26 March 2019

News Flash

अदलाबदलीचा  सौदा

बोलता बोलता आजीने तिला एक्स्चेंज ऑफरची आयडिया सांगितली.

प्रतिनिधिक छायाचित्र

दोस्तांनो, आजकाल आपल्याकडे व्हॅलेंटाइन डे.. मदर्स डे.. फादर्स डे असे डे- म्हणजेच दिवस साजरे केले जातात. तस्साच एक दिवस आपण मराठी भाषा बोलणारे मोठय़ा अभिमानाने साजरा करतो २७ फेब्रुवारीला.. तो म्हणजे ‘मराठी राजभाषा दिन’! आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल, की तो २७ फेब्रुवारीलाच का? तर मराठीतील थोर लेखक-कवी कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिन. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला, म्हणून त्यांच्या जन्मदिनी आपण मराठी दिन साजरा करतो. आजकाल बहुसंख्य मुले इंग्रजी माध्यमातून शिकतात. त्यामुळे त्यांची मराठी वाचनाची सवय कमी झालीय. पण आपल्या मराठी भाषेतही तुमच्याएवढय़ा मुलांसाठी नामांकित लेखकांनी खूप छान छान पुस्तके लिहिलेली आहेत बरं का! अशा या मराठी भाषा दिनाच्या दिवशी एका आज्जीने मराठीशीच कट्टी घेणाऱ्या नातीबरोबर केलेल्या अदलाबदलीच्या सौद्याची- म्हणजेच ‘एक्स्चेंज ऑफर’ची ही गोष्ट!

तुमच्यापैकी प्रत्येकाने ‘एक्स्चेंज ऑफर’ हा शब्द ऐकला असेल ना! ‘एक्स्चेंज ऑफर’ म्हणजे कशाच्या तरी बदल्यात काहीतरी मिळवणे. म्हणजेच आपल्या आणि समोरच्याजवळच्या वस्तूंची अदलाबदल करणं. पण आज्जी आणि नातीच्या या ऑफरमध्ये काही कुठल्या वस्तूची दुकानातली खरेदी वगैरे नव्हती बरं का! तरीही या ऑफरमुळे दोघींना खूप फायदाही झाला आणि त्याहीपेक्षा दोघींना खूप आनंदही झाला.

त्याचं काय झालं- ईशाची दुसरीची परीक्षा झाल्यावर तिच्या आई-बाबांना कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी कॅनडाला जावं लागणार होतं. आजी-आजोबा, इथली शाळा आणि मित्रमंडळींना सोडून जाताना ईशाला खूप वाईट वाटलं होतं. सुरुवातीला टोरान्टोच्या शाळेतल्या मुलांचे, टीचरचे इंग्लिश बोलणे तर तिला नीट समजतच नसे. पण हळूहळू तिला सवय झाली. तीसुद्धा तिथल्याच पद्धतीने छानपैकी इंग्लिशमध्ये बोलायला लागली. मात्र, या सगळ्यात एक गडबड झाली. ते जिथे राहत होते त्यांच्या आजूबाजूला मराठी बोलणारे कुणीच नव्हते. त्यामुळे फक्त घरात आई-बाबांशीच मराठी बोलणे होई. त्याहून अधिक मराठी भाषा तिच्या कानावर पडतच नसे. आणि बाहेर तर सगळीकडेच इंग्रजीचा वापर चाले. त्यामुळे ईशाचे मराठी बोलणे हळूहळू खूप कमी होऊ  लागले. पण तीन वर्षांनंतर आईचे तिथले काम संपल्याने बाबा तिथे मागे राहिला आणि आई ईशाला घेऊन भारतात आली. इथे त्यांच्या आजूबाजूला सगळेच मराठी बोलणारे. पण ईशाची मराठी बोलण्याची सवय तिथे मोडलेली होती. शाळेत अभ्यासात तिला फार अडचण वाटली नाही, पण सगळ्यांशी मराठी बोलायला मात्र कठीण वाटे. तसे तिला सगळ्यांचे बोलणे समजायचे, पण पटकन् बोलता यायचे नाही. आपल्या बोलण्याला कुणीतरी हसेल असे वाटून ती कुणाशी बोलणेच टाळू लागली. क्वचित ती बोलायला लागली तर थोडे अडखळत बोलायची किंवा चुकीचं मराठी बोलायची. एकदा तिच्या मोडक्यातोडक्या मराठीला कुणीतरी चिडवलं तेव्हा तिला खूपच राग आला. आणि तिनं ‘यापुढे ओन्ली इंग्लिश.. नो मराठी अ‍ॅट ऑल..’ असं रागारागानं घरात जाहीर करून टाकलं. तिचा राग शांत करताना तिच्या आजीनं विचारलं, ‘‘मला सांग, इथून तू कॅनडाला गेलीस तेव्हा तू छान मराठी भाषा बोलायचीस की नाही? त्याउलट, कॅनडात गेल्यावर तुला सुरुवातीला इंग्लिश बोलायला चांगलं जमत नव्हतं ना? पण तू प्रयत्न केल्यावर जमलंच की नाही? मग आता तस्संच बिनचूक मराठी बोलण्याचा प्रयत्न कर पाहू! अगं, कितीही झालं तरी मराठी आपली मातृभाषा आहे. ती प्रत्येकाला निदान व्यवस्थित बोलता तरी यायलाच हवी. आपल्या मातृभाषेचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी तर म्हणते की, पुढे तू जमतील तितक्या भाषा शिकून घे. कारण भाषा सगळ्याच चांगल्या आहेत. पण त्याआधी आपली मातृभाषा मात्र बोलता यायला हवी.’’

