News Flash

मराठी तितुकी वाढवावी..

आमच्या बिल्डगमध्ये मी एकटाच मराठी शाळेतला आहे, म्हणून कधी कधी मला ही मुलं खेळायलाही घेत नाहीत.

आमच्या बिल्डगमध्ये मी एकटाच मराठी शाळेतला आहे, म्हणून कधी कधी मला ही मुलं खेळायलाही घेत नाहीत.

‘‘चला, रामरक्षा म्हणायला लवकर.. हात-पाय धुऊन.’’ आजीचा आवाज ऐकून खेळत असलेली वय वष्रे पाच ते दहामधली सगळी नातवंडं धावत आली.
‘‘आजी, म्हणजे लॉर्ड रामाची ‘प्रेअर’ ना!’’ पाच वर्षांचा अद्वैत म्हणाला.
‘‘आजी, हा रामरक्षेला प्रेअर का म्हणतो?’’ आकाशने शंका उपस्थित केली.
‘‘अरे, त्याच्या शाळेत असंच म्हणतात.’’ आजीने समजावलं.
खूप दिवसांनी आजीच्या घरी नातवंडांचा गोतावळा जमला होता. रामरक्षेनंतर अद्वैतने ‘प्रसादा’ वाटल्यानंतर आजीभोवती जमून सर्वाच्या गप्पा सुरू झाल्या. अद्वैत पटकन् आजीच्या मांडीवर बसला आणि म्हणाला, ‘‘आजी, माझ्या स्कूलमध्ये आपण घरी बोलतो तसं का नाही बोलत? तिथे कम्पल्सरी इंग्लिशमध्येच बोलायला लागतं. मला नाही आवडत ते.’’
‘‘सांगते हं. आणि बरं का मुलांनो आणि मुलांच्या आई-बाबांनो, यानिमित्ताने थोडंसं बोलू का तुमच्याशीही?’’
‘‘हे काय आई, बोल ना!’’ मुलं, सुना आणि नातवंडं आजीभोवती जमले.
आजी अद्वैतच्या आईला- म्हणजे निशाला म्हणाली, ‘‘निशा, ऐकलंस ना अद्वैतचं बोलणं? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यापासून त्याचा मराठी-इंग्रजी शब्दांचा गोंधळ होतोय नुसता. अगं, पोटात असल्यापासून मराठीच ऐकत आलाय तो. घरी-दारी मराठी ऐकत मोठा झाल्यावर अचानक हा इंग्रजीचा मारा झाल्यावर बावरणार नाही तर काय? मला तरी आपल्यासारख्या मराठी कुटुंबातल्या मुलांना मराठीपासून दुरावून हे इंग्रजीचं ओझं देणं नाही पटत.’’
‘‘हो गं आई, पण थोडय़ा दिवसांनी होईल सवय त्याला. रोज होमवर्क करून घेते मी त्याचा. आणि पुढच्या वर्षी टय़ूशनपण लावायची आहे.’’ निशाने तिची बाजू मांडली.
‘‘अगं, पण एवढय़ाशा पोराला परभाषेत शिकण्याचा आणि त्यातून नव्या गोष्टी शिकायच्या- याचा किती विनाकारण ताण द्यायचा? हेच जर तो आकाशसारखा मराठी माध्यमातून शिकत असता तर किती सोपं झालं असतं! आणि मुलं काही फक्त शाळेच्या आठ तासांत शिकत नाहीत; ती दिवसाचे चोवीस तास काही ना काही शिकतच असतात. घरातलं आपलं वागणं-बोलणं, पद्धती, परिसरातील लोक, निसर्ग यातूनही सतत ती काहीतरी शिकत असतात. ही परिसराची भाषा आणि शाळेतली शिकण्याची भाषा एक असेल तर एकंदर शिकण्यासाठी आदर्श परिस्थिती असते असं जगभरातले शिक्षणतज्ज्ञ सांगतात. हे तुम्हाला मी नव्याने सांगायला नको.’’
‘‘आई, पण आजच्या जगात यशस्वी व्हायचं तर इंग्रजी भाषेतून शिक्षणाशिवाय पर्याय नाही.’’ निशा म्हणाली.
