30 October 2020

News Flash

चिमुकला गुरू

आज सकाळी सकाळी एक डोळा चोळत आणि नंतर दोन्ही हातांनी आळस देत लहानगा ओम उठला.

|| रूपाली ठोंबरे

आज सकाळी सकाळी एक डोळा चोळत आणि नंतर दोन्ही हातांनी आळस देत लहानगा ओम उठला. तक्रारीच्या स्वरात मला उद्देशून म्हणतो कसा, ‘‘आई गं, हा बघ तुझा अलार्म वाजतो आहे मोबाइलवर.’’

मीसुद्धा धावत पळत त्याच्यापर्यंत पोहोचले आणि पाहते तो काय? मोबाइलवर शुभेच्छांच्या मेसेजेसची मालिका सुरू होती. त्याचे एक तीव्र गायन सुरू होते आणि त्यामुळेच आमचा बाळ आज वेळेपूर्वीच उठला होता. मोबाइल हाती घेऊन त्याला म्हटले, ‘‘बाळा, अलार्म नाही. काल बंद झालेले नेट अचानक सुरू झाले आणि खूप सारे मेसेजेस एकाच वेळी जागे झाले आणि सुरू झाली त्यांची किलबिल.. त्या चिवचिवाटाने तुझी झोप मोडली ना?’’

‘‘हम्म्म.. (एक मोठा हुंकार आणि त्यापाठोपाठ त्याचा त्या दिवशीचा पहिला प्रश्न समोर आला.) आज काय तुझा वाढदिवस आहे? केक मिळणार आज?’’

ते ऐकून हसूच फुटले मला.. ते आवरत म्हटले, ‘‘नाही रे. पण आज गुरुपौर्णिमा आहे ना. आज गुरूचा दिवस. त्याच शुभेच्छांचा हा पाऊस.’’ अपेक्षेप्रमाणे भले मोठे प्रश्नचिन्ह त्या निरागस कोवळ्या चेहऱ्यावर उमटले होते. बोबडय़ा बोलांतून ते माझ्या कानांवर स्थिरावले.

‘‘गुरू? म्हणजे?’’

सकाळी सकाळी घाईगडबडीत अवतरलेला हा प्रश्न. पण त्या शंकेचे निरसन करणे तर भागच होते. मनात म्हटले, सोप्यात सोपे उत्तर देऊन या प्रश्नाला पूर्णविराम देऊन टाकू या आणि मी आपले काही शब्द घेऊन उत्तर मनाशी गुंफू लागले. आणि पुढे त्याच शब्दांचा आधार घेऊन चिमुरडय़ाला समजावू लागले, ‘‘गुरू म्हणजे, ते ते सर्वजण ज्यांच्याकडून माणूस काहीतरी शिकतो.  तुझ्या शाळेतल्या टीचर. तुझी आजी, आबा, तुझी आई, बाबा.. असे सर्व.’’

मी आपली जे जे शिक्षक म्हणून माझ्या त्या क्षणी ध्यानात येत होते त्या सर्वाची नावे आठवून सांगत होते. तोही कुतूहलाने ऐकत होता. त्याच्या बालपणातील अशा सर्व गुरूंची लिस्ट केल्यावर आणि ती त्याला पटल्यावर मला वाटले आता प्रश्न मिटला. पण छे! एक नवा प्रश्न आमच्या दिनचय्रेत अडसर निर्माण करत उपस्थित झाला.

‘‘तुझेपण गुरू आहेत? कोण कोण?’’

पुन्हा एकदा तीच नाती माझी या संबोधनाने त्याला सांगावी लागली.. आठवून आणखी काही नावे अधिक होत गेली. नकळत का होईना आज ओममुळे आजच्या शुभदिनी सकाळी सकाळीच माझ्या साऱ्या गुरूंचे नामस्मरण झाले. त्यानंतर बऱ्यापकी समाधानाची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उठून आली आणि बिछान्यात लोळत पडलेला तो खाली उतरला. चालताचालता तो स्वत:शीच सांगत होता, ‘‘म्हणजे.. गुरू म्हणजे ती सर्व माणसे जी आपल्याला काहीतरी शिकवतात. पण मग ते जे शिकवतात, पण माणूस नसतात ते?’’

झाले.. एक नवा प्रश्न आ वासून सामोरी उभा ठाकला.

‘‘आई.. काल मी त्या पुस्तकातून बघून बघून चित्र काढले ना?’’

‘‘हो, पण मग आता त्याचे काय?’’- आईच्या स्वरात सकाळची घाई आणि त्यामुळे थोडीशी नाराजी जाणवत होती.

‘‘मी एकटाच होतो. म्हणजे काल मला ते चित्र फक्त त्या पुस्तकाने शिकवले. मग ते पुस्तकपण माझा गुरू आहे का? पण ते तर माणूस नाही ना?’’

