News Flash

आजीची दुलई

‘‘.. राजा आणि राणी सुखाने नांदू लागली..’’

|| प्राची बोकिल

‘‘..आणि अशा रीतीने..’’

‘‘.. राजा आणि राणी सुखाने नांदू लागली..’’ आजीचं वाक्य नीना आणि एलीने एकत्र पूर्ण केलं. अश्विनदादा तिथेच मोबाइलवर काहीतरी ‘ऑनलाइन सर्च’ करत बसला होता. त्याच्या कॉलेजमध्ये सध्या कुठलेसे ‘डेज’ सुरू असल्यामुळे तो तसा निवांत होता. यंदा तो अकरावीला होता.

‘‘आजी, नाइस स्टोरी!’’ एली म्हणाली. एली ही अश्विन आणि नीनाची चुलत बहीण! ती अमेरिकेतून चार-पाच वर्षांनी नुकतीच तिच्या आईबरोबर भारतात आली होती. तिचे बाबा आठवडय़ाने येणार होते. नीना आणि एली जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे एली आल्यापासून दोघींची छान गट्टी जमली होती. रात्रीची जेवणं झाल्यावर आजी दोघींना गोष्ट सांगायला घराच्या गच्चीवर घेऊन आली होती. वातावरणात अजूनही थोडा गारठा जाणवत होता.

‘‘समजली का तुला गोष्ट?’’ आजी एलीला जवळ घेत म्हणाली.

‘‘येस आजी. आय लाइक्ड द जा..डू..ई डू..ला..ई पार्ट. ती घेतली की राणी हंड्रेड इयर्स झोपी जाते.. अ‍ॅण्ड ऑल!’’

‘‘तुला ‘जादुई दुलई’ म्हणायचंय का?’’ नीना एलीची चूक दुरुस्त करत म्हणाली.

‘‘हा! दु..ल..ई..’’ या वेळी एलीने बरोबर उच्चार केला.

‘‘एली, आपल्या आजीच्या दुलईने खरोखरच गोष्टीमधल्या दुलईसारखी गाढ झोप लागते, एकदम कुंभकर्ण!’’ अश्विनदादा मधेच मोबाइलमधून डोकं वर काढत म्हणाला आणि त्याने घोरण्याची अ‍ॅक्टिंग केली. सगळे हसले.

‘‘एली, आम्हाला सगळ्यांना आजीने दुलया शिवल्या आहेत. जुन्या, मऊ-मऊ साडय़ांपासून बनवलेल्या उबदार दुलया! दुकानातल्या चादरींना ती सरच नाही! तिने तुझ्यासाठीपण एक दुलई शिवून ठेवलीये. ती देणारे तुला या वेळी परत जाताना.’’ नीनाने आजीचं ‘सीक्रेट’ उघडलं आणि तिला आजीकडून डोक्यावर हलका टप्पूही मिळाला.

‘‘आजी, तू डॅडीलाही बनवली होतीस नं स्पेशल दुलई?’’

‘‘तुझा डॅडी त्या वेळी दहावीत असेल! त्याला ती खूप आवडली होती. ती खरं तर मी तुझ्या काकासाठी, म्हणजे या दोघांच्या बाबांसाठी बनवत होते. त्याची दुलई फाटली होती म्हणून! पण तुझ्या डॅडीला ती इतकी आवडली की त्यानेच ती घेतली.’’

‘‘मग काकाला दुलई?’’ एलीचा सहज प्रश्न.

‘‘तुझ्या डॅडीला ते माहीतच नव्हतं. नाहीतर त्याने मागितलीच नसती ती कधी. जेव्हा त्याला समजलं तेव्हा त्याला वाटलं, ‘आपण स्वत:पुरताच कसा विचार केला?’ आणि तो दुलई काकाला परत करू लागला.’’

‘‘मग?’’ एलीची अगतिकता.

‘‘मग काय! लगेचच तुझ्या डॅडीचा वाढदिवस होता. काकाने त्याला ती दुलई वाढदिवसाला ‘गिफ्ट’ म्हणून दिली. तोपर्यंत काकासाठी माझी नवी दुलई शिवूनही झाली होती.’’

‘‘हाऊ स्वीट! डॅडी इथे कधी आला की तीच दुलई वापरतो नं अजून? तुम्ही सगळे तिला ‘रिसायकल दु.. ल.. ई’ का म्हणता?’’

‘‘पंचवीस वर्ष होऊन गेली याला आता! तुझ्या डॅडीने तुला नाही सांगितली दुलईची गोष्ट?’’

