14 December 2019

News Flash

टीपकागद व्हा!

दरवर्षी या दिवशी मज्जा असते ती प्रत्येक वर्गाची. हा दिवस माझ्यासाठी नसतोच जणू काही.

|| मेघना जोशी

दरवर्षी या दिवशी मज्जा असते ती प्रत्येक वर्गाची. हा दिवस माझ्यासाठी नसतोच जणू काही. कोणी साधा कटाक्षही टाकत नाही माझ्याकडे. फक्त शिपाईकाका झाडलोट करतात तेवढीच. पण आज मात्र गंमतच झाली. सकाळी गेट उघडल्यापासून शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी माझीच चौकशी करतोय. मला भेटायला ते उत्सुक झालेत, कारण सुट्टीच्या शेवटच्या दिवशी झालेलं ते ‘टीपकागदा’चं शिबीर. आवारात येणारा प्रत्येक विद्यार्थी स्वत:मधला किंवा स्वत:चा टीपकागद शोधून आलाय हे त्याच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं. आणि मी उपलब्ध झालो तर सगळ्या शाळेच्या समोर तो टीपकागद त्यांना सादर करता येणार होता, म्हणूनच ते माझी चौकशी करत होते. आता लक्षात आलं ना, मी कोण आहे?  बरोबर, बरोबर.. मीच तो शाळेचा मध्यवर्ती हॉल. जिथे सर्व शाळा एकत्र येत असते. तर अशा रीतीने आज माझं महत्त्व वाढलेलं आहे आणि मलाही नवीन काही पाहायला मिळणार आहे, म्हणून मीही मोहरलो आहे.

ऐका, ऐका, स्पीकरवरून काहीतरी सूचना दिली जातेय. ओहो, सगळ्या विद्यार्थ्यांना बोलावलं जातंय माझ्याकडेच. अरे वा! माझी चंगळच आहे आज. हे सारे जण काही ना काही नावीन्यपूर्ण गोष्ट घेऊन आलेच असणार. (नकळत हॉलचं छप्पर काहीसं ताठ होतं) बघा, बघा, सगळे कसे उत्साहात येतायत! आठवीतले ते चौघे जण आणि नववीतल्या दोघी जणी काय बोलतायत? त्यांनी नाटक लिहून सादर केलं, तेही गावातल्या मोठ्ठय़ा नाटय़गृहात. वा रे दोस्तो! आणि दहावीतल्या रजाकने भालाफेकीचा सराव केला. अनेकांनी कविता केल्यायत. पाहा पाहा! एकमेकांना वाचून दाखवतायत. चित्रं कित्ती जणांच्या हातात आहेत! खूपच आहेत चित्रकार. विहान नि मीराने एका मोठ्ठय़ा कापडावर सुंदर पेन्टिंग केलंय. कित्ती आनंदाने दाखवतायत सगळ्यांना. माझ्या िभतीवर लावणारेत म्हणे. भारीच वाटतंय बुवा मला. आणि हे काय, मोहकने बाहुल्या आणल्यात कळसूत्री. वा! वा! आणि तिकडे पाचवीतली दोन-चार जणं हॅन्ड पपेट्स नाचवतायत, कार्यक्रम बसवलाय म्हणे. हर्षदाने काय सुंदर मातीच्या मूर्त्यां केल्यायत, बहोत खूब!  काय म्हणत्येय ती.. हा, हा, अजून आहेत म्हणे घरी पण बसमधनं कशा आणणार, तेही खरंच म्हणा. अहो, या इथेच ठेवणारेय म्हणे स्टेजच्या बाजूला. कसलं छान वाटतंय मला. तिकडे मुग्धा नि बसंतीजवळ काय पाहतायत सगळे निरखून. बापरे! मेडल्स नि सर्टिफिकेट. पोहण्याच्या शिबिरांमध्ये मिळवलीत त्यांनी. काय काय केलंय या मुलांनी सुट्टीमध्ये.. तब्बेत एकदम खूश. ए, ए, चूप, चूप, प्रार्थनेची घंटा झाली. आवाज बंद, बंद एकदम.

