स्वित्र्झलडहून जेनीनं एक  अनोखं बीज आणलं आणि ते बगीच्यात लावलं. नियमितपणे खतपाणी देऊन तिनं ते रुजवलं. पावसानं ते अंकुरलं. भूमातेच्या उदरातून लाजरंबुजरं इवलंसं रोप कुतूहलानं बाहेर डोकावू लागलं. लहानशा बाळाला जसा पहिलावहिला दात यावा, तसं रोपाला पहिलंवहिलं पान फुटलं. एका पानाची झाली दोन. दोनाची झाली चार. आणि बघता बघता झाडाला पालवी फुटली. हिरवीगार. पाचूसारखी चमचमणारी. वारा येताच पालवी सळसळायची. जेनी कुतूहलानं झाडाची प्रगती बघायची. झाड अधिकाधिक मोठं होऊ लागलं. झाडाला पहिलीवहिली ‘कळी’ आली. जेनीचा आनंद गगनात मावेना. तिनं ती आनंदवार्ता तिची जिवलग मैत्रीण ‘रुमा’ हिला ऐकवली. रुमा धावत धावत बगीच्यात आली. दोघींनी जवळून ती सुंदर कळी निरखून पाहिली. त्या मैत्रिणींच्या नजरेतलं प्रेम आणि जिव्हाळा कळीनं ओळखला. तिचं मन त्यांच्या प्रेमभावनेनं भरून आलं. तेवढय़ात रुमाची बंड, वात्रट, खोडकर बहीण हुमा,  रुमाला बोलवायला बगीच्यात आली. जेनी आणि रुमा, एवढय़ा कुतूहलानं काय बघताहेत ते तिनं पाहिलं आणि तुच्छतेनं हुमा हसून म्हणाली, ‘‘काय आहे गं एवढं त्या कळीत? मॅडच आहात तुम्ही.’’
‘‘होऽऽ! आहोतच आम्ही मॅड. झालं तुझं समाधान?’’ जेनी जरा रागातच म्हणाली. का कोण जाणे पण कळीला काही हुमाची ती दुष्ट नजर आवडेना. जेनी आणि रुमाचे हात खराब झाले होते. हात धुण्याकरिता दोघीही घरात गेल्या. तेवढय़ात दुष्ट हुमाच्या मनात आलं, ‘आपण ही कळीच तोडून टाकावी. कळीचं हुमाकडे लक्ष होतंच. तिनं हुमाच्या नजरेतला तो दुष्ट विचार ओळखला. भीतीनं ती शहारली. काय करावं ते तिला सुचेना. ती पानांना म्हणाली, ‘‘हिरव्या हिरव्या पाचूच्या पानांनो! ती बघा दुष्ट हुमा. पाय उंच करून मला खुडण्याचा प्रयत्न करतेय. मला वाचवा.’’  पानं कनवाळू होती. ती म्हणाली, ‘‘कळीताई! तू काळजी करू नकोस.’’ हिरव्या पानांनी कळीला चहुबाजूंनी आच्छादून टाकलं. हुमाला आता कळी कोठे दडली आहे ते दिसेना, तेवढय़ात जेनी आणि रुमा हात धुऊन बाहेर आल्या. त्यांना पाहून हुमा तिथून पळून गेली. कळीनं पानाआडून पुन्हा डोकं बाहेर काढलं आणि पानांचे तिनं मनापासून आभार मानले. कळी मनाशी खुदकन हसली. हळूहळू चिमुकली कळी अंगापिंडानं भरू लागली. फुलू लागली. तिच्या पाकळ्यांचे रंग खुलू लागले आणि एक दिवस कळीचं रूपांतर डौलदार आकर्षक फुलात झालं. ते दिमाखदार फूल पाहून जेनी हरकली. रुमा म्हणाली, ‘‘जेनी! फुल पूर्ण फुललंय. ते लवकरच खुडून घ्यायला हवं. नाही तर ते कोमेजून जाईल. त्याच्या पाकळ्या गळून जातील.’’
‘‘एऽऽऽ रुमा, राहू दे ना गं ते झाडावर. झाडावरच ते शोभून दिसतं. मी नाही बाई ते तोडणार आणि कोणाला तोडूपण नाही देणार.’’ फुलाच्या जिवात जीव आला. जेनीचं आपल्यावरचं प्रेम पाहून ते भारावून गेलं.
*****
जेनीच्या घरात एक दुर्घटना घडली. जेनीचा मोठा  भाऊ बेसिल हा देशाच्या संरक्षणाकरिता झालेल्या युद्धात शहीद झाला. जेनीच्या घरात शोकाचं वातावरण असलं तरी आपल्या कुटुंबातील मुलगा देशाकरिता शहीद झाला आहे, ही भावना त्या कुटुंबाला गौरवान्वित करणारी होती.
बेसिलचा लष्करी गणवेशातील रुबाबदार फोटो टेबलावर नीटनेटका ठेवलेला होता. बेसिलला श्रद्धांजली वाहण्याकरिता स्वत: मेयर आले होते. फोटोकडे पाहिल्यावर ते म्हणाले, ‘‘फोटो खूपच छान आहे. या फोटोला वाहण्याकरिता तसलंच एखादं डौलदार सुरेख फूल हवं होत.’’ जेनीनं ते ऐकलं आणि ती तात्काळ बगीच्याकडे धावली. ती फुलाला म्हणाली, ‘‘बाबा रेऽऽ! मी तुला तोडणार नव्हते. पण माझ्या शहीद झालेल्या भावाच्या फोटोला वाहण्याकरिता तुझ्याएवढं योग्य फूल अख्ख्या बगीच्यात नाही.’’
फूल जिवाच्या भीतीनं घाबरलं. ते काकुळतीनं पानांना म्हणालं, ‘‘पानांनो! मला तुम्ही आता पुन्हा पूर्वीसारखं लपवा.’’ पानं शहाणी होती. ती म्हणाली, ‘‘फुला! तू भाग्यवान आहेस. अरे, शहीदाच्या छायाचित्रावर वाहिलं जाण्याचा बहुमान तुला मिळतोय. तुझ्या जीवनाचं सार्थक होणार आहे. आम्ही नाही तुला दडवणार. तू देखील ही संधी दवडू नकोस.’’ फुलाला आपली चूक उमगली.
जेनीने पाय उंचावले आणि हळुवारपणे ते फूल खुडून घेतलं. मेयरने ते बेसिलच्या छायाचित्राला श्रद्धापूर्वक वाहिलं. त्या वेळी त्या फुलात दडलेला दवबिंदू फुलाचा कृतज्ञता अश्रूबिंदू होऊन छायाचित्राच्या काचेवर ओघळला. फुलाच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं.
भालचंद्र देशपांडे
lokrang@expressindia.com