27 May 2020

News Flash

छोटे गुप्तहेर

चिन्मय आणि गौरी प्राजक्ताच्या झाडाखाली फुले गोळा करत होते.

|| अपर्णा देशपांडे

चिन्मय आणि गौरी प्राजक्ताच्या झाडाखाली फुले गोळा करत होते. पाठक आजींनी पूजेसाठी टोपलीभर फुले गोळा करून आणायला सांगितले होते. त्यांच्या परसदारी (मागच्या अंगणात) प्राजक्ताचे झाड होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. काही फुलांना ओली माती लागली होती.  फुले घेऊन ते आजीकडे गेले, तर जोशीकाकू, कदमकाका, संजूदादा तिथे गोळा झाले होते. छोटासा चिन्मय त्यांच्या पायाखालून आजीपर्यंत गेला. आजींने सगळे देव मोठय़ा ताम्हणात काढले होते.

‘‘काय झाले आजी?’’

‘‘चिनू, चांदीची हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती चोरीला गेलीये.’’

‘‘आजी, सकाळी तुम्ही मला टोपली दिलीत तेव्हा होते का देव जागेवर?’’

‘‘आत्ता नीट पाहिले रे, पूजा करायला आले नं तेव्हा!’’ आजीच्या डोळ्यांत पाणी होते.

थोडय़ाच वेळात वायफळ गप्पा मारून बाकी मंडळी निघून गेली. आजी पूजेत रमल्या.. पण गौरी मात्र प्राजक्ताच्या झाडाजवळ घुटमळत होती.

‘‘चिनू, हे बघ चिखलात बुटांचे ठसे.’’ गौरी हळूच म्हणाली.

चिनूने नीट पाहिले, बुटांच्या टाचेच्या खाली सहा छोटे छोटे चौकोन असणार! कारण चिखलात तसा स्पष्ट ठसा उमटला होता. झाडामागील भिंतीवरही अर्धवट बुटाचा ठसा होता.

‘‘कुणीतरी पहाटेच इथून एक पाय लावून भिंतीवरून पलीकडे गेलंय.’’ गौरीचे भन्नाट डोके कामाला लागले होते. भिंतीवर लागलेला चिखल अजून ओलाच होता.

‘‘चल, मागे जाऊन पाहूया.’’ दोघे सोसायटीच्या फाटकातून बाहेर गेले. आजीच्या घरामागे भिंतीखाली वाढलेली झुडपे मोडून दबली होती. कुणीतरी उडी मारली हाती नक्कीच!

त्यानंतर ठसे मिळाले नाहीत, कारण तिथे नुसते तण वाढले होते. बराच कचराही होता.

‘‘इथे काय करताय रे!’’ शेजारचे काका विचारत होते.

‘‘काका, या भिंतीवरून चढून कुणी आत येतं का? म्हणजे बॉल आत आला तर!’’

‘‘नाही रे, बॉल कसा येईल? पटांगण तर दूर आहे ना.  घरी जा रे, सुट्टय़ा काय लागल्या, तुम्ही पोरं नुसता धुमाकूळ घालता.’’

दोघे पुन्हा आत सोसायटीमध्ये आले. पाठक आजींनी हाक मारली.

‘‘या रे पोरांनो, गरम गरम थालीपीठ खायला.’’

दोघे टेबल-खुर्ची घेऊन बसले. चिन्मयला समोरचे देवघर दिसत होते.

‘‘आजी, पहाटे घरी कुणी येऊन गेलं का?’’

‘‘दूधवाला येतो बिचारा, पण पिशव्या देऊन बाहेरूनच जातो.’’

‘‘फुलपुडीवाला?’’

‘‘एवढा  सुंदर प्राजक्त आहे ना दारी !! पुडी कशाला आणिक?’’

‘‘मग आजी, मला वाटतं- देव रात्रीच चोरीला गेले असणार. काका-काकू गावाला गेलेत आणि तुम्ही एकटय़ा घरी आहात हे कुणाकुणाला माहीत आहे?’’ गौरी म्हणाली.

‘‘धुणेवाली कमलाबाई फार प्रामाणिक आहे रे. ती असे करणे शक्य नाही.’’

शू आली म्हणून चिनू स्वच्छतागृहात गेला. त्याच्या मागील खिडकीचे गज खूप सल करून ठेवले होते. कमोडवर चढून त्याने पाहिले. तिथल्या काचापण नीट नव्हत्या. एक तर फुटलीपण होती. त्याने ही गोष्ट गौरीला सांगितली.

दुपारी दप्तराला बक्कल लावायला चिनू आणि गौरी चांभाराकडे गेले होते. तिथे काही चपला, बूट पडले होते. चिनूचे डोळे चमकले.

काका, हे बूट छान आहेत. त्याने बूट उचलला. त्याची टाच गौरीला दाखवली. त्याला खाली तसेच सहा छोटे चौकोन होते, जसे ठसे झाडाखाली दिसले होते. बक्कल लावून झाल्यावर दोघे शेजारील पान टपरीमागे लपून बसले.

थोडय़ा वेळात तिथे एक मुलगा आला. त्याच्या हाताला पट्टीपण होती. त्याने बूट घेतले आणि निघाला. चिनू आणि गौरी  सायकल चालवत त्याच्या मागे गेले. तो एका सराफाकडे गेला, त्याने खिशातून एक पुडकं बाहेर काढलं.

चिनू आणि गौरी डोळे विस्फारून बघत होते. ते आजीकडचे चांदीचे देवच होते.

तो मुलगा सोनाराला ते देव विकत होता. सोनार काका त्याला पैसे देणार इतक्यात पोलीस काका तिथे आले आणि त्याला पकडले.

सराफाकडे तो मुलगा जातोय हे बघून मुलांनी एका काकांडून मोबाइल घेऊन पोलिसांना १०० नंबरवर फोन करून कळवले होते. तो मुलगा पलीकडच्या वस्तीत राहणारा होता..

पाठक आजी खूप खूश होत्या. त्यांचे बाप्पा त्यांना मुलांच्या हुशारीने परत मिळाले होते.  आजींकडून दोघांनाही शाळेसाठी नवे दप्तर मिळाले होते.

adaparnadeshpande@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2019 12:11 am

Web Title: story for kids mpg 94 2
Next Stories
1 भाग विली भाग
2 मनाचा गाभारा
3 आराम हराम आहे!
Just Now!
X