बोलता बोलता आजीने तिला एक्स्चेंज ऑफरची आयडिया सांगितली. आज्जी म्हणाली, ‘‘तुझी तयारी असेल तर मी तुला पहिल्यासारखे उत्तम मराठी बोलायला शिकवीन. पण त्याच्या बदल्यात तूपण मला काहीतरी शिकवले पाहिजेस.’’

ईशाने गोंधळून विचारले, ‘‘आज्जी, तू तर केवढी मोठ्ठी आहेस. मी काय शिकवणार तुला?’’

‘‘अगं सोप्पंय. मी तुझी गुरू होते आणि तू माझी गुरू व्हायचेस. मला ना, तुमचा संगणक- म्हणजे कम्प्युटर वापरता येत नाही. तुम्ही तिथे होतात तेव्हा कित्ती वेळा तुमच्याशी स्काइपवर बोलावेसे वाटायचे, पण त्यासाठी आजोबांची वाट बघावी लागायची. तुला संगणक वापरता येतो ना छानपैकी.. मग तू शिकवशील मला?’’ आजीच्या प्रश्नाने ईशाचे डोळे चमकले.

‘‘येस्स.. डन.’’ ईशाने खूश होऊन उडीच मारली.

दोस्तांनो, अशा प्रकारे आजीने ईशाला फाडफाड मराठी बोलायला शिकवायचे आणि त्याबदल्यात ईशाने आजीला फटाफट संगणक शिकवायचा, असा दोघींमध्ये अदलाबदलीचा करार झाला. तोही आजोबा आणि तिच्या आईच्या नकळत. दुपारी दोघी गुपचूप एकमेकींचा अभ्यास घेत. आजी ईशाकडून सोपी सोपी मराठीतील गोष्टीची पुस्तके वाचून घ्यायची. तसेच थोडे थोडे मराठी शुद्धलेखनही लिहायला द्यायची. हळूहळू ईशाचा बिनचूक मराठी बोलण्याचा आत्मविश्वास वाढू लागला. तिला मराठी पुस्तकं वाचणं छान जमायला लागलं. त्याचप्रमाणे आजीही जुजबी संगणक वापरायला शिकली. ती यूटय़ूब पाहू लागली. त्यावर तिच्या आवडीचे खाना खजाना, ओरिगामीचे व्हिडीओ पाहून नवे प्रकार ती शिकली. वेळ मिळाला तर सॉलिटेरचा एखादा डावही खेळू लागली.

‘‘ए आजी, आता आपण ही एक्स्चेंज ऑफरची गंमत कधी सांगायची गं सगळ्यांना?’’ ईशाला आता धीर निघत नव्हता.

‘‘अगं ए, आपलं ठरलंय ना येत्या २७ तारखेला- म्हणजेच मराठी राजभाषा दिनाला तू, आजोबा, आई आणि स्काइपवरच्या बाबाला मराठी पुस्तकातली गोष्ट स्पष्टपणे वाचून दाखवायची! पण त्यासाठी कम्प्युटर मात्र मी स्वत: चालू करणार आणि तुझ्या बाबाशी स्काइपवर बोलणार.’’

‘‘म्हणजे आपण दोघीही आई-बाबा, आजोबा सगळ्यांना चकित करणार ना आज्जी?’’ ईशा जामच खूश झाली होती.

‘‘म्हणजे मस्त झालाय की नाही आपला अदलाबदलीचा सौदा?’’ म्हणत आजीने ईशाकडे टाळीसाठी हात पुढे केला.

अलकनंदा पाध्ये alaknanda263@yahoo.com

First Published on February 25, 2018 1:01 am

Web Title: story for kids on marathi language day occasion