14 December 2019

News Flash

आमचा लाडका ब्लूबेल

जसा तो म्हातारा झाला तसं त्याने पोहणं सोडून दिलं आणि दगडांवरच बसायला लागला.

|| आरोही आशुतोष जावडेकर

आम्ही जेव्हा छोटय़ा बेट्टा फिशला घरी आणलं, तेव्हा सुरुवातीला त्याला काचेच्या एका भांडय़ामध्ये ठेवलं आणि तीन महिन्यांनंतर फिश टँकमध्ये सोडलं. त्या फिश टँकमध्ये रंगेबिरंगी दगड ठेवून दिले. तो एक बुद्धिमान मासा होता. त्याचं नाव आम्ही ‘ब्लूबेल’असं ठेवलं. आई-बाबा आणि मला तो खूप आवडायचा. माझी आई त्याच्यासाठी त्याची आईच झाली होती. आम्ही त्याला राजपुत्रासारखं वागवलं. तो एक फायटर फिश होता. आम्ही त्याला घरी आणलं होतं २१/०६/२०१८ या दिवशी. मला तो खूप आवडायचा. तो मला माझ्या भावासारखाच होता. मी निळा ड्रेस घातला की ब्लूबेलला खूप आवडायचं. त्याला पोहायलाही खूप आवडायचं. आम्ही हाक मारली की तो लगेच वर यायचा आणि बुडबुडे सोडायचा; पण जसा तो म्हातारा झाला तसं त्याने पोहणं सोडून दिलं आणि दगडांवरच बसायला लागला.

आम्ही जेव्हा टँकची सफाई करायचो तेव्हा आमच्या घरी काम करणाऱ्या वनितामावशी दगडं आणि माशाचं घर साफ करायच्या आणि माझा बाबा पाणी बदलायचा. बाबा तेव्हा त्याला नेटमधून एका बाउलमध्ये तात्पुरता ठेवून द्यायचा. जेव्हा परत स्वच्छ टँकमध्ये ब्लूबेल जायचा तेव्हा तो खूप खूश व्हायचा. तेव्हा कधी कधी तो  नेटमधून उलटय़ा बाजूने जाण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा बाबा त्याला सांगायचा, ‘‘ब्लूबेल, पाण्यात जा पुन्हा.’’

काही दिवसांपूर्वी रात्री आईला बाबाचा फोन आला आणि आई रडायला लागली. मी आईला विचारलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘ब्लूबेल आता मरणार आहे.’’ मग मलापण खूप रडू आलं. आईने देवाकडे प्रार्थना केली की, ब्लूबेलला काही त्रास न होता तो जाऊ  दे. सकाळी तो गेला तेव्हाही मला खूप रडायला आलं. आम्ही त्याला कुंडीत पुरलं आणि मी त्याचं एक चित्र काढलं आणि त्याच्यावर लिहिलं : रेस्ट इन पीस ब्लूबेल.

(इयत्ता- तिसरी, बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, पुणे)

First Published on June 15, 2019 4:40 pm

Web Title: story for kids 28
Just Now!
X