20 January 2020

News Flash

मनाचा गाभारा

‘‘राही, निशाताईने तुमच्या ‘परीराणी खरी राणी’ नाटकाचे फोटो ‘अपलोड’ केले आहेत फेसबुकवर.

|| प्राची मोकाशी

‘‘राही, निशाताईने तुमच्या ‘परीराणी खरी राणी’ नाटकाचे फोटो ‘अपलोड’ केले आहेत फेसबुकवर. तिने थोडय़ा वेळापूर्वीच मला मेसेज केला होता. ये पटकन आवरून. बघू या आपण!’’ राही शाळेतून आल्याआल्या आई तिला म्हणाली. राही उत्साहात तिच्या खोलीमध्ये पळाली. बातम्या ऐकायला म्हणून आईने एकीकडे टी. व्ही. लावला होता. टी. व्ही.चा आवाज बंद करून तिने राहीसाठी फेसबुक ओपन करून ठेवलं आणि आषाढी एकादशीनिमित्त राहीसाठी खास बनवलेली साबुदाण्याची खिचडी आणायला ती स्वयंपाकघरात गेली.

राहीची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. पहिल्यांदाच असं नाटकात काम केल्याने राहीला कधी ते फोटो पाहायला मिळतील असं झालं होतं. आवरून आल्याआल्या ती फेसबुकवर फोटो पाहू लागली. फोटो खरोखरच छान आले होते. पण पाहतापाहता ती एकाएकी स्तब्ध झाली. त्या फोटोंवर पोस्ट झालेल्या कमेंट अगदी हलवून टाकणाऱ्या होत्या.. ‘परीराणी काळी राणी’, ‘इतकी सावळी मुलगी आणि परी?’, ‘कोणी गोरीपान परी मिळाली नाही वाटतं!’, ‘पुढच्या नाटकाच्या आधी जरा फेअरनेस क्रीम लाव म्हणजे थोडी उजळशील.. परीराणी!’ त्या सगळ्या कमेंट्स वाचून राही एकदम हिरमुसलीच. त्यामुळे त्या वाईट कमेंट्स वाचताना बरोबरीने ‘पोस्ट’ झालेल्या चांगल्या कमेंट्सकडे तिचं लक्षच गेलं नाही.

अलीकडेच उन्हाळ्याच्या सुटीत झालेल्या नाटय़शिबिरात राहीने नाटकात एका परीची प्रमुख भूमिका केली होती. राहीचा आवाज खूप गोड होता. ती रीतसर शास्त्रीय गाणंही शिकत होती. तशीही तिला बऱ्याच गाण्यांची आवड आणि माहितीदेखील होती. त्यातून ते संगीत नाटक असल्यामुळे तिला निशाताईने आपसूकच ही भूमिका करायला दिली होती. शिबिरानेही भरपूर मेहनत घेत एका मोठय़ा ऑडिटोरियममध्ये मुलांना नाटक सादर करायची संधी दिली होती. सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली होती. नाटक सादर होऊन तसे बरेच दिवस झाले असले तरी दरम्यानच्या काळात निशाताईचा साखरपुडा झाल्याने तिला ते फोटो अपलोड करायला वेळ मिळाला नव्हता. म्हणूनच ते अपलोड केल्याकेल्या तिने सगळ्यांना तसा मेसेज केला होता.

एव्हाना आई तिथे आली. तिला काय घडलंय ते लगेच लक्षात आलं.

‘‘आई, हे काय गं? मी सावळी आहे म्हणून इतकी वाईट दिसते? मी नाही का कधी परी बनायचं?’’ राहीचा मूड पूर्णपणे गेला होता. तिला रडायला येऊ लागलं.

‘‘राही, तू चांगली दिसतेस की वाईट हे कोणाच्या म्हणण्यावरून ठरवणार आहेस का आता?’’

‘‘पण खोटं तर नाहीये ते!’’

