अलकनंदा पाध्ये

‘‘ध्रुव, बाळा उठ. उठ पटकन् आणि आजपासून तुझं बस्तान आता हॉलमधे बरं का!’’ झोपेतल्या ध्रुवला आई काय सांगतेय खरं म्हणजे काहीच कळत नव्हतं. आई खरंच उठवतेय की आपण स्वप्न बघतोय तेच समजत नव्हतं. पण आईच्या दुसऱ्या मोठय़ा हाकेने मात्र त्याची झोप उडाली. सुट्टीतही लवकर कशाला उठायचे असा विचारही त्याच्या डोक्यात येऊन गेला, पण तोवर झोप उडालीच म्हणून डोळे चोळत तो नेहमीप्रमाणे आईच्या गळ्यात हात टाकायला गेल्यावर आई पटकन् दूर झाली तेव्हा तर त्याचा आणखीनच गोंधळ उडाला. आईने समोरच्या खुर्चीवर बसत त्याला समजावले की दोन दिवसांपूर्वी बाबाला थोडासा ताप येऊन गेल्यावरही घरात तिघांच्या करोना टेस्ट केल्या होत्या, त्यात बाबाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि आईला ताप वगैरे काही नसला तरीपण थोडय़ा दिवसांसाठी ते क्वारंटाइन की काय म्हणतात तसं राहावं लागणार होतं. ध्रुवला मात्र यातलं काहीच नव्हतं, पण थोडे दिवस आई-बाबांजवळ जाता येणार नाही असं समजल्यावर मात्र ध्रुव थोडा गडबडला. आई पुढे बरंच कायकाय सांगत होती- ज्यातलं बरचसं त्याच्या डोक्यावरून चाललं होत. कारण त्याच्या डोक्यात आता शंभर प्रश्नांची गर्दी झाली होती. आईच्या बोलण्यातून महत्त्वाचं समजलं ते इतकंच की त्याची नीरा आत्या कुठलातरी स्पेशल पास घेऊन उद्यापासून त्यांच्याकडे राहायला येणार होती. इतके दिवस करोनामुळे परीक्षा टळली.. मार्चपासूनच सुट्टी मिळाली.. आई-बाबासुद्धा ऑफिसला न जाता घरातच असतात.. या आनंदात असणाऱ्या ध्रुवला आता त्या दुष्ट करोनाचा खूप खूप राग आला. आजवर सगळी मोठी माणसं दिवसभर करोनाबद्दल सारखी वाईट बोलत असायची, पण मित्रांबरोबर एकत्र जमून खेळता येत नाही एवढय़ा एकाच कारणासाठी  त्याला करोना आवडत नव्हता. जरी सोसायटीतले मित्र एकत्र जमले नाहीत तरी सगळ्या मित्रांच्या समोरासमोरच्या गॅलरीत उभे राहून मोठय़ा आवाजात गप्पा चालायच्या. किंवा कधीतरी त्यांच्या आया त्यांना कॉन्फरन्स कॉल लावून द्यायच्या. पण आता मात्र तो दुष्ट करोना आपल्या घरात घुसून आपल्याला आईबाबांपासून दूर ठेवतोय म्हटल्यावर मात्र मोठी माणसं करोनाला वाईट का म्हणतात ते त्याला नीटच समजलं.  ध्रुवचे कपडे, खेळ, गोष्टींची पुस्तकं असं बरंच काही आईने बाहेरच्या हॉलमधे नेऊन ठेवलं आणि आजपासून.. बाबा बेडरूममध्ये, मी दुसऱ्या खोलीत आणि तू.. इथे बाहेरच्या खोलीत. हॉलमध्ये शहाण्यासारखं राहायचं हं राजा, असं म्हणताना आपली आई ओढणीने डोळे आणि नाक पुसतेय हे ध्रुवने बरोब्बर टिपलं. खरं तर ते पाहून त्यालाही मोठ्ठा सूर काढून आईला घट्ट मिठी मारावीशी वाटली, पण नाही.. आता  करोनामुळे एकमेकांपासून दूर राहायचं हा दिवसभर कानावर पडणारा संदेश त्याला आठवला. आपण आता उगाच हट्ट केला तर आपल्या आईला आणखी वाईट वाटेल म्हणून त्याने मोठय़ा माणसांसारखं वागायचं ठरवलं. तसाही तो या वर्षी तिसरीत जाणारच होता ना!

