||  प्राची मोकाशी

‘‘धोनी दिसला?’’ सौरभने धापा टाकत येत अगतिकपणे विनीतला विचारलं.

‘‘हो! पण खूप लांबून. सॉल्लीड गर्दी होती त्याच्याभोवती.’’

‘‘आणि ऑटोग्राफ?’’

‘‘कसा घेणार?’’

‘‘छॅ! गेला चान्स धोनीला प्रत्यक्ष बघण्याचा! तुला तो दिसला तरी! मला तेही नाही.’’

‘‘इट्स ओके! नेक्स्ट टाइम!’’

‘‘कसलं नेक्स्ट टाइम! असा चान्स रोज रोज नसतो मिळत.’’ भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीला याचि देही याचि डोळा पाहू न शकल्यामुळे त्याला आपलं ‘आयडॉल’ मानणाऱ्या सौरभला खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या घराजवळच बनलेल्या नवीन ‘स्पोर्ट्स शोरूम’च्या उद्घाटनासाठी धोनी तिथे आला होता. मुंबईच्या मध्यवर्ती असलेलं एकेकाळचं छोटेखानी ‘पटेल स्पोर्ट्स’ हे दुकान आता भव्य ‘स्पोर्ट्स शोरूम’ बनलं होतं. दुकानाचे मालक पटेल काकांची तर आता मोठ मोठय़ा लोकांमध्ये ऊठबस होती.

सौरभ आणि विनीत या दुकानाचे ‘रेग्युलर कस्टमर’ होते. सौरभ त्याच्या शाळेच्या क्रिकेट टीमचा विकेटकीपर-बॅट्समन होता तर विनीत स्टेट-लेव्हल स्विमर. क्रिकेटसाठी लागणारे विकेट कीिपगचे ग्लोव्हज्, नी-पॅड्स किंवा स्वििमगसाठी लागणारे स्विमसूट, कॅप अशा एक ना अनेक गोष्टी विकत घेण्यासाठी सौरभ आणि विनीतची नियमितपणे या दुकानाला हजेरी लागे. सौरभ धोनीचा फॅन आहे हे पटेलकाकांना चांगलंच ठाऊक होतं. म्हणून त्यांनी खासकरून सौरभ आणि विनीतला त्यांच्या दोघांच्या बाबांच्या फोनवर मेसेज करून  शोरूमच्या उद्घाटनाचं आमंत्रण दिलं होतं.

‘‘सौरभ, तुला यायला इतका उशीर का झाला? पाचची वेळ होती. संध्याकाळची! सात वाजलेत आता! धोनीने थांबायला हवं होतं का तुझ्यासाठी?’’ विनीत कुरकुरला.

‘‘इथून कधी गेला तो?’’

‘‘दहा मिनिटं झाली असतील!’’

‘‘थोडक्यात चुकलं! एक्प्रेस-वे बंद होता त्यामुळे आमची बस अडकली म्हणून उशीर झाला. सोसायटीच्या गेटपाशी टॅक्सीतून उतरल्यावर अक्षरश: धावत आलोय मी. फक्त उडायचा राहिलो होतो. पण तरीही धोनी दिसला नाही तो नाहीच. धोनी येणार आहे हे आधीच माहीत असतं नं तर मी मामाकडे गेलोच नसतो पुण्याला!’’ सौरभचा मूड एकदम ऑफ झाला होता. मग दोघे शोरूमच्या पायऱ्यांवर बसून थोडा वेळ शोरूममधली गर्दी न्याहाळत बसले.

‘‘मला सांग, तुला धोनी एवढा का आवडतो?’’ आता विनीतने मुद्दामच सौरभला छेडलं.

‘‘का? तुला नाही आवडत?’’

‘‘आवडतो. पण आपण विराट कोहलीचे फॅन आहोत बुवा! काय स्टाईल, काय अ‍ॅग्रेशन आहे त्याचं!’’

‘‘हो! पण धोनी इज धोनी! कॅप्टन असताना कसली भारी सिक्स मारून त्याने स्टाईलमध्ये २०११ चा विश्वचषक जिंकून दिला होता आपल्याला! टीमला गरज आहे म्हटल्यावर युवराजसिंहच्या आधी बॅटिंग करायला आला होता. याला म्हणतात ‘लीडिंग फ्रॉम द फ्रंट’! आणि पाकिस्तान- विरुद्ध २००७ चा टी-२० वर्ल्डकप जिंकून दिला तो? आतासुद्धा कॅप्टन नसताना कोहलीला वेळोवेळी मार्गदर्शन करतो, हा त्याचा मोठेपणा! त्यात जगात सर्वाधिक स्टिम्पग करणारा विकेट-कीपर, सर्वाधिक सिक्सेसचा रेकॉर्ड असणारा बॅट्समन.. हे आहेच!’’

