18 October 2019

News Flash

असा कसा ससा?

ससा आणि कासवाची गोष्ट सर्वाना माहीतच आहे.

|| श्रीनिवास बाळकृष्णन

ससा आणि कासवाची गोष्ट सर्वाना माहीतच आहे. गुणवत्ता असूनदेखील सशासारखा आळशीपणा केल्याने आपण मागे राहू, हे बिंबवण्यासाठी पालक लहानपणापासून ही गोष्ट सांगत असतात. त्यामुळे ससा हा वेगाने पळणारा, पण आळशी असतो असे मी लक्षात ठेवले. मग पाठीवर झाडाचं पान पडल्याने जंगलभर पळणाऱ्या सशाची गोष्ट ऐकली.

ससा जाम भित्रा असतो, याचीही मी नोंद केली. मग मी ससा पाळलाच. त्याचे निरीक्षण केल्यावर लक्षात आले की खरं तर ससा मांजरीसारखा झोपाळू नसतोच, ना माझ्यासारखा भित्रा असतो. तो तर खूप खादाड असतो. पालेभाज्या, फळभाज्या, फळं, पुस्तक-वह्य, कागद, काहीही खातो. नॉनव्हेज खात नाही.

पण आज आपण एका भन्नाट सशाला पाहणार आहोत; जो टीव्हीवर आपल्याला दाखविण्यापुरतं फक्त गाजर खातो. बाकी भूक लागल्यावर चिकन वगैरेही चालतं. इथंच त्याचं वेगळेपण दिसत जातं. आपल्या मराठी बालसाहित्यात असणारा ससा वेगळा आणि हा बग्स वेगळा! ससोबा, ससुल्या, सोसोला अशी सगळी क्युट नावं याच्यापुढे फिकी पडतात.

‘लुनी टून्स’च्या बग्स बनीला कोण नाही ओळखत?

१९३८-४० व्या वर्षी ‘अ वाइल्ड हेर’ (जंगली ससा) या सिनेमाद्वारे कार्टून जगतात आलेला तरुण, उमदा कार्टून! हा तरुण ससा चित्रात दिसतो तसा राखाडी- पांढऱ्या रंगाचा आहे. केस फार नाहीत. मुंबईसारख्या शहरी सशाला असतात तितकेच! फेब्रुवारी का मार्चमध्ये याचा जन्मदिवस असतो. मागच्या मार्चमध्ये याला ७९ र्वष पूर्ण झालीत.

हा खऱ्या सश्यासारखा उडय़ा मारत चालत नाही. मणसासारखा दोन पायांवर चालतो. त्यामुळे मला याची उंची ३ फूट ३ इंच  मोजता आली. याच्या मैत्रिणीपेक्षा एक इंच जास्त! आणि कान उभे केले की ४ फूट उंच,

दातांचा फावडा! त्यामुळे हँडसम ससा पण नाही. हडकुळ्या गटात मोडेल असं शरीर- पक्का शहरी वगैरे!

सगळ्या संकटांतून वाचविण्यासाठी ना त्याच्याकडे पोपेयसारखी बॉडी ना मांजरीसारखे तीक्ष्ण दात व नखं! केवळ मेंदूच्या जोरावर भल्याभल्या शत्रूंना तो लोळवतो. त्याचे मुख्य शत्रू म्हणजे माणूस! माणसाच्या मेंदूपेक्षा भन्नाट मेंदू आणि चपळ अंग यांमुळे याची कार्टून्स पाहताना फास्टर फेणेची आठवण होते. शक्यतो आपल्या बिळात बसून गाजर खाता खाता टीव्ही पाहणं, पुस्तक वाचणं असं आरामात आयुष्य जगणारा हा ससा.

त्यात कुणी त्रास दिला (डोक्यात गेलं) की याची सटकते. आणि तो कुणालाच सोडत नाही, पण हे करताना तो डोनाल्ड डकसारखा आक्रस्ताळेपणा करत नाही. चतुर माणसासारखा अद्दल घडवतो. पण त्याच्यापेक्षा छोटय़ा, निरागस आणि संकटात असणाऱ्या प्राण्यांबद्दल तो कमालीचा कनवाळू आहे. पण तीही लिमिटेड ससोसकी. (माणुसकी असते तशी)

तसा हा दुनियाभरचे ज्ञान, अनुभव असणारा.. समोरचा कोण आहे हे एका क्षणात ओळखून त्यानुसार त्याच्याशी वागणारा. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर बेफिकीरी भाव तरी असतात किंवा आध्यात्मिक गुरूसारखे तृप्तीचे भाव असतात.

‘‘वॉट्स अप डॉक्!’’ हे त्याचे व्यतिमत्त्व दाखवणारे वाक्य तो नेहमी उच्चारतो. ते इतकं गाजलं की त्याच्या अनेक कार्टून सिनेमातून अशा प्रकारची वाक्यं येत गेली. अगदी ‘लाव रे तो व्हिडीओ’सारखंच फेमस! त्याला आवाज दिला टेक्स अव्हेरी यांनी. याची निर्मिती केलीय कॅल डाल्टन यांनी. अर्थात तो आधी वेगळा होता आणि त्यानंतरही त्यात बदल होत गेला.

कार्टूनची वयं माणसापेक्षा अधिक असल्याने अनेक दशकांत कधी कार्टूनमध्ये तर कधी निर्मिती तंत्रात फरक पडल्याने आपल्याला एकच कार्टून वेगवेगळ्या बदलांसह दिसत असते. शक्यतो कार्टून एकाच वयाचे असल्याने हा बदल पटकन दिसतो. आपण खरी माणसं लहानाची मोठी होईपर्यंत खूप बदलतो. हा इतका प्रसिद्ध होता की आजही कार्टूनमधला ससा म्हटलं की चित्रकार साधारण याच्यासारखाच काढतात. लिओन झिंगरनंतर वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने याची निर्मिती केली. १९५८ला नॅटी नाइट्सला ऑस्कर मिळाले. अमेरिकेतील गाजलेल्या कार्टूनसारखाच हॉलीवूडच्या वॉक ऑफ फेममध्ये याच्या नावाचा स्टार आहेच. शिवाय प्रसिद्धीच्या बाबतीत जगात ९व्या स्थानावर आहे. अमेरिकेच्या सांस्कृतिक विभागाचा आणि खुद्द निर्माती कंपनी ‘वॉर्नर ब्रदर्स’चा हा बनी मॅस्कॉट (शुभंकर) होता.

५० वर्षांपेक्षा जास्त काळ तो कॉमिक स्ट्रीप (हास्यचित्र मालिका) मधून झळकला. आधी ‘बालमैफल’सारखा तो केवळ रविवार टू रविवार यायचा. मग मात्र रोजच तो भेट देऊ  लागला. अनेक वस्तू, खेळ, कपडे यावर याचे गाजर खातानाचे चित्र असतेच. बेफिकरीत गाजर चघळणारा, एकटय़ाने आनंदात जगणारा, स्वत:ची कंपनी एन्जॉय करणारा हा चतुर ससा आपल्याला जाम हसवतो. याच्या कार्टूनमध्ये जगभरातील घडामोडींचे संदर्भ, देशोदेशीचे विषय, विचार येत असल्याने मोठय़ांनाही आपला वाटतो.

chitrapatang@gmail.com

First Published on June 22, 2019 5:42 pm

Web Title: story for kids 31