04 December 2020

News Flash

मी.. हिममानव पाहिलेला माणूस!

आम्ही मित्रांनी माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने कूच केली.

आम्ही बॉल घ्यायला जाणार तो अचानक १५ फूट उंच पांढऱ्या केसांचा एक विचित्र प्राणी तिथे आला आणि त्याने आमचा बॉल टाकला.

दीप प्रधान – lokrang@expressindia.com

एकदा काय झालं, मी आणि माझे मित्र फुटबॉल खेळत होतो तेव्हा बॉल माझ्याकडे आला. मी बॉलला असली किक मारली की, बॉल पार माऊंट एव्हरेस्टवरच गेला. मग काय, आम्ही मित्रांनी माऊंट एव्हरेस्टच्या दिशेने कूच केली. चालत निघालो तर समोरच्या गल्लीतल्या काकींनी विचारलं, ‘‘काय मुलांनो, कुठे निघालात?’’ तसं आमच्या मधला एक जण मोठय़ा अभिमानाने म्हणाला, ‘‘माऊंट एव्हरेस्टला चाललोय.’’ आम्ही खूप र्वष चालल्यावर एका वेगळ्याच ठिकाणी पोहोचलो. सगळ्यांना फारच तहान लागलेली. शिवाय गरमही होत होतं. तेव्हा सगळे जण एका झाडाखाली बसलो. आमच्यातला सर्वात मोठा मुलगा दुर्बिणीने काही तरी पाहत होता. त्याला तिथे चार-पाच बोटी दिसल्या शिवाय अजून थोडं लांब पाहिल्यावर एक बेटसुद्धा दिसत होतं. थोडा वेळ थांबल्यावर सगळे जण त्या बेटाच्या दिशेनं चालायला लागलो. किनाऱ्यावर आल्यावर सगळे जण बोटीत बसलो. चार-पाच तासांचा प्रवास करून त्या बेटावर आलो आणि काय आश्चर्य! आम्ही बेटावर उतरताच त्या बोटी बुडाल्यासुद्धा. नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतच आम्ही पुढे निघालो. चालता चालता कधी रात्र झाली तेच कळलं नाही, तरीही पुढे पुढे चालतच राहिलो. आपण किती दूर आलो ते आम्हाला तेही कळलं नाही. तेवढय़ात रस्ताच संपला. मागे फिरलो तर मागे मोठ्ठा अस्वल होता. आम्ही खूप घाबरलो, इतक्यात माझा तोल गेला आणि मी धबधब्यातून खाली येत चॉकलेटच्या नदीत पडलो. खाली जेलीचे दगड होते. इतक्यात मला माझे मित्र दिसले. सगळे जण बराच वेळ पोहलो आणि मग एका ठिकाणी आलो- जिथे मुंगी एवढा सिंह आणि हत्ती एवढी झुरळं होती. अचानक वरून काही तरी उडत गेल्यासारखं वाटलं. वर पाहतो तर काय, कावळ्याएवढी माशी! नंतर लक्षात आलं की फक्त प्राणी-पक्षी हेच नाहीत, तर झाडंसुद्धा लहान झालेली आणि झाडांएवढं गवत होतं. हे सगळं पाहिल्यावर आम्ही पुन्हा एकदा नदीत उडी मारली. पुढे गेल्यावर आम्ही एका बर्फाळ ठिकाणी आलो. फार थंडी वाजत होती. तेवढय़ात आम्हाला आमचा बॉल दिसला. आम्ही बॉल घ्यायला जाणार तो अचानक १५ फूट उंच पांढऱ्या केसांचा एक विचित्र प्राणी तिथे आला आणि त्याने आमचा बॉल टाकला. माझ्या एका मित्राने मोठय़ा धाडसाने बॅट उचलली आणि तो त्या केसाळ प्राण्याच्या दिशेने निघाला. त्याने त्या प्राण्याच्यापायावर बॅटने मारायला सुरुवात केली, पण तरीही त्याला बिल्कूल लागत नव्हतं. असं वाटत होतं की, त्या प्राण्याला स्पर्शज्ञानच नव्हतं. तो पाय आपटतंच पुढे निघून गेला. आम्ही परत जायचा विचार करतच होतो, मी जाऊन एका दगडावर बसलो, पण नंतर कळलं की तो दगड नव्हता तर मोठ्ठा व्हेल होता आणि त्या व्हेलच्या डोक्यातून इतकं मोठं कारंजं उडालं की मी पार आमच्या घराच्या गॅलरीत जाऊन पडलो. पुढे इतर मुलं सहा वर्षांनी परत आली, पण तोपर्यंत लोक  मला हिममानव पाहिलेला पहिला माणूस म्हणू लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:05 am

Web Title: story for kids dd70
Next Stories
1 चित्रांगण : बनवा स्वत:चं चित्ररूप
2 करोना आणि मासे
3 जा ना रे करोना
Just Now!
X