दोघांच्या बराच वेळ अशा गप्पा रंगल्या असताना शोरूमचे मालक पटेलकाका तिथे आले. शोरूममधली गर्दी आता बरीचशी ओसरली होती.

‘‘केम छो, डिकरो? धोनीला बघितला का?’’ पटेलकाकांनी दोघांच्या शेजारी पायऱ्यांवर बसत विचारलं.

‘‘मी पाहिलं, पण सौरभचा मिस झाला.’’ विनीतने काकांना काय झालं ते थोडक्यात सांगितलं.

‘‘अरे सौरभ, तुझा आयडॉल येणार म्हणून मुद्दाम बोलावला तुला. आणि तूच मिस केला धोनीला बघायला. बरं, थांब जरा!’’ काका उठले आणि आतमधून त्यांचा पाउच घेऊन आले.

‘‘वानखेडे स्टेडियमवर संडेला होणाऱ्या वन-डे इंटरनॅशनलची शेवटची दोन तिकिटं आहेत माझ्याकडे. सचिन तेंडुलकर स्टॅन्डची! तिथून मॅच एकदम झक्कास दिसते. जाणार काय? धोनीला बघायचा वन मोअर चान्स.. यू नेव्हर नो!’’ सौरभ विचारात पडला. त्याला मॅच बघायला जायचंच होतं, पण घरचे सगळे पुण्याला असल्यामुळे त्यांना तिकिटं काढता आली नव्हती. ऑनलाईनही तिकिटं मिळाली नव्हती. त्याने दुकानातून बाबांना फोन केला आणि ‘तिकिटं घेऊ का’ ते विचारलं. बाबांनी होकार दिला.

‘‘काका, कितीला आहेत तिकिटं?’’

‘‘ते तुझ्या बाबाशी बोलतो मी!’’

‘‘आणि विनीत तू?’’

‘‘मी निवांत घरी बसून टी. व्ही.वर मॅच बघणार! सौरभ, तू बिनधास्त जा!’’ तिकिटं मिळाल्यावर सौरभचा ‘ऑफ’ झालेला मूड आता एकदम ‘ऑन’ झाला. कुठला तरी मोठा खजिना गवसल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर होते.

रविवारी सौरभला घेऊन बाबा मॅच बघायला वानखेडे स्टेडियमवर गेले. दुपारी अडीचला सुरू होणाऱ्या डे अँड नाइट मॅचसाठी प्रेक्षक सकाळी अकरा वाजल्यापासूनच स्टेडियमबाहेर ताटकळत उभे होते. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाबरोबरची ती निर्णायक मॅच होती. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्साह आणि टेन्शन असे मिश्र भाव होते.

प्रेक्षकांसाठी एका नामांकित स्पोर्ट्स चॅनेलने ‘हाऊ इज दॅट’ नावाची स्पर्धा आयोजित केली होती. त्या चॅनेलचा अँकर प्रेक्षकांना तीन प्रश्न विचारणार होता. तिन्ही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्या पहिल्या प्रेक्षकाला त्या मॅचच्या ‘मॅन ऑफ द मॅच’कडून त्याचा एक ऑटोग्राफ केलेला क्रिकेट बॉल आणि त्याच्याबरोबरचा एक सेल्फी असं बक्षीस मिळणार होतं.

तो अँकर फिरत फिरत सौरभ आणि त्याचे बाबा उभे असलेल्या जागी आला. अजूनपर्यंत कुणीही त्याच्या तीन प्रश्नांची बरोबर उत्तरं देऊ शकलं नव्हतं. त्याने सौरभच्या बाबांपुढे माइक धरला, पण बाबांनी तो सौरभला दिला.

‘‘याला क्रिकेटची चांगली माहिती आहे. तो उत्तर देईल.’’ बाबा त्या अँकरला म्हणाले.

‘‘ओक्के! तुझं नाव?’’ सौरभने नाव सांगितलं.

‘‘देणार माझ्या तीन प्रश्नांची उत्तरं?’’

‘‘प्रयत्न करतो!’’

‘‘ग्रेट! पहिला प्रश्न- भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा सर्वात पहिला कर्णधार कोण होता?’’

‘‘सी. के. नायडू!’’ सौरभने तडक उत्तर दिलं.

‘‘क्लासिक! वन-डे क्रिकेटमध्ये थर्ड अम्पायरकडून आउट डिक्लेअर झालेला पहिला बॅट्समन कोण?’’

‘‘सचिन तेंडुलकर!’’ सौरभ किंचित विचार करत म्हणाला.