child girls perform amazing dance on dhol tasha
ढोल ताशाच्या गजरात चिमुकल्या मुलींनी केला अप्रतिम डान्स, ऊर्जा पाहून तुम्हीही व्हाल फॅन
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral video of boy helping dog
“माणसाने माणसाशी माणसासम वागणे”! भुकेल्या श्वानाला तरुणाने खायला दिले बिस्किट; पाहा सुंदर व्हिडीओ

दुपापर्यंत ही बातमी त्यांच्या सोसायटीत पसरलीच होती. आईची तिच्या मैत्रिणींशी सतत फोनाफोनी चालू होती. दुपारी अवंतीमावशीने- जयच्या आईने ध्रुवच्या दाराची बेल वाजवून दाराबाहेर जेवणाचा डब्बा ठेवल्याचे सांगितले. त्याबरोबर ध्रुवने खोलीतल्या आईच्या सूचनेनुसार तीन ताटांत जेवण वाढून दोन्ही खोल्यांबाहेर ठेवले. स्वत:पण रोजच्यासारखी टंगळमंगळ न करता अगदी शहाण्या मुलासारखा जेवला. नंतरची भांडी वगैरे बेसिनमध्ये नीट ठेवून दिली. दुपारी खोलीबाहेरूनच आईबाबांशी गप्पा, नंतर टी.व्ही.वर डोरेमॉन वगैरे बघण्यात त्याचा वेळ बरा गेला. पण संध्याकाळी नीराआत्याने खास ध्रुवची चौकशी करायला फोन करून ती उद्या दुपारी येतेय सांगताना फक्त आजची रात्र एकटा शहाण्यासारखा झोप असं सांगितल्यावर मात्र ध्रुव थोडासा भांबावला. कारण तोर्पयच रात्री एकटं झोपण्याचा विचार त्यानं केलाच नव्हता. आजपर्यंत तो कधीच एकटा झोपला नव्हता, पण या दुष्ट करोनामुळे..

बाहेरचा अंधार पाहून त्याला खूप एकटं एकटं वाटायला लागलं म्हणून फक्त झोप येईपर्यंतच आईला आपल्याजवळ बोलवावं का, असा विचार ध्रुवच्या मनात येत असतानाच आईने खोलीतून हसतहसत तिचा नवा टॅब त्याच्याकडे सोपवला. ध्रुवने त्यावर नजर टाकली तर काय आश्चर्य.. जय, आर्यन, नेहा, इरा त्याची सगळी मित्रमंडळी त्याच्याशी बोलायला जमली होती. कुणी जोक्स तर कुणी एकमेकांना कोडी घालू लागले, तर कुणी नव्या पॉ-पेट्रोल सिरिअलबद्दल सांगायला लागले. थोडय़ा वेळाने जयचा मल्हारदादाही त्यांच्यात सामील झाला. त्याने ध्रुव आणि मंडळींना हॅरी पॉटर वाचून दाखवायचं ठरवलं होतं. जे आजपर्यंत ध्रुवचा बाबा त्याला वाचून दाखवत असे आणि ते ऐकता ऐकता बरेचदा तो गाढ झोपूनही जात असे. मित्र-मैत्रिणींबरोबर असं चॅटिंग करताना मगाचा त्याचा एकटेपणा कुठल्याकुठे पळाला..  गप्पा मारता मारता कुणाचं घडय़ाळाकडे लक्षही गेलं नाही. अखेर ध्रुवला जांभया अनावर झाल्या तेव्हा मल्हारदादाने सर्वाना गुडनाइट करायला सांगून चॅटिंग बंद केलं. ध्रुवचा रात्रीचा एकटेपणा घालवायचा, त्याला सोबत करायचा त्याच्या मित्रांनी केलेला हा अफलातून प्लॅन शंभर टक्के यशस्वी झाल्याचं पाहून आईनेही शांतपणे झोपलेल्या ध्रुवच्या पुढय़ातला टॅब अलगदपणे उचलला आणि ती निश्चिंतपणे झोपायला गेली.

alaknanda263@yahoo.com