12 July 2020

News Flash

..आणि शाळा आवडली

‘जय, हा बघ तुझा नवीन युनिफॉर्म. मस्त आहे की नाही? आणि ही सगळी तुझी वह्य-पुस्तकं.

|| अलकनंदा पाध्ये

‘जय, हा बघ तुझा नवीन युनिफॉर्म. मस्त आहे की नाही? आणि ही सगळी तुझी वह्य-पुस्तकं. आणि रेनकोट तर आपण आधीच आणून ठेवलाय. मज्जा आहे बुवा.. आता काय बाबा एक मुलगा उद्यापासून नवीन शाळेत जाणार. ‘‘आई, तुला माहितेय ना मला पिवळा रंग बिलकुल आवडत नाही. मी या घाणेरडय़ा पिवळ्या रंगाचा युनिफॉर्म मुळ्ळीच घालणार नाही, सांगून ठेवतो. मला या शाळेतच जायचे नाहीये.’’ जयने पाय आपटत आरडाओरडा सुरू केला. त्याचे वागणे बघून आई एकदम चक्रावूनच गेली.

‘‘अरे, असे काय करतोस, शहाणा मुलगा ना तू! शाळेत न जाऊन कसं चालेल सांग बरं! तुला पुस्तक वाचायला खूप आवडतं ना? ही बघ तुझी छान छान नवीन पुस्तकं. शाळेत तुम्हाला वाचून दाखवतील त्यातला अभ्यास शिकवतील.’’ आई समजावणीच्या सुरात म्हणाली.

‘‘मी ती पुस्तकं घरी वाचीन, नाहीतर तुम्ही मला घरातच अभ्यास शिकवा. पण मला ही शाळा नको. नाहीतर.. मला मुंबईच्या नेहा टीचरच्या शाळेत पाठवा. तिथे आर्यन, क्रिश, इरा माझे सगळे मित्र-मत्रिणी आहेत. ती शाळासुद्धा खूप छान आहे. तिथे घसरगुंडी, झोपाळे आहेत. प्लीज आपण सगळे परत जाऊ या ना मुंबईला. मी त्या शाळेत जाईन, खूप अभ्यास करीन, प्रॉमिस.’’ म्हणत रडक्या आवाजात जयने गळ्याशी हात नेला.

‘‘अरे बाळा, नेहाताईच्या शाळेत फक्त मिनी के. जी. पर्यंतच शिकवतात. तू आता ज्युनिअर के. जी.त गेलास ना, मग त्याचा अभ्यास या नव्या शाळेत शिकवतील, अगदी १०-१२ वीपर्यंत तुला इथे शिकायला मिळेल. तुला माहितेय का.. या शाळेतल्या टीचर्स पण खूप छान शिकवतात.. नेहाताईसारखंच.’’ बाबाने आपल्या परीने समजवायचा प्रयत्न केला.

त्याच्या बाबांची पुण्याला बदली झाल्यावर तो इथे राहायला आला. पण अजून तो फारसा इथे रमला नव्हता. इथल्या सोसायटीतल्या मुलांशी अजून फारशी ओळखही झाली नव्हती. कारण मे महिन्यामुळे बरेचजण कुठे कुठे गावाला गेले होते. पुण्यात आल्या आल्या आई-बाबांनी एका नामांकित शाळेत ज्युनिअर के. जी. म्हणजे छोटा शिशूमध्ये जयच्या प्रवेशाचे काम केले होते. गेल्याच आठवडय़ात जय आईबरोबर त्याच्या नवीन शाळेत फी भरायला गेला होता. खूप मोठे मदान पार करून तो आईबरोबर तिथल्या ऑफिसात गेला. ती मोठ्ठी बिल्डिग बघून जयला त्या शाळेची एकदम भीतीच वाटली. त्याने आईचा हात घट्ट धरून ठेवला. तिथल्या भिंतीवर नेहाताईच्या शाळेसारखी छान छान रंगीत चित्रे नव्हती की भोवती बाग नव्हती. तिथून परत आल्यापासून जयने त्या शाळेची धास्तीच घेतली होती. आज आईने शाळेची तयारी दाखवल्यावर जयने आपली नापंसती स्पष्टपणे जाहीर केली होती.

‘‘शिवाय मुंबईचे आर्यन, क्रिश इथे नसले ना तरीही तुला नव्या शाळेतही खूप मित्र- मत्रिणी मिळतीलच की! आपल्या सोसायटीतलीच एक-दोन मुले उद्या तुला तिथे भेटतील आणि एकदा का तुमची दोस्ती झाली ना, की मग तुला सगळेच आवडायला लागेल.’’ पण जयची कळी काही केल्या खुलत नव्हती.

त्या रात्री जयला स्वप्नात त्याची राखाडी रंगाची नवीन शाळा दिसली. त्या भल्यामोठय़ा शाळेत तो शिरलाय. समोर एक खूप रागीट चेहऱ्याची बाई हातात पट्टी घेऊन त्याला बोलावतेय.. घाबरून जय तिथून पळायला बघतोय तर त्या भल्यामोठ्ठय़ा शाळेतून बाहेर पडायचा रस्ताच त्याला सापडत नाहीये.. दचकून तो जागा झाला. त्याला थोपटणाऱ्या आईच्या कुशीत शिरल्यावर त्याला खूप बरं वाटलं.

