मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

बाबांनी व्हरांडय़ात ठेवलेल्या पिशवीतली चिठ्ठी काढून अगदी उत्सुकतेने हातात घेतली. आईही आली पहायला काय लिहिलंय ते. वर्षांतून एकदाच अशी चिठ्ठी लिहिली जायची आणि त्यात काही मागणी असायची- सांताक्लॉजसाठी!

सांताकडून आपल्याला काय हवंय, ते दोन दिवस आधी चिठ्ठीत लिहून व्हरांडय़ातल्या या पिशवीत ठेवायची आणि मग ती वाचून लाडका सांता ती मागणी पूर्ण करतो, असं बाबांनी अवनी आणि आदित्यला सांगितलं होतं. पहिल्यांदा मुलं सरळ मागणी करायची कपडे, गॉगल वगैरे वगैरे. मग बाबांनी एक युक्ती काढली. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला जे हवंय ते लिहायचं.. पण मराठी गाण्यांच्या ओळी वापरून!’’ हे अनेक र्वष चाललं होतं आणि आई-बाबांनाही मजा आली होती याची. आता आई-बाबाच ही मागणी पूर्ण करतात, हेही मुलांना समजलं होतं.

‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’, ‘हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा’, ‘झुकझुक झुकझुक आगीनगाडी’ वगैरे गाण्यांनुसार चॉकलेटस्, बॅट-बॉल, टॉय ट्रेन वगैरे त्यांनी दिलीच, पण एकदा ‘असावे घरटे अपुले छान’ अशी ओळ आली तेव्हा आई-बाबा पडले कोडय़ात. मग आईला सुचलं भातुकलीच्या सेटचं.. आणि झाली सुटका!  ‘ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा’ या ओळीने भंबेरीच उडवली एका वर्षी. शेवटी दोन दिवसांनी अंदाजाने बाबांनी मे महिन्यातल्या कुलू-मनाली ट्रेकचं बुकिंग करून दिलं आणि बाबांना आपलं म्हणणं अचूक समजलं म्हणून मुलंही खूश झाली.

‘समुद्री चहूकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ ही यावर्षीची चिठ्ठी वाचताना मात्र आई-बाबा चक्रावले. काय असावं, काहीच पत्ता लागत नव्हता. हरतऱ्हेने विचार  झाला. अंदमान ट्रिप सध्या अशक्यच. सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा.. तो कधीच झालाय.. काय बरं असावं, या प्रश्नाच्या चक्रात आई-बाबा दोन दिवस गुरफटले पुरते.. पण काहीच समजेना. शेवटी त्यांनी हार पत्करली आणि खुलाशासाठी मुलांनाच बोलवलं.

त्यावर मोठी अवनी  म्हणाली, ‘म्हणजे आपण सगळे. सोडवा कोडं.’ आई-बाबा कोडय़ातच! पण आदित्यच्या बालिशपणामुळे त्यांची सुटका झाली. तो पुढे येत म्हणाला, ‘‘अहो, हल्ली आपण सगळे घरात असतो, पण तुम्ही दोघे वर्क फ्रॉम होममुळे कम्प्युटरसमोर आणि आम्ही शाळेमुळे मोबाइलपुढे. आम्ही दोघंही तुमच्या लाडांना, तुमच्याशी करायच्या मस्तीला आणि अशा सगळ्या गोष्टींना मुकतोय तुमच्यासोबत घरात राहूनही. वस्तू नकोय आम्हाला काही.. प्रेम, लाड हवेत.’’ आई-बाबांच्या डोळ्यांतून झर्रकन् आसवं गळली आणि त्यांची दोन गाठोडी त्यांना मायेने घट्ट बिलगली.