27 October 2020

News Flash

चकाकते ते सारेच सोने नसते!

दैनंदिन जीवनात आपल्याला या म्हणीचा प्रत्यय येतो आणि आपल्या फजितीवर आपणच हसतो.

|| डॉ. नंदा हरम

दैनंदिन जीवनात आपल्याला या म्हणीचा प्रत्यय येतो आणि आपल्या फजितीवर आपणच हसतो. आपली जीवसृष्टीही त्याला अपवाद नाही, बरं का? ही गोष्ट नुसती हसण्यावारी न नेता त्याचा त्यांना काहीतरी फायदा होतो. कसा? ते बघू आता.

कॅलिगो या प्रजातीचं फुलपाखरू आऊल बटरफ्लाय म्हणून ओळखलं जातं. फुलपाखरू घुबडासारखं दिसतं, ते कसं काय? या फुलपाखराने पंख पसरवले तर त्याचा पसारा २० सेंमी एवढा असतो. चित्रात दाखविल्याप्रमाणे त्याच्या पंखांवर जी डोळेसदृश नक्षी असते, त्यामुळे ते घुबडच आहे असं वाटतं. यामुळे या फुलपाखराच्या भक्षकांना भीती वाटते आणि त्याचे रक्षण होते. ही फुलपाखरं मेक्सिको, मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात सापडतात.

याशिवाय ‘स्नेकहेड मॉथ’ हा पतंग तर कमालच करतो. त्याच्या पंखांवरील नक्षी अशी असते की काटकोनातून त्याच्याकडे पाहिले असता सापाचं डोकंच आहे, असा भास निर्माण होतो. लगत दिलेल्या चित्रावरून येईलच तुमच्या लक्षात! एवढेच नाही तर, भक्षकांनी त्यांना त्रास दिला असता तो पतंग खाली पडतो आणि अशी काही हालचाल करतो, जणू सापच वळवळतोय! म्हणजेच त्यांनी निर्माण केलेला दृष्टिभ्रम अगदी पक्का केला जातो.

हीच गत ‘फॉक्सहेड मॉथ’ची! छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे, त्यांच्या पंखांवरील नक्षी अशी असते की कोल्ह्यच्या तोंडाचाच भास होतो. थोडक्यात, फुलपाखरू किंवा पतंगाच्या पंखांवरील नक्षी अशा सजीवाची नक्कल करते, ज्यामुळे त्यांच्या भक्षकाला तो कोणीतरी मोठा, भयंकर प्राणी आहे असं वाटावं. आहे की नाही गंमत?

पण तुमच्या मनात येईल, असं कसं शक्य आहे? ते फुलपाखरू किंवा पतंग असल्याचं दिसतं की सरळ सरळ! हो. पण ते आपल्या दृष्टीने. यांच्या भक्षकांची दृष्टी वेगळी असते. त्यांना ठळकपणे बारकावे दिसतात. म्हणजे पंखांवरील मोठ्ठे डोळे (मोठय़ा बाहुल्या) किंवा ठळक रंग त्यांना चटकन जाणवतात आणि त्याचा दुसऱ्या सजीवाशी ते संबंध जोडतात. त्यामुळे फुलपाखरू किंवा पतंगाने केलेली नक्कल अचूक नसली तरी परिणाम मात्र हवा तसा प्रभावी होतो. भक्षक त्याला घाबरतो आणि फुलपाखरू किंवा पतंगाचे प्राण वाचतात. खरंच, निसर्गाशी कोणी बरोबरी करूच शकत नाही. हो ना!

nandaharam2012@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 12:01 am

Web Title: story for kids mpg 94 3
Next Stories
1 छोटे गुप्तहेर
2 भाग विली भाग
3 मनाचा गाभारा
Just Now!
X