News Flash

अतिथी देवो भव!

सभेला कावळा, चिमणी, घार, बुलबुल, कोकिळा, गरुड, कबूतर, मोर असे सर्व स्थानिक पक्षी आले होते.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील पोपटाने सर्व पक्ष्यांची सभा बोलावली. विषय तसा महत्त्वाचाच होता- हिवाळ्यात येणाऱ्या पर्यटकांविषयीचा! दरवर्षी हिमालयात आढळणारे फ्लायकॅचर जातीचे पक्षी, सीगल असे बरेच रंगीबेरंगी पक्षी डिसेंबर-जानेवारीमध्ये भारतातील जंगलाची वाट धरतात. हजारो मैल अंतर पार करून ते भारतातील जंगलात येतात. २ ते ३ महिने राहून ते पुन्हा आपल्या प्रदेशात परत जातात. अर्थातच या सर्व पक्ष्यांच्या स्वागताची तसेच रक्षणाची तयारी कशी करायची यासाठी पोपटाने सभा बोलावली होती.
सभेला कावळा, चिमणी, घार, बुलबुल, कोकिळा, गरुड, कबूतर, मोर असे सर्व स्थानिक पक्षी आले होते. पोपट सभेला संबोधित करत म्हणाला, ‘‘बाहेरच्या प्रदेशातून येणाऱ्या सर्व पर्यटक पक्ष्यांना कोणीही त्रास द्यायचा नाही. ते आपल्याकडे थोडय़ाच दिवसांसाठी राहायला येतात. त्यांना आपल्या जंगलात कोठेही जाण्यास मज्जाव करू नका. हवे ते त्यांना खाऊ द्या. त्यांच्या देशात खूप थंडी असते त्यामुळे ते हवा पालट म्हणून येथे येतात. या रंगीबेरंगी पक्ष्यांमुळे आपल्या जंगलाची शोभाच वाढते. उलट त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्यांच्यापासून त्यांचा बचाव करा.’’
पोपटाच्या या भाषणावर सर्व पक्ष्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. ते पाहून पोपट म्हणाला, ‘‘अरे, असे आपापसात बोलू नका, मला काय ते न घाबरता सांगा.’’
त्यावर कावळा आणि घार बोलण्यासाठी उभे राहिले.
पोपट त्यांना म्हणाला, ‘‘एकेकाने बोला, घारूताई तू बोल आधी, काय म्हणणं आहे तुझं?’’
घारूताई म्हणाली, ‘‘अहो पोपटराव, मी जेव्हा आकाशात उंच उडत असते तेव्हा माझं जमिनीवर बारीक लक्ष असतं. आजुबाजूचे मनुष्य प्राणी आपल्या जंगलात येतात आणि तेच या पक्ष्यांना त्रास देताना दिसतात.
कावळेदादा म्हणाला, ‘‘हो, हेच मी तुम्हाला सांगणार होतो.’’
पोपट म्हणाला, ‘‘अरे बापरे! आता काय करायचं?’’ सगळे पुन्हा एकमेकांशी कुजबुजू लागले. तेवढय़ात बुलबुल म्हणाला, ‘‘या माणसांना सांगणार कोण? ते तर हल्ली आपलं मुळीच ऐकत नाहीत. आपला विचारच करत नाहीत, हळूहळू आपल्या जंगलात राहायला यायला लागले आहेत.’’
‘‘होय, खरंच ते सगळीकडे घाण करून ठेवतात. आपल्या जंगलातलं नदीचं पाणी किती खराब करून टाकलं आहे.’’ कोकीळेनेही घारूताईचीच री ओढली.
चिमणी म्हणाली, ‘‘खरंच, हल्ली माझं सारखं पोट दुखत असतं हे दुषित पाणी पिऊन’’
मोर म्हणला, ‘‘होय, माझी पिसं हल्ली पूर्वी इतकी छान नाही दिसत. कावळे दादा, तुम्ही हल्ली जंगलाची साफसफाई नीट करत नाही बुवा!’’
कावळा म्हणाला, ‘‘अरे, माझा सगळा वेळ शहराची साफसफाई करण्यात जातो. दमून जातो मी, तरी शहरं स्वच्छ होत नाहीत.’’
सभेला पुन्हा मूळ विषयावर आणत पोपट म्हणाला, ‘‘उपाय सुचवा. आपल्या पाहुण्यांना आपण वाचवलंच पाहिजे, त्यांचं रक्षण केलंच पाहिजे.
चिमणी म्हणाली, ‘‘शहरात माझी एक मैत्रीण मनवा आणि एक मित्र मितवा राहतात. त्या दोघांना सांगू का, सगळ्या माणसांना सांगायला, की परदेशी पक्ष्यांना त्रास देऊ नका. ते आपल्याकडे थोडय़ा दिवसांसाठीच आले आहेत.’’
पोपट म्हणाला, ‘‘ठीक आहे, बघ सांगून आणि ते काय म्हणतात ते लगेच मला सांगायला ये.’’
चिऊताई लगेच उडत उडत मनवाच्या घरी गेली. त्यांच्या घरातल्या डायनिंग टेबलवर बसून चिव चिव करायला लागली. मनवा चिऊताईचा आवाज ऐकून लगेच धावत आली. चिऊताईने मनवाला पाहून चिवचिवाट केला.
