19 October 2019

News Flash

आयत्या बिळात नागोबा

कोकिळा आपलं अंडं दुसऱ्या पक्ष्याच्या घरटय़ात घालते, असं तुम्ही ऐकलं असेल.

|| डॉ. नंदा हरम

कोकिळा आपलं अंडं दुसऱ्या पक्ष्याच्या घरटय़ात घालते, असं तुम्ही ऐकलं असेल. हो, ते खरंही आहे! कोकिळेच्या ५९ जाती अशा प्रकारे अंडय़ाच्या बाबतीत परोपजीवी असतात. त्यांचं हे वागणं अगदी आपल्या म्हणीला अनुसरून आहे. पण त्या असं का वागतात? त्या आळशी असतात का? नाही, त्या चतुर असतात. अंडी दुसऱ्याच्या घरटय़ात घातल्याने अंडी उबविण्याकरिता लागणारा वेळ व शक्ती वाचते. त्याच वेळात ती जास्तीत जास्त अंडी घालण्याचा प्रयत्न करते, तसेच अन्नाचा साठा करते. आहे की नाही हुशार?

अंडी दुसऱ्याच्या घरटय़ात घालण्याकरिता वेगवेगळ्या युक्तींचा वापर केला जातो. दुसऱ्या पक्ष्याच्या घरटय़ातल्या अंडय़ासारखा तिच्या अंडय़ाचा रंग असतो. कोकिळेच्या अंडय़ाचं कवच दोन थरांचं बनलेलं असतं. हे कशाकरिता? तर दुसऱ्याच्या घरटय़ात अंडं टाकताना ते फुटू नये. या अंडय़ातून पिल्लंही आश्रयदात्याच्या पिलांच्या आधी बाहेर पडतात, अन्नाचा तुटवडा पडू नये म्हणून.. ही लवकर बाहेर पडलेली पिल्लं आश्रयदात्याची अंडी बाहेर टाकतात. हे त्यांना कुणी शिकवतं का, की हे सारं उपजतच असतं?

काही जातींमध्ये तर कोकीळ आश्रयदात्याला दुसरीकडे आकर्षून घेतो. त्यामुळे तो घरटय़ाजवळ नसताना मादी आपलं अंडं सुरक्षितपणे त्या घरटय़ात घालू शकते. आश्रयदाता हे सगळं निमूटपणे सहन करत नाही. तोही पाहुणी अंडी बाहेर टाकून देतो किंवा चोच मारून फोडतो. पण परोपजीवींना हे समजलं की ते या आश्रयदात्यांवर हल्ला करतात. त्यांचं घरटं उद्ध्वस्त करतात किंवा त्यांच्या पिल्लांना मारून टाकतात. याला ‘माफिया हायपोथेसिस’ म्हणतात. पण या क्षणी या वर्तनाकरिता तुम्हाला कोणती म्हण आठवते? बुद्धीला ताण द्या.. बरोब्बर ओळखलंत!  ‘चोर तो चोर, वर शिरजोर!’

इथं मी कोकिळेचा अंडय़ांच्या बाबतीतला परोपजीवी प्रकार उद्धृत केला. पण हे काही एकमेव उदाहरण नाही. हाच प्रकार इतर काही पक्ष्यांमध्ये, मासे व कीटकांमध्येही आढळतो. त्याविषयीची माहिती तुम्ही शोधाल?

nandaharam2012@gmail.com

First Published on June 15, 2019 4:40 pm

Web Title: story for kids 29