‘‘निशा, इंग्रजी एक भाषा म्हणून स्वतंत्रपणे जरूर शिकवावी. पण गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या विषयांच्या संकल्पना तर मातृभाषेतूनच अधिक सहजरीत्या समजून घेता येतात, हे सिद्ध झालेलं आहे. विनाकारण परभाषेतून शिकण्याचा ताण प्राथमिक वयात मुलांना का द्यावा? आणि इंग्रजीतून शिकण्याशिवाय पर्याय नाही, हा पालकांनीच करून घेतलेला गैरसमज आहे.’’
‘‘अगदी बरोबर आई! एका भाषेचा- अर्थात मातृभाषेचा पाया पक्का झाल्यावर मग दुसरी भाषा, तिसरी भाषा शिकण्याची क्षमता अधिक चांगल्या प्रकारे विकसित होते. मातृभाषा पक्की असेल तर इंग्रजीच कशाला, इतर कोणतीही भाषा शिकणे सोपे जाते.’’ आकाशच्या बाबाने आजीचा मुद्दा उचलून धरला.
‘‘संशोधनानुसार- आपल्या मेंदूमध्ये किमान आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. शालेय विषयांबरोबरच संगीत, कला, निसर्गविषयक अशा या बुद्धिमत्तांची जाणीव होण्यासाठी, त्यांचा विकास होण्यासाठी मुलांचं शिक्षण ताणरहित व मोकळ्या वातावरणात होणं आवश्यक आहे. मातृभाषेतून शिकताना ही शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळेच मराठी माध्यमातून शिकलेल्या अनेक मुलांनी आज अनेक क्षेत्रांत यशस्वीरीत्या मराठीचा झेंडा फडकत ठेवला आहे.’’ आकाशच्या बाबाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला.
‘‘आणि आपलं मराठी साहित्य विविध अंगांनी किती समृद्ध आहे! ‘रंगरंगुल्या सान सानुल्या गवतफुला रे गवतफुला’ या कवितेतला भावार्थ, त्यातला हळुवारपणा माझ्या मुलापर्यंत पोहोचायला हवा असेल तर ती भाषा त्याच्या मनापर्यंत पोहोचायला हवी. भाषेतून नकळतपणे संस्कृतीचाही झरा वाहतो. म्हणूनच मराठी संस्कृतीचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मराठीशिवाय पर्याय नाही. आणि हा वारसा त्याच्यापर्यंत पोहोचविणं ही पालक म्हणून आपलीच जबाबदारी आहे असं मला वाटतं. निशा, आकाश ज्या मराठी माध्यमात शिकायला जातो, तिथे सर्व स्तरांतील मुलं आहेत. त्यामुळे त्याला आपोआपच सर्वाशी मिळून-मिसळून वागायची सवय लागलीय.’’ आकाशच्या आईनेही आपलं मत मांडलं.
‘‘अगं, पण आपल्या आकाशचं उदाहरण सोडलं तर आपल्या ओळखीत मराठी माध्यमामध्ये शिकणारी मुलं अगदी हाताच्या बोटांएवढी सापडतील. आमच्या सोसायटीतली, माझ्या सगळ्या मित्रमत्रिणींची मुलं तर इंग्रजी माध्यमामध्येच शिकतात. नाही म्हटलं तरी अद्वैत मग वेगळा पडणार.’’ निशाने आणखीन एक खंत बोलून दाखविली.
‘‘हो आजी, आमच्या बिल्डगमध्ये मी एकटाच मराठी शाळेतला आहे, म्हणून कधी कधी मला ही मुलं खेळायलाही घेत नाहीत. इतकंच काय आजी, त्यांच्यातील इंग्रजी माध्यमातील शाळांवरूनही भांडणं सुरू असतात.’’ आकाशला नुकतंच झालेलं एक भांडण आठवलं.