खरं सांगू का, खूप भारी वाटतंय. सुट्टी छान घालवली मुलांनी. अरेच्चा! संपली प्रार्थना. काय सांगतोय संदेश सर्वाना? कोणी कोणी काय काय केलं त्याचं सादरीकरण करायचंय. बघा नं, मानसीची गोष्ट कित्ती अप्रतिम! नि काय नकला करतोय निशांत. सगळेजण खोखो हसत सुटलेयत. मुख्याध्यापकांचीही नक्कल केली त्यानं, तेही हसतायत. बाजूच्या कोपऱ्यात काय आहे ते. व्हिडीओ कॅमेरा! चित्रीकरण करतायत म्हणे सगळ्या कार्यक्रमाचं. काय बुवा एक एक! भाग्यच माझं! ती बघा, दहावीतल्या श्रेयसची आईवरची कविता ऐकून सगळे डोळे टिपतायत. आणि फळ्यावर काय चाललंय ते? दोन्ही हातांनी चित्र काढतेय सलोनी. वा वा!  अरेच्चा! दुसऱ्या फळ्यावर अर्कचित्र काढतोय का तो, अरे अरे! हळू, केवढय़ा त्या टाळ्या, छप्पर उडेल बाबा माझं.

आठवीतल्या अथर्वला कशाला खुणावतायत सारे? आणि अथर्वच्या बाजूचा तो मुलगा नवीन दिसतोय. बापरे! कोणत्यातरी खेडय़ातल्या शाळेतून आलेला दिसतोय. पण मुख्याध्यापक का विचारतायत अथर्वला त्या मुलाबद्दल? अरे, त्यांना माहीत नाही शाळेत नवीन आलेला विद्यार्थी? असं कसं होईल? थांबा! थांबा! लक्षपूर्वक ऐकतो.  तो अथर्वचा मामेभाऊ- रोहन. एक दिवसापुरताच या शाळेत आलाय म्हणे. अथर्वनेच आणलंय त्याला. गावातल्या शाळेत सहावीतून सातवीत गेला.

अथर्व काय म्हणतोय ते सारेच ऐकू या. ‘‘सर, मी सुट्टीत चार दिवसांसाठी मामाच्या गावाला गेलो आणि माझे डोळे उघडणाऱ्या गोष्टी दिसल्या. मला विज्ञानाची खूप आवड आहे, पण आपल्या शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा नाही म्हणून मी सतत कुरबुर करत असायचो. पण रोहनने घरात वापरलेलं विज्ञान बघून माझी तक्रार म्हणजे ‘नाचता येईना, म्हणे अंगण वाकडे’ अशी परिस्थिती आहे हे मला पुरेपूर समजलं. रोहनने किती साध्या, पण महत्त्वाच्या गोष्टी केल्यायत सर विज्ञान वापरून. आजीचा टॉर्च रात्रीच्या काळोखात सापडत नाही म्हणून रेडिअमची पट्टी लावलीय त्यावर. आईच्या डोक्यावरून बुट्टी घसरते म्हणून प्लास्टिकच्या तुकडय़ापासून निवणं बनवलंय त्यानं. नि आईला स्वयंपाकघरातून बाहेर कोण आलंय ते दिसावं म्हणून एका कोपऱ्यात आरसा लावलाय. त्याच आरशाचा अँगल बदलून आमची मामी स्वयंपाक करता करता टी. व्ही. पाहते आरशात. ताईच्या पिना हरवतात म्हणून त्याने चुंबक वापरलाय आणि तेच स्वयंपाकघरात चमचे हरवू नयेत म्हणून. कप्पीची आयडिया आजोबांना नि मामांना सांगत त्यांचे खळ्यावरून वाडय़ात धान्य वाहून आणायचे. श्रम कित्ती कमी केलेत यानं. सर माझ्या लक्षात माझी चूक आलीय. विज्ञान वापरण्यासाठी प्रयोगशाळा हवीच, पण ती नसेल तर जग ही प्रयोगशाळा आहे, फक्त दृष्टी हवी. अजून खूप काही आहे सांगण्यासारखं. रोहन, सांग ना माझ्या मित्रांना..’’ अरे, कित्ती काय काय केलंय या इटुकल्या रोहननं आणि तो आठवीचा वर्ग काय ओरडतोय अथर्वबद्दल. तो म्हणतोय, ‘इतरांचे सद्गुण टिपणारा आणि नि:संकोच मान्य करणारा टीपकागद म्हणजे आमचा अथर्व!’

joshimeghana.23@gmail.com

First Published on June 15, 2019 4:40 pm

Web Title: story for kids 30
Just Now!
X