चिमुरडय़ाच्या या प्रश्नाने मात्र मी चपापले. एवढय़ाशा मुलाच्या मनात हा किती मोठा विचार! मलाही थोडे कुतूहल वाटले आणि थोडी मज्जापण..  त्याला अंघोळ घालता घालता त्याच्या अशा कितीतरी प्रश्नांना भरतीचे उधाण आले आणि त्या प्रश्नांची उत्तरे देता देता माझ्याही मनातील विचारांना चांगली चालना मिळाली आणि मी उत्तर दिले, ‘‘अरे वाह! किती हुशार. हो हो, पुस्तके हीदेखील आपले गुरूच आहेत. आणि हो, ती पुस्तके ज्या लेखकांची देन असते ते सर्वदेखील अप्रत्यक्षरीत्या आपले गुरूच, कारण त्यांच्या विचारांतूनच आपण घडत असतो.’’

स्वत:चा बालविचार आईलाही पटला हे पाहून छोटय़ा युवराजाच्या गालावरची कळी खुलली. तो आणखी उत्साहात म्हणाला, ‘‘मी गोष्टी, कविता, मनाचे श्लोक यातूनही खूप काही शिकतो. ते सर्व मला शिकवतात म्हणजे तेही माझे गुरू, हो ना?’’

 

मी हसत होकारार्थी मान हलवली. ओम पुन्हा विचारात गुंतला आणि त्याने लगेच काहीतरी आठवून विचारले, ‘‘अगं आई, त्या दिवशी तू म्हणालीस बघ.. त्या मुंगीकडून शिकायची ती जिद्द, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न करण्याची चिकाटी.. म्हणजे ती मुंगीपण?’’

यावर मला थोडे हसू येत असले तरी एक वेगळे कौतुक वाटत होते.

‘‘हो. प्राणी, पक्षी.. ही झाडे, आकाश, धरती, सूर्य, तारे.. हे आपले सर्व निसर्गमित्र आपल्याला सतत काहीतरी शिकवत असतात. त्यामुळे ते सर्वही गुरूच आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाने नित्य कृतज्ञ असावे. तू ग. दि. माडगूळकरांची ती कविता ऐकली आहेस का? आणि मी ती कविता गुणगुणू लागले,

बिनभिंतींची उघडी शाळा

लाखो इथले गुरू..

झाडे, वेली, पशू, पाखरे

यांशी गोष्टी करू!’’

माझ्यासोबत ओमसुद्धा हे नवे गाणे आवडीने गाऊ लागला. गाणे म्हणता म्हणता मी स्वत:शीच म्हटले, ‘‘खरेच, या जगात प्रत्येकजणच कोणाचा तरी गुरू असतो आणि कोणाचा तरी शिष्य असतो. ही दोन्ही नाती एखाद्या स्फटिकाप्रमाणे निर्मळ असतात.’’

माझे असे स्वत:शीच पुटपुटणे जिज्ञासू ओमसाठी एका नव्या प्रश्नाचा स्रोत होते.

‘‘म्हणजे मीपण कुणाचा तरी गुरू? वाहव्वा! कुणाचा?’’

मी हसले आणि म्हटले, ‘‘हो आहे ना.. माझा बाळ माझाच गुरू आहे.’’

‘‘तुझा?’’ – ओम.

‘‘हो.. मग काय तर! किती काही शिकते मी तुझ्याकडून आणि तुझ्यामुळे.. अगदी प्रत्येक क्षणाला. प्रत्येक आई ही जशी प्रत्येक मुलाची प्रथम गुरू असते. अगदी तसेच येणारे मूल हे त्या आईसाठी एक नवा, खूप काही शिकवणारा चिमुकला गुरू असतो. फक्त या लहानग्यांकडून शिकण्याची कला आपणा मोठय़ांमध्ये असली पाहिजे.’’

हे बोलणे ऐकून ओम खुद्कन हसला. एक वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर  दिसत होता.आनंदाने उडय़ा मारत त्याने मघाशी अध्र्यावर विरलेली माडगूळकरांची कविता पुन्हा तेथूनच गुणगुणण्यास सुरुवात केली.

बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवीत फिरते फुलपाखरू

सुगरण बांधी उलटा वाडा, पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिनपायांचे बेडकीचे लेकरू

कसा जोंधळा रानी रुजतो, उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा फस्त खाऊनी करू

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, कडय़ा दुपारी पऱ्ह्यत पोहू

मिळेल तेथून घेऊन विद्या अखंड साठा करू.

rupali.d21@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2019 12:02 am

Web Title: story for kids mpg 94 4
Next Stories
1 चकाकते ते सारेच सोने नसते!
2 छोटे गुप्तहेर
3 भाग विली भाग
Just Now!
X