर्सच्या कळपात आता पाच छोटय़ा छोटय़ा पिल्लांची भर पडली होती. त्या पाचही जणांना जेसनने नाताळसाठी गळ्यात बांधायला पाच सुंदर घंटा आणल्या व त्या रंगीबेरंगी रिबिनीत घालून त्यांच्या गळ्यात बांधल्या. ती छोटी रेनडियर्सची पिल्ले इकडून तिकडे पळायला लागली की त्या घंटांचा छान आवाज यायचा. त्या पाच पिल्लांपकी रॉबिन फार हुशार आणि धिटुकला होता व तो जेसनचा अगदी लाडका होता.

रॉबिनसारखे बर्फाळ प्रदेशात रहणारे रेनडियर्स तिथे उगवणाऱ्या काही विशिष्ट झुडपांचा पाला, बर्फाखालचे शेवाळे व गवत असे खातात. ते आपल्या पुढच्या पंजाने बर्फ खणतात व त्याच्या खाली असलेले शेवाळे आणि पाण्यातले मासे खातात. आपल्या रेनडियर्सना त्यांचे अन्न शोधण्यासाठी जेसन रोज बाहेर घेऊन जात असे.

एके दिवशी नेहमीप्रमाणे जेसन आपल्या सगळ्या रेनडियर्सना चरायला घेऊन गेला. लहान पिल्ले आपल्या आईबरोबर चालत होती. सगळे जण रमत गमत, गप्पा गोष्टी करत गवत आणि पाला शोधत होती. रॉबिन आणि इतर लहान रेनडियर्स गवत शोधताना बर्फात खेळत होती. खेळता खेळता रॉबिन इतर रेनडियर्सपासून खूप दूर गेला.

तिथे असलेल्या एका फर्नच्या झाडाजवळ पांढरे अस्वल बसले होते. त्याला घंटेचा आवाज ऐकू आला म्हणून तो इकडे तिकडे बघू लागला तर त्याला रॉबिन दिसला. अस्वल त्याला बघून खूश झाले व मनात म्हणाले, ‘बरं झालं आयती शिकार चालून आली.’ त्याच वेळी रॉबिननेदेखील अस्वलाला त्याच्या दिशेने येताना पाहिले. तो खूप घाबरला आणि समजून चुकला की आता आपले काही खरे नाही. अस्वल आपल्याला खाऊन टाकणार.

एवढय़ात अस्वल रॉबिनच्या जवळ आले व त्याने रॉबिनच्या पाठीवर आपला पंजा ठेवला. ते म्हणाले, ‘‘आता मला तुझे लुसलुशीत आणि कोवळे मास खायला मिळणार.’’

रॉबिन हुशार होता. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. आपण जर गळ्यातली घंटा वाजवली तर तिचा आवाज ऐकून जेसन येईल आणि आपली या अस्वलाच्या तावडीतून सुटका करेल. प्रसंगावधान ठेवून तो अस्वलाला म्हणाला, ‘‘तू मला जरूर खा, पण  थोडय़ा वेळाने. आता माझे पोट नुसते शेवाळे, गवत आणि झाडपाल्यांनी भरले आहे. मी जरा इकडून तिकडे उडय़ा मारतो म्हणजे मी खाल्लेले गवत, पाला आणि शेवाळे पचेल आणि मग तू मला जरूर खा.’’अस्वलाला रॉबिनचे म्हणणे पटले. ते म्हणाले, ‘‘तू उडय़ा जरूर मार, पण पळून जायचा प्रयत्न केलास तर मी झडप घालून तुला पकडेन.’’

त्यावर रॉबिन म्हणाला, ‘‘मी अजिबात पळून जात नाही, फक्त खाल्लेले अन्न पचण्यासाठी उडय़ा मारतो.’’ असे म्हणून तो जोरजोरात उडय़ा मारू लागला. उडय़ा मारताना त्याच्या गळ्यातली घंटादेखील जोरजोरात वाजू लागली.

इकडे कळपात रॉबिन दिसला नाही म्हणून जेसन आणि इतर रेनडियर्स त्याला शोधू लागले. शोधता शोधता जेसनला घंटेचा ओळखीचा आवाज आला. तो त्या आवाजाच्या दिशेचे जाऊ लागला तर त्याला पाईनच्या झाडाखाली बसलेले पांढरे अस्वल दिसले. गळ्यात लाल रिबिन बांधलेला रॉबीन अस्वलासमोर उडय़ा मारत होता आणि त्याच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज येत होता. जेसनने इतर रेनडियर्सना खूण केली व ते सगळे जेसनच्या मागे अस्वलाच्या दिशेने गेले. जवळ गेल्यावर जेसनने आपल्या हातातल्या बंदुकीचा हवेत बार काढला. बंदुकीच्या आवाजाने व एवढे सारे रेनडियर्स त्याच्या दिशेने येताना बघिल्यावर अस्वल घाबरले व त्याने तिथून धूम ठोकली.

जेसनला आणि आपल्या आईला बघितल्यावर रॉबिनला हायसे वाटले. त्याने गळ्यातली घंटा आणखी जोरात वाजवून आपला आनंद व्यक्त केला. उडय़ा मारून मारून दमलेला रॉबीन आईजवळ गेला आणि थोडा वेळ तिला बिलगून बसला. जेसनने रॉबिनला जवळ घेतले आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला म्हणाला, ‘‘आज तुझ्या हुशारीमुळे आणि आणि या घंटेच्या आवाजामुळे तू अस्वलाच्या तावडीतून वाचलास.’’

mrunal mrinaltul@hotmail.com