सकाळी बरीच कुरकुर करत शाळेचा नवा युनिफॉर्म घालून नवं दप्तर घेऊन देवबाप्पा, आई-बाबांना नमस्कार करून तो बाबाच्या बाईकवरून निघाला. रस्ताभर त्याला काहीतरी जादू व्हावी आणि आपण उडत उडत नेहाताईच्या शाळेत जावंसं वाटत होतं.

‘‘चलो जयमहाराज, आली तुमची शाळा उतरा खाली. बघ केवढा मोठा परिसर आहे. के.जी.पासून कॉलेजपर्यंत तुला इथे शिकता येईल. इकडे बघ, हे कॉलेज तुझ्या हुशार आत्याचं बरं का!’’ बाबाने जयला घाबरवणाऱ्या बिल्डिगकडे बोट दाखवत सांगितलं. आता मात्र जय पुरता गोंधळून गेला, कारण पहिल्या दिवसापासून तो याच बिल्डिगला आपली शाळा समजून घाबरला होता.. बोलत बोलत ते तिघे मागच्या बाजूच्या एका छोटय़ाशा बिल्डिगजवळ गेले. तिथे छोटीशी बाग होती. बागेतल्या झाडांना प्राण्यांचे आकार दिले होते आणि तिथे चक्क एक-दोन नाही तर खूप सारे झोपाळे, सी-सॉ, घसरगुंडी दिसत होती. त्या बिल्डिगच्या दाराला पाडव्याला लावतात तसे तोरण बांधले होते. आणि गंमत म्हणजे सनईची रेकॉर्ड वाजत होती. आपण शाळेत आलोत की कुठल्या लग्नाला आलोत हेच जयला समजेना. पण गेटपाशी छान कपडे घातलेल्या चार-पाच टीचर्स त्याच्यासारख्या सर्व मुलांशी आणि त्यांच्या आई-बाबांशी हसून बोलत होत्या. ‘‘ये बाळा, ज्युनिअरसाठी आलायस ना तू. नाव काय तुझं?’’ एव्हाना जयचा मूड बऱ्यापकी बदलला असल्याने त्याने हसून आपलं पूर्ण नाव सांगितलं. त्याला जवळ घेऊन शाबासकी देत टीचरनी आई-बाबांना निघण्याची खूण केली. मिनिटभर जय अडखळला इतक्यात एका टीचरने त्याला कुंकू लावून गुलाबाचे फूल दिले. वाढदिवसाला आई ओवळते तसेच दुसऱ्या टीचरने त्याला तबकातील निरांजनाने ओवाळले तेव्हा तर जयला एकदम भारीच वाटलं. तिसऱ्या टीचरने त्याच्या हातावर पेढा देऊन समोरच्या वर्गाकडे जायची खूण केली. पेढा म्हणजे तर जयचा वीक पॉइंट होता. पटकन तोंडात टाकून त्याने मागे पाहिलं तर सगळ्याच मुलांचे त्या दाराजवळच्या टीचर्स असेच लाड करत होत्या. या शाळेत सर्व मुलांचा वाढदिवस आजच साजरा करतात की काय.. जयला प्रश्न पडला. अशा भारी स्वागतामुळे जयचे शाळेबद्दलचे मत हळूहळू बदलत होते. वर्ग बघून तर जय जामच खूश झाला. कारण वर्गातही वाढदिवसासारखी सजावट केली होती. रंगीबेरंगी बाके, भिंतीवरही निरनिराळी कार्टून्ससारखी चित्रे होती. त्याच्या टीचर नेहाताईसारख्या छान हसऱ्या होत्या, कालच्या स्वप्नात पाहिल्या तशा तर मुळीच नव्हत्या. तिथली चित्रे बघत असतानाच मजेशीर आवाज करत त्यांच्या वर्गात मिकीमाऊस आणि डोनाल्ड डक आले म्हणजे.. तसे कपडे घातलेली माणसे आली. त्यांनी प्रत्येक मुलाला शेकहँड करत एकएक चॉकलेट दिल्यावर तर सर्वानाच खूप मज्जा वाटली. पहिल्या दिवशी अभ्यास वगरे काही न होता सर्वानी आपापली नावे सांगितली आणि मग टीचरबरोबर सगळ्यांनी दोन-चार गाणी म्हटली, इतक्यात घंटा वाजली आणि शाळा सुटलीसुद्धा. खूश होऊन बाहेर पडलेल्या जयला पहिल्या दिवसापासून घाबरवणाऱ्या मोठ्ठय़ा बिल्डिगशी वाट बघणारी आई जयला दिसली. पण ती आपल्यासारख्या छोटय़ा मुलांची शाळा नाही तर मोठय़ा मुलांचे कॉलेज आहे हे समजल्यामुळे जयची भीती केव्हाच नाहीशी झाली होती.

धावत येऊन आईला मिठी मारताना शाळेतल्या किती आणि काय गमती सांगू असे जयला झाले होते. चालता चालता थांबून आईच्या ओढणीशी खेळत जय हळूच लाजत लाजत म्हणाला, ‘‘आई, मला ना ही नवी शाळासुद्धा खूप आवडलीय.’’

alaknanda263@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2019 12:04 am

Web Title: story for kids 34
Next Stories
1 शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!
2 नागझिरा सफारी
3 हाऊ इज दॅट?
Just Now!
X