‘‘तो म्हणाला की इंडियाला जाशील तेव्हा आजीकडूनच ऐक! स्टोरी सांगताना आजीच्या डोळ्यांमध्ये एक ‘टिंवकल’ दिसतं. आय वॉन्ट टू सी दॅट!’’

‘‘महा खट आहे तुझा डॅडी!’’ आजी एलीचं नाक ओढत म्हणाली. आजीने एलीला दाखवायला ती दुलई गच्चीवर आणली होतीच. तिने ती उघडून पसरली. वेगवेगळ्या रंगांच्या चौकोनी कापडांच्या तुकडय़ांपासून शिवलेली ती दुलई होती अगदी त्या गोष्टीतल्या जादुई दुलईसारखी, पण आता खूप जुनी झाली होती. काही ठिकाणी विरली होती.

‘‘आज्जी, सांग नं! आम्हाला पुन्हा ऐकायचीये दुलईची गोष्ट!’’ नीनाने आग्रह धरला.

‘‘गोष्ट म्हणजे, थोडीशी गंमत! पूर्वी तुमच्या आजोबांची नोकरी दिल्लीला होती. तिथे टेलर कपडे शिवायला घरी येत असत. माझे ब्लाउज, तुमच्या दोघा बाबांचे किंवा आजोबांचे शर्ट-पॅंट वगरे शिवायला. त्यातून जे कापड उरायचं ते मी जपून ठेवायचे. म्हणता-म्हणता मोठय़ा-बारक्या अशा बऱ्याच कापडाच्या तुकडय़ांनी एक भली मोठी पिशवी भरून तयार झाली माझ्याकडे. एक दिवस मनात आलं की यांपासून काहीतरी करता येईल. थोडा विचार केला. मग घेतला एक-एक तुकडा, चौकोनी आकारांत कापला आणि बसले शिवत! मला दुलई बनवण्यापुरतं थोडंफार शिवणकाम यायचं- म्हणजे टीप मारणं, धावदोरा, हेमिंग वगरे करणं. पण फ्रॉक, ब्लाउज असं काही शिवता नाही आलं मला कधी. हे शिवणकाम आणि शिवण्याचं मशीन चालवायला मला तुमच्या पणजोबांनी म्हणजे आजोबांच्या बाबांनी शिकवलं होतं.’’

‘‘व्हॉट? पण डॅडी म्हणतो ते खूप स्ट्रिक्ट होते!’’

‘‘.. पण अतिशय प्रेमळ! आणि माझी शिकायची तयारी होती, त्यामुळे शिकले. तर कापडाचा एक-एक चौकोनी तुकडा कापून, त्यांची एक-एक रांग लावून त्यांना मी एकत्र शिवलं! अशा निरनिराळ्या चौकोनी तुकडय़ांच्या बऱ्याच रांगा बनल्या. मग त्या सगळ्या रांगा एका उबदार पांढऱ्या साडीला एकसारख्या लावून पुन्हा शिवल्या. शिवणकामाचं मशीन होतंच, त्यामुळे सोपं गेलं. योगायोगाने माझ्याकडे उशांचा वगरे भरपूर जुना कापूस साठला होता. मग अजून एक उबदार साडी घेतली आणि त्या दोन साडय़ांमध्ये तो कापूस भरला. त्या पक्क्या शिवल्या.’’ इतक्यात आजीला काहीतरी आठवलं आणि ती एकदम हसायलाच लागली.

‘‘आजी, व्हॉट हॅपंड?’’

‘‘तुमच्या आजोबांना तेव्हा एका संस्थेकडून पुरस्कार मिळाला होता. सत्कार करताना त्यांनी आजोबांना एक केशरी रंगाचा फेटा दिला होता.’’

‘‘फेटा मीन्स?’’

‘‘टर्बन! मी आज तुला व्हॉट्स-अ‍ॅपवर तो टर्बन कम हेल्मेटचा फोटो दाखवला होता नं, तशी मराठमोळी टर्बन.’’ अश्विन दादाचं स्पष्टीकरण.

‘‘ओऽऽऽह!’’ एलीला आठवलं आणि तिने कपाळाला हात लावला.

‘‘मग फेटय़ाच्या पट्टय़ा कापून मी दुलईला बॉर्डर म्हणून लावल्या.’’ आजी दुलईवरची बॉर्डर दाखवत म्हणाली. तेव्हा तिच्या डोळ्यांमधलं ‘टिंवकल’ एलीने नेमकं हेरलं.

‘‘आजोबा रागावले नाहीत?’’ नीनाची शंका.

‘‘हिंमत आहे माझी?’’ एव्हाना आजोबा पेपर घेऊन गच्चीत आले होते.