‘‘खूप वाईट आहे रे हे! म्हणजे गोष्टी इतक्या वाईट थराला पोहोचल्या आहेत, की यावरूनही छोटय़ा मुलांमध्ये गट-तट पडायला लागले आहेत. उद्या आपला समाजही या मुद्दय़ावरून दुभंगू शकतो. अर्थात हा सारा पालकांचा दोष आहे, त्या लहानग्यांचा नाही, असं मला वाटतं. पालकच जर मातृभाषेतून शिकण्याला प्रतिष्ठा देत नसतील तर त्यांची मुलं कशी देणार? म्हणूनच आज पालकांनाच जागं करायची वेळ आली आहे..’’ हे बोलताना आजीच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव होते.
‘‘म्हणूनच निशा, आपल्यासारख्या पालकांनी वेळीच विचारपूर्वक मोठय़ा संख्येने मराठी माध्यमाची निवड करून मराठी भाषेची- पर्यायाने आपल्या संस्कृतीची, आपल्या स्वत्वाची प्रतिष्ठा राखण्याची वेळ आली आहे. आणि मराठी माध्यमांच्या शाळांनीही आपली शाळा कशी उत्तम ठरेल यासाठी प्रयत्न करायला हवेत.. जसे आकाशच्या शाळेत केले जात आहेत.’’ आकाशच्या बाबांनी पुस्ती जोडली.
‘‘निशा, आपणच आपली मायमराठी जिवंत ठेवावी. केवळ घोषणा देऊन आणि फुकाचा अभिमान बाळगून उपयोगी नाही. त्यासाठी कृतीही करावी. आज अनेक पालकांना आपल्या पाल्याला मराठी भाषेत शिकवलं की ते पुढे आयुष्यात काहीही करू शकणार नाही, त्याची हुशारी फुकट जाईल, या भयगंडानं पुरतं पछाडलं आहे. मराठी माध्यमात कुठल्याही स्तरातील मुलं येतात. त्यांच्यामुळे आपलं मूल बिघडेल या भीतीपोटी अनेक पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवतात. पालकांनी हा भयगंड आधी आपल्या मनातून काढून टाकायला हवा. आपण आज मुलाला मूल म्हणून वाढविण्यापेक्षा जगाच्या रेटय़ात यशस्वी होणारा ‘स्पर्धक’ म्हणून बघत आहोत. हा या लहानग्यांवरील एक प्रकारे अन्यायच आहे. आपण त्याची मातृभाषाच त्याच्यापासून हिरावून घेत आहोत. इतकंच काय, त्याची त्याच्या संस्कृतीशी असेलेली नाळही तोडत आहोत. मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवा. त्या भाषेतून विचार करायला शिकवा. त्याची मातृभाषा पक्की झाली की तो इंग्रजीच काय, दुसऱ्या कोणत्याही भाषेचा सहज स्वीकार करेल. त्याला मराठीबरोबरच अन्य भाषांमधील साहित्याचं दालन खुलं करून द्या.’’
‘‘हो दादा, माझ्या मनातला संभ्रम मिटला. आता मी निश्चिंतपणे अद्वैतला मराठी माध्यमाच्या शाळेतच पाठवणार.’’ निशाने तिचा निर्धार बोलून दाखवला. सर्वाच्याच चेहऱ्यावर समाधान पसरलं.
‘‘दे टाळी अद्वैत! तू आता माझ्याच शाळेत येणार.’’ आकाश उडय़ा मारत म्हणाला. अद्वैतला खूप काही कळलं नाही, तरी आकाशच्या शाळेत आपण जाणार याचा आनंद त्याला पुरेसा होता.
वैशाली काल्रेकर – vaishali.karlekar1@gmail.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2016 1:03 am

Web Title: story for kids 9
टॅग : Kids Story
Next Stories
1 पुस्तकांशी मैत्री : खोडकर सवंगी
2 चित्ररंग : उलट-सुलट रेषा
3 सशाचा पराक्रम
Just Now!
X