News Flash

चाणाक्ष चित्रकार

एका नगरामध्ये एक राजा राहत होता. तो डाव्या डोळ्याने तिरळा होता. त्या नगरात एक जयसेन नावाचा कुशल चाणाक्ष चित्रकार होता.

| October 20, 2016 02:55 pm

एका नगरामध्ये एक राजा राहत होता. तो डाव्या डोळ्याने तिरळा होता. त्या नगरात एक जयसेन नावाचा कुशल चाणाक्ष चित्रकार होता.
एक दिवस त्या चित्रकाराची परीक्षा घेण्यासाठी राजाने त्याला दरबारात बोलाविले.  राजाच्या आमंत्रणाने चित्रकार थोडासा गोंधळला, पण राजाच्या आमंत्रणाला मान देवून राजाला भेटणं आवश्यकच होतं, त्याप्रमाणे तो राजाला भेटायला गेला.  राजाला नमस्कार करून त्याच्यापुढे उभा राहिला. राजा म्हणाला, ‘‘तू माझे मला आनंद आणि समाधान वाटेल असे चित्र काढा. जर त्या चित्राने मला समाधान मिळाले नाही तर मी तुला शिक्षा करेन.’’ राजाचे हे बोलणे ऐकल्यावर घाबरतच चित्रकाराने म्हटले, ‘‘महाराज, मी आपल्याला आनंद वाटेल असे चित्र काढण्याचा प्रयत्न करीन.’’ पण मनामध्ये मात्र चित्रकार उदास झाला होता. राजाला आनंदित करणारे राजाचे चित्र कसे काढायचे असा प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला.
विचार करीतच खिन्न मन:स्थितीत तो जंगलात गेला. त्याने विचार केला, राजाचे वास्तवदर्शी चित्र काढले तर तिरळा डोळा पाहून राजा रागावेल आणि डावा डोळा तिरळा काढला नाही तर लोक निंदा करतील. पैशाच्या लोभाने मी राजाचा डावा डोळाही चांगला काढला, असा आरोप माझ्यावर करतील. विचार करीत करीतच तो जंगलामध्ये फिरत होता. आणि अकस्मात त्याला एक शिकारी दिसला. त्याचा एक डोळा मिटलेला होता. एका पक्ष्याला मारण्यासाठी डावा डोळा मिटून बाण लावलेले धनुष्य ओढून तो उभा होता. त्या शिकाऱ्याला तशा अवस्थेत पाहून चित्रकार जयसेनला आनंद झाला. त्याने विचार केला, शिकारीत मग्न असलेल्या राजाचे असे चित्र जर आपण काढले तर राजाही रागावणार नाही आणि लोकनिंदेचे भयही राहणार नाही.
आनंदाने घरी येऊन त्याने काही दिवसांतच शिकारीमध्ये मग्न असलेल्या डावा डोळा मिटलेल्या राजाचे चित्र रेखाटले आणि ते राजाला दाखविले. राजा आनंदित झाला आणि त्याने चित्रकाराचा सत्कार करून त्याला बक्षीस म्हणून पुष्कळ धनसंपत्ती दिली.
नगरामधील सर्व लोकांनाही राजाचे ते चित्र पाहून आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. आश्चर्यचकित झालेले ते सर्व जण म्हणाले, ‘‘केवढे हे चित्रकाराचे चातुर्य! कलावंत असावा तर असा चाणाक्ष!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2013 1:02 am

Web Title: story of astute painter
टॅग : Stories
Next Stories
1 माहितीजाल : पहिल्या पावसात मातीचा सुगंध का दरवळतो?
2 एकमेका साह्य़ करू..
3 नभांगणाचे वैभव : वृश्चिक राशीतील एम-४ तारकागुच्छ
Just Now!
X