‘‘एक्सलंट! आता शेवटचा प्रश्न! असा कुठला भारतीय खेळाडू आहे जो एकही वन डे इन्टरनॅशनल क्रिकेट मॅच न खेळता थेट वर्ल्डकपसाठी निवडला गेला होता?’’ या प्रश्नाला मात्र सौरभ चांगलाच विचारात पडला. प्रश्नाचं उत्तर द्यायला फक्त तीस सेकंदं उपलब्ध होती. प्रश्न ऐकून आजूबाजूची लोकंसुद्धा आता सौरभचं उत्तर ऐकायला उत्सुक होती. पण वेळ संपण्याच्या काही सेकंदं आधी सौरभला त्या खेळाडूचं नाव आठवलं.

‘‘सुनील वाल्सन!’’ तो पटकन म्हणाला.

‘‘फँटास्टिक! यू विन द ‘हाऊ इज दॅट’ काँटेस्ट! तिन्ही उत्तरं एकदम बरोबर दिलीस तू.’’ बाबांनी कौतुकाने सौरभची पाठ थोपटली. इतर लोकांनीही सौरभचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं.

‘‘बाय द वे, तुझा आवडता क्रिकेटर धोनी?’’ सौरभने घातलेली धोनीची ‘७’ नंबरची जर्सी पाहून अ‍ॅंकर म्हणाला.

‘‘येस ऽऽऽऽ! तो ‘आयडॉल’ आहे माझा!’’

‘‘ओह्! तर बघू या आजच्या मॅचनंतर तुला तुझ्या ‘आयडॉल’ धोनीकडून बक्षीस मिळतं का ते!’’ असं म्हणत त्या अँकरने सौरभला प्रेझेन्टेशन एरियामध्ये येण्याचा पास दिला आणि त्याच्या रायटिंग पॅडमध्ये कसली तरी नोंद करून तो तिथून निघून गेला. स्पर्धा जिंकल्यामुळे सौरभ खुशीत होताच, पण तो आता वाट बघत होता ‘मॅन ऑफ द मॅच’ कोण होईल याची..

मॅच सुरू झाली. तो दिवसच मुळी ‘धोनीमय’ होता. आक्रमक खेळी करत ५६ चेंडूंत धोनीने बिनबाद ७० धावा केल्या. त्याची एक-एक सिक्स आणि फोर, अगदी गॅप्स शोधून रन्स काढण्याची लकब क्लासिक टायिमगचा एक खास नमुना होता. बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना त्याचा प्रसिद्ध ‘हेलिकॉप्टर शॉट’ पाहायला मिळाला. तीन कॉट बिहाइंड आणि  दोन स्टिम्पग करत त्याने विकेट कीिपगही झक्कास केलं होतं. थोडक्यात, ‘ऑल राउंड परफॉर्मन्स’ देत धोनी ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला..

मॅचच्या प्रेझेन्टेशन सोहळ्यात ‘हाऊ इज दॅट’ स्पर्धेचा विजेता म्हणून सौरभच्या नावाची घोषणा झाली. प्रेझेन्टेशन एरियामध्ये धोनी उभा असलेल्या ठिकाणी सौरभ गेला. धोनीने हसून त्याच्याबरोबर ‘शेक-हँड’ केलं. सौरभची थोडी विचारपूस केली. स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन केलं. मग एका बॉलवर स्वाक्षरी करून त्याने तो बॉल सौरभला दिला. धोनीने स्वत: दोघांचा सेल्फी काढला. चॅनेलच्या अँकरने सौरभकडून त्याच्या बाबांचा मोबाइल नंबर घेऊन तो सेल्फी त्यांना ‘फॉरवर्ड’ केला. धोनीने सौरभची पाठ थोपटली आणि तो त्याच्या संघाच्या दिशेने परतला. सौरभ धोनीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे काही सेकंदं भरभरून पाहात राहिला..

‘‘हाऊ इज दॅट?’’ स्टँडमध्ये जागेवर परतल्यावर धोनीने ऑटोग्राफ केलेला बॉल बाबांकडे टाकत सौरभ म्हणाला. बाबांनी मग धोनी आणि सौरभचा सेल्फी त्याला दाखवला.

‘‘बाबा, असं स्पर्धा जिंकून धोनीला भेटण्याचा आनंद काही वेगळाच होता. काहीतरी महत्त्वाचं कमावल्यासारखा! अगदी दोन मिनिटंच, पण किती छान बोलला तो माझ्याशी. हा दिवस मी कधीच विसरणार नाही!’’

‘‘म्हणजे पटेलकाकांचं बोलणं खरं ठरलं म्हणायचं.. शेवटी तुला धोनी भेटलाच!’’

..आज धोनी आणि सौरभचा तो सेल्फी पटेलकाकांनी डेव्हलप करून शोरूमच्या एन्ट्रन्सला ‘डिस्प्ले’ केलाय! फोटोला मोठय़ा अक्षरांत ‘कॅप्शन’ दिलीय.. ‘हाऊ इज दॅट’!

mokashiprachi@gmail.com