मनवाने चिऊताईला विचारलं, ‘‘काय गं, चिऊताई काय झालं तुला? तुला खाऊ देऊ का?’’
चिऊताई म्हणाली, ‘‘हो मला खाऊ दे! पण मी आज माझ्या सर्व पक्षी मित्र-मैत्रिणींचा एक महत्त्वाचा निरोप तुला द्यायला आले आहे.’’
मनवा म्हणली, ‘‘काय गं, काय निरोप आहे?’’
चिऊताई म्हणाली, ‘‘जंगलामध्ये तुम्ही माणसं येता आणि सगळीकडे घाण करता, तसेच हिमालयातून येणाऱ्या पक्ष्यांना बघायला येता आणि त्यांना त्रास देता. त्यांना मारून काहीजण खातातदेखील, असं करूनका. ते आपले पाहुणे आहेत. त्यांना त्रास देऊ नका. असं तू सगळ्यांना सांग.’’
मनवा म्हणाली, ‘‘थांब मी मितवाला बोलावून आणते.’’ मनवा धावत धावत तिच्या मित्राला- मितवाला घेऊन आली. चिऊताईने पुन्हा मितवाला आपल्या पक्षीमित्रांचा निरोप सांगितला.
चिऊताईचा निरोप ऐकून मनवा आणि मितवा विचारात पडले. आपल्या पक्षीमित्रांचा निरोप सर्वाना कसा बरं सांगायचा, याचा ते दोघे विचार करू लागले.
दोघांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव पाहून चिऊताई त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही विचार करून ठेवा. मी उद्या परत येईन.’’ आणि चिऊताई मनवाने दिलेला खाऊ खाऊन भुर्रकन जंगलात उडून गेली.
जंगलात गेल्यावर सर्व पक्षी तिच्या भोवती गोळा झाले. त्यांनी विचारलं, ‘‘काय झालं चिऊताई? सांगितला आमचा निरोप तुझ्या मित्रमैत्रिणींना?’’
चिऊताई म्हणाली, ‘‘हो सांगितला ना. उद्या पुन्हा जाणार आहे त्यांना भेटायला.’’
इकडे मनवा आणि मितवा विचार करत होते. मनवा म्हणाली, ‘‘कसं बरं सगळ्यांना सांगायचा पक्ष्यांचा हा निरोप?’’
मितवा म्हणाला, ‘‘अगं मनवा, मोठय़ा माणसांना हे सांगितलं पाहिजे. तेच मारतात पक्ष्यांना.’’
मनवा म्हणाली, ‘‘आपण सगळ्यांना वॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवूया का?’’
‘‘वा! झक्कास आयडिया. चल आपण मेसेज तयार करू.’’ मितवा आनंदाने ओरडलाच!
चिऊताई ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मनवाकडे आली. चिवचिव ओरडू लागली. तिची चिवचिव ऐकून मनवा आणि मितवा चिऊताईकडे धावत आले.
मितवा म्हणला, ‘‘चिऊताई तुम्ही घाबरू नका. पक्ष्यांनी पाठवलेला संदेश आम्ही सगळे मित्र वॉट्अ‍ॅपद्वारे, फलक लावून सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत.’’
चिऊताई म्हणाली, ‘‘चालेल चालेल. मी सगळ्यांना सांगते तुमचा हा निरोप.’’
मनवा-मितवाचा निरोप पक्ष्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोपटाने सर्व पक्ष्यांची सभा बोलावली. त्या सभेत चिऊताई म्हणाली, मनवा आणि मितवाने आपलं काम केलेलं आहे. त्यांनी वॉटस्अ‍ॅपवर, फलक लावून सगळ्यांना असा संदेश पाठवला आहे- ‘माझ्या प्रिय आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी मावशी, आजी, आजोबा, दादा-ताई यांना मनवा आणि मितवाचा नमस्कार. आम्ही आमच्या सर्व पक्षीमित्रांतर्फे आपणांस विनंती करतो की, आपल्याकडे हिमालयातून येणाऱ्या पर्यटक पक्ष्यांना त्रास देऊ नका. त्यांना मारू नका, उलट त्यांना मदत करा. हे रंगबेरंगी पक्षी आपल्या जंगलाची शोभा आहेत. पक्षी-प्राण्यांना वाचवा, जंगल वाचवा, देश वाचवा, पृथ्वी वाचवा आणि स्वत:लाही वाचवा.’’
मनवा-मितवाचा हा संदेश ऐकून सगळ्या पक्ष्यांना आनंद झाला. आणि सगळे पक्षी नव्या पाहुण्यांच्या आदरातिथ्याच्या तयारीसाठी किलबिल करत उडून गेले.
astro_rohini@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 1:10 am

Web Title: story for kids 7
टॅग : Kids Story
Next Stories
1 खेळायन : स्क्रॅबल
2 डोकॅलिटी
3 आर्ट गॅलरी
Just Now!
X