‘‘खोटंच आहे! तू चांगली गातेस आणि हे संगीत नाटक होतं म्हणून निशाताईने तुला परीची भूमिका दिली होती नं? मग कोणाला काय बोलायचं ते बोलू देत! बेटा, अशा कमेंट्सनी आपण कधीच खचू नये. बरं, या कमेंट्स टाकणारे लोक आपल्याला माहिती सुद्धा नाहीयेत. मग अशा लोकांना आपल्या आयुष्यात आपण किती महत्त्व द्यायचं? त्यांच्या असल्या निर्थक बडबडीकडे आपण दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. एवढय़ा तेवढय़ा गोष्टीवरून अस्वस्थ झालीस तर जगात उभे कसे राहणार आपण?’’ आई राहीला समजावत असताना राहीचं लक्ष टी. व्ही.कडे गेलं. त्या वेळेस तिथे नेमकी एका फेअरनेस क्रीमची जाहिरात सुरू होती. राहीने ताडकन उठून टी.व्ही. आवेशाने बंद केला.

‘‘हे बघ, इथेपण तेच सांगताहेत – आठ दिवसांत गोरे व्हा! सुंदर त्वचा, गोरी त्वचा.. छॅ! आई, सावळं किंवा काळं असणं इतकं वाईट असतं का? आणि गोरं असणं म्हणजेच सुंदर का? आपल्याला मिळालेला रंग हा आपल्या हातात कुठे असतो?’’

‘‘नसतोच नं! मग! आपल्या हातात असतं आपल्यातले गुण ओळखून ते जोपासणं. मुळात आपण एक चांगलं माणूस असणं महत्त्वाचं. मनांतून आनंदी, समाधानी असलं की कुणीही छानच दिसतं. या सगळ्या फोटोंमध्ये बघ तुझा चेहरा किती आनंदी दिसतोय! परफॉर्मन्सच्या वेळी तर तुझं गाणं ऐकून आणि तुझा अभिनय पाहून कितीतरी जण विंगेत येऊन तुझं अभिनंदन करत होते! आठवतंय नं? आणि म्हणूनच म्हणतेय, विसरून जा हे सगळं! खूप क्षुल्लक गोष्ट आहे ही! चल, आपण देवळात जाऊन येऊ. आज आषाढी एकादशी आहे, विसरलीस?’’ आई म्हणाली.

पण राहीचं काही केल्या समाधान होईना. तिला मनातून कुठेतरी अपमानास्पद वाटत होतं. ती नाइलाजाने देवळात जायला तयार झाली. मात्र या प्रसंगामुळे राहीच्या मनात स्वत:च्या रंगाबद्दलचा न्यूनगंड घर करून राहील की काय अशी भीती आता आईला वाटू लागली होती..

आषाढी एकादशीनिमित्त राहीच्या घराजवळच्या विठ्ठल मंदिरात दरवर्षी मोठा उत्सव असतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही देऊळ दिव्यांच्या माळांनी सुरेख सजवलं होतं. विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांची भरपूर गर्दी होती. स्त्री-पुरुषांच्या वेगळ्या अशा मोठय़ा दोन रांगा लागल्या होत्या. राही आणि तिची आई स्त्रियांच्या रांगेत उभ्या राहिल्या. बऱ्याच वेळाने सरकत सरकत दोघी मंडपापर्यंत पोहोचल्या. तिथून गाभाऱ्यातल्या विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती त्यांना आता अगदी व्यवस्थित दिसत होत्या. डोळ्यांचं पारणं फिटेल इतक्या त्या काळ्या दगडातून घडलेल्या दोन्ही मूर्ती सुंदर आणि सजीव दिसत होत्या. त्यांना घातलेल्या फुलांच्या आणि तुळशीच्या माळांनी तर त्यांची शोभा द्विगुणीत झाली होती. गाभारासुद्धा दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला होता.

राही आणि तिची आई आता गाभाऱ्यात शिरणार इतक्यात फुलांचा आणि नारळांचा जमलेला ढीग साफ करायला म्हणून गुरुजींनी गाभाऱ्याची साखळी थोडय़ा वेळासाठी लावून गाभारा बंद केला. राही आणि आई दोघी साखळी उघडेपर्यंत तिथे शांतपणे उभ्या राहिल्या. दर्शन घेण्यासाठी आता पुढचा नंबर त्यांचाच होता.

मंडपाच्या जवळच अभंग-भक्तिगीतांची रेकॉर्ड सुरू होती. राहीचं गाण्याकडे लक्ष गेलं..

‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी..’

यंदाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ती हेच गीत सादर करणार होती. तिचं हे आवडीचं गाणं होतं. मग लतादीदींच्या त्या गाण्याबरोबर राहीपण आपसूकच ते मनात गुणगुणू लागली आणि नकळतपणे ती विचारात पडली..

‘‘हा विठ्ठल इतका काळा! मग तो ‘सुंदर ते ध्यान’ कसा? एका गाण्यात तर त्याला ‘सावळे सुंदर, रूप मनोहर’ असंही म्हटलंय! मध्यंतरी आम्ही गीत रामायणाचा कार्यक्रम सादर केला तेव्हा त्यात मी ‘सावळा गं रामचंद्र’ अगदी कौतुकाने गायलं होतं. आजी तर नेहमीच ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’ हे भावगीत गात असते! देवाचा सावळा रंग चालतो, तर मग माणसाचा सावळा रंग का बरं खटकतो लोकांना? आम्हाला शाळेत जुना ‘संत तुकाराम’ सिनेमा दाखवला होता. त्यात मी पाहिलं होतं की, तुकारामाची बायको तर या विठ्ठलाला चक्क ‘काळतोंडय़ा’ असं म्हणते. मी विचारलं तेव्हा त्यात तिचा देवावर हक्क सांगणारा भक्तिभाव आहे, असं आमच्या बाईंनी समजावलं. आजसुद्धा इथे कितीतरी लोक असतील- जे हक्काने पूजायला आले असतील या काळ्या-सावळ्या विठ्ठलाला. पण कशावरून ते एरवी माणसा-माणसांत भेदभाव करत नसतील? देवाला पूजायचं, पण माणसाला मात्र हिणवायचं! हा कुठला न्याय?’’ राही साखळीपलीकडून एकटक विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघत होती. तिने अनवधानाने डोळे मिटले.

‘‘आई म्हणते तेच बरोबर आहे! आपण अशा लोकांचा विचारच का करायचा? निशाताई दिसायला किती सुंदर आहे, गोरीपान आहे. तिच्या कॉलेजची ‘ब्युटी क्वीन’ होती ती! तिचा होणारा नवरा – उज्ज्वलदादा- तो आला होता एकदा शिबिरात! तोही तर सावळाच आहे की, माझ्यासारखा! पण तिला तो खूप आवडतो, कारण मुळात तिचं मन सुंदर आहे. आणि म्हणूनच तर माझ्या रंगापलीकडे जाऊन तिने माझ्यातला गाण्याचा गुण ओळखला आणि मला परीची मुख्य भूमिका नाटकात करायला दिली. एरवी माझी-तिची ओळख अशी कितीशी होती? फक्त शिबिरापुरती! पण तिला माझ्यातला गुण भावला. दिसण्यापलीकडे, बाह्य़ रूपापलीकडे! पण जर आमचं नाटक हे संगीत-नाटक नसतं तरी तिने ती भूमिका मला दिली असती करायला? हो! नक्कीच! खात्री आहे मला! कारण ती नेहमी हेच म्हणते की, ‘सौंदर्य हे बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतं’..’’

राहीच्या मनात अशा असंख्य विचारांचं काहूर माजलेलं असताना गुरुजींनी गाभाऱ्याची साखळी उघडली, तसे राहीने तिचे डोळे उघडले. समोर उभ्या असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या गळ्यात आता फक्त एक-एक तुळशीची माळ होती. ना फुलांच्या माळा होत्या, न कुठले अलंकार. तरीही त्या काळ्या मूर्ती अतिशय रूपवान दिसत होत्या. राही आईबरोबर गाभाऱ्यात शिरली. तिने विठ्ठलाच्या पायावर तिचं डोकं टेकवलं. तिच्या मनातले नकारात्मक विचार आता कुठच्या कुठे पळून गेले होते. तिचे डोळे पाणावले. तिच्या मनाचा गाभारा निर्मळ, तेजोमय झाला होता.

mokashiprachi@gmail.com

First Published on July 14, 2019 12:02 am

Web Title: story for kids mpg 94
Next Stories
1 आराम हराम आहे!
2 देव भेटला!
3 कडकनाथ बदक
Just Now!
X