22 October 2019

News Flash

आम्ही सारे चमत्कारी!

‘‘मग नं त्या बुवांनी हवेतून हात फिरवला आणि अथर्वच्या बाबांना सोन्याचं घडय़ाळ दिलं.’’

|| कविता जोशी

‘‘मग नं त्या बुवांनी हवेतून हात फिरवला आणि अथर्वच्या बाबांना सोन्याचं घडय़ाळ दिलं.’’ ओम अगदी भारावून बोलत होता.

‘‘एकदा तर त्यांनी हवेतून गुलाल काढून रामूकाकाच्या कपाळावर लावला. त्याला म्हणाले, ‘‘बेटा, तू नशीबवान आहेस.’’

आई हसू दाबत सारं ऐकत होती.

‘‘आई, आपणपण त्या बुवांना घरी बोलवू या नं! मग आपल्याला ते सोन्याचं घडय़ाळ नाहीतर चेन देतील.’’

‘‘आणि त्या घडय़ाळाचं काय करायचं? आपल्या सगळ्यांकडे मनगटी घडय़ाळं आहेतच. शिवाय मोबाइलमध्येही घडय़ाळ असतं.’’ आई म्हणाली.

‘‘मग आपण सोन्याची चेन मागू या.’’ ओम काही स्वत:चा मुद्दा सोडेना.

‘‘असं कर, तू त्यांना एक विमान द्यायला सांग खरं खरं, तुला पायलट व्हायचंय नं?’’

ओम हिरमुसला. घरातलं कोणीच त्या बुवावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेतून येताना ओम अथर्वला घरी घेऊन आला.

‘‘आई, हे बघ ते महाराजांनी दिलेलं घडय़ाळ!’’ ओम दप्तर फेकत म्हणाला.

तेवढय़ात ताईही आली, ‘‘बघू, बघू! अरे हे तर कायसनचं आहे.’’

‘तेवढय़ात शेजारचा सनीदादाही आला. ‘‘बघू कोणतं मॉडेल आहे? हं हे तर ‘सुनाली’ आहे. दोन हजारांत मिळतं. पण सोनेरी पट्टा आहे म्हणजे तीन हजारांपर्यंत असेल किंमत.’’ सनीने माहिती पुरवली.

‘‘काय रे, तुझ्या बाबांना सोनेरी घडय़ाळ आणि रामूकाकांना नुसता गुलाल?’’ ताईनं भोचकपणे विचारलं.

‘‘रामूकाका नोकर आहेत.’’ अथर्व म्हणाला.

‘‘गरीबाला कोण महागडं घडय़ाळ देणार!’’ आई म्हणाली.

अथर्व खाऊ खाऊन घरी गेला आणि ओमच्या घरात सभाच भरली.

‘‘पाहिलंस ओम? अथर्वचे बाबा श्रीमंत म्हणून त्यांना महागडं घडय़ाळ आणि रामूकाका गरीब म्हणून त्यांना नुसता गुलाल, बरं का!’’ सनी म्हणाला.

‘‘ओम, तू गरीब की श्रीमंत?’’ रिनीनं हसत हसत विचारलं.

तेवढय़ात ताईने खोलीत एंट्री घेत एक गिरकी घेतली. त्याच वेळेस तिने तिचा दुपट्टा झटकला. त्यातून पाच-सहा चॉकलेट्स पडली.

‘‘अरे व्वा! ताईनं पण चमत्कार केला!’’ आई हसत म्हणाली.

‘‘पण ही तर मँगो ड्रॉप्स आहेत. ही दुकानात मिळतात.’’

‘‘मग कायसनची घडय़ाळंसुद्धा दुकानात मिळतात.’’

‘‘आणि गुलाल तर काय भरपूर!’’

तेवढय़ात सनीदादाने हवेत हात गोल गोल फिरवला आणि ओमच्या कपाळावर टेकवला.

‘‘बेटा, तुम बहुत नसीबवाले हो.’’ दादा घोगऱ्या आवाजात म्हणाला, त्याबरोबर सारे हसू लागले.

ओमने कपाळाला हात लावला तर राखाडी रंगाची पावडर होती.

‘‘बघ, आम्ही सारेच चमत्कारी बाबा आहोत.’’ ताई म्हणाली.

ओमला काय बोलावं. कळेचना.

शेवटी ताईनंच विचारलं, ‘‘तुला बनायचंय चमत्कारी बाबा? हे बघ!’’

ताईनं दुपट्टय़ाच्या एकावर एक घडय़ा घालून त्यात चॉकलेट्स कशी लपवायची मग त्यांचा पाऊस कसा पाडायचा ते दाखवलं.

सनीदादाने राखेची गोळी दोन बोटांमध्ये बसवून ती कशी हवी तेव्हा चुरून कपाळावर लावायची ते दाखवलं.

‘‘पण ते हवेतून घडय़ाळ?’’ ओमचं परत तेच.

‘‘ते दुकानातून आणून शर्टच्या बाहीत लपवायचं.’’

‘‘हे सर्व चमत्कार नाहीत ओम, हातचलाखी असते.’’ आईनं समजावलं.

‘‘अशी जर घडय़ाळं हवेतून काढता येत असती तर घडय़ाळ्याच्या कारखान्याची गरजच नव्हती नं!’’

ओमला आपली चूक कळली.

पुन्हा कधीही कोणत्याही चमत्काराला फसायचं नाही असं त्यानं ठरवून टाकलं.

kavitajoshi@gmail.com

First Published on June 1, 2019 12:04 am

Web Title: story for kids 26