‘‘उलट ‘मी याचं काय करणार?’ म्हणत त्यांनीच मला तो फेटा देऊन टाकला होता.’’ आजी हसत म्हणाली.

‘‘आणि अशा रीतीने रिसायकल-दुलई तयार झाली.’’ नीना आणि अश्विनदादा एकत्र म्हणाले.

‘‘या दुलईवर गोष्टीतल्या दुलईसारखी ताऱ्यांची बुट्टीपण हवी होती नई!’’ नीनाला एकाएक सुचलं.

‘‘एली, यांमध्ये एक शिवण्याचा दोरा सोडला तर तुमच्या आजीने सगळं जवळ असलेलं साहित्य पुन्हा वापरून दुलई बनवली होती. म्हणून तुझा बाबा तिला ‘रिसायकल-दुलई’ म्हणू लागला.’’ आजोबांनी माहिती पुरवली.

‘‘पण सगळ्याच रिसायकल-दुलया असतात! मेड फ्रॉम ओल्ड सारीज्!’’

‘‘बरोबर आहे, पण त्याच वेळी तुझा बाबा शाळेच्या सायन्स कॉम्पिटिशनसाठी ‘रिसायकल-रियूज’ अशा कन्सेप्टवर कुठलंसं प्रोजेक्ट तयार करत होता. म्हणून त्याने तिचं तसं नाव ठेवलं.’’ आजी आठवत म्हणाली.

‘‘आणि पुढे काका एन्व्हायरन्मेंटल इंजिनीअर झाला!’’ अश्विनदादा कौतुकाने म्हणाला.

‘‘डॅडीचं कामही तेच आहे यू. एस.ला – रिसायकिलग टू सेव्ह द एन्व्हायरन्मेंट! तो इलेक्ट्रॉनिक वेस्टच्या रिसायकिलग प्रोजेक्टवर काम करतो. मला खूप काही सांगत असतो.’’ एली अभिमानाने म्हणाली.

‘‘तेव्हाचे आमचे दिवस काटकसर करून म्हणजेच पैसे जपून वापरण्याचे होते. आजही तीच सवय अंगवळणी पडलीये. हल्लीसारखे यूज-अ‍ॅण्ड-थ्रोचे ते दिवस नव्हते. बाजारात मोबाइलचं नवीन मॉडेल आलं की जुना मोबाइल बदलणारी हल्लीची पिढी! आम्हाला पटत नाही ते, पण कालाय तस्म नम:!’’ आजी समजावत होती.

‘‘अरेच्चा! एका दुलईवरून आपण पार ‘सेव्ह द एन्व्हायरन्मेंट’पर्यंत पोहोचलो गप्पांच्या नादात! हे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखं झालं. अरे अश्विन, मिळाला का तुला हवा तसा कुर्ता ऑनलाइन?’’ आजोबांनी ‘ऑनलाइन’ शब्दावर जरा जास्तच जोर दिला. पण एव्हाना अश्विनदादाने मोबाइल चक्क बाजूला ठेवला होता.

‘‘आजोबा, ऑनलाइन कुर्ता कॅन्सल. मी बाबांचाच कुर्ता घालणारे ‘ट्रॅडिशनल डे’साठी! म्हणजे खऱ्या अर्थाने ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा होईल!’’

‘‘आजी, माझ्या स्कूलमध्ये आम्हाला व्हेकेशननंतर घरातल्या कुठल्यातरी आयटमवरून ‘रिसायकल-रियूज’ कन्सेप्टवर प्रोजेक्ट करायचाय. आय विल यूज धिस दुलई. इट विल बी डिफरंट!’’ एलीला एकदम सुचलं.

‘‘छान! म्हणजे या दुलईने बरीच मजल गाठलीये म्हणायची! आता थेट अमेरिकेला गाजणार तिची ख्याती.’’ आजोबा आजीची थट्टा करत म्हणाले.

‘‘आणि नीने, तुझं काय?’’ आजी-आजोबांना एक प्रेमळ कटाक्ष देत म्हणाली.

‘‘सध्या तरी ही दुलई पांघरून मी गुडुप्प झोपून जाणार आहे,’’ असं म्हणत नीना घातलेल्या गादीवर पहुडली आणि आकाशाच्या दुलईवरची ताऱ्यांची बुट्टी न्याहाळू लागली.

prachibokil@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2019 2:14 pm

Web Title: story for kids by prachi bokil
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे!
2 चित्रकलेचा छंद जोपासताना..
3 मैत्रीचा रंग
Just Now!
X