लहानपणी वाचलेल्या अनेक पुस्तकांचं गारूड आपल्या मनावर कायम राहतं. ही पुस्तकं आपलं आयुष्य बदलून टाकतात, त्यास नवा आकार देतात.. मोलाची शिकवण देतात. अशा पुस्तकांविषयी..
नुकताच पाचवीतून सहावीत गेलो होतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत, माझ्या वाढदिवसाला आई-बाबांनी दरवर्षीप्रमाणे एक पुस्तक दिलं. पहिलं पान वाचताक्षणीच या पुस्तकाने मला भारावून टाकलं, ते अगदी आजतागायत.
गोष्टीची सुरुवात होते तीच दोन छोटय़ा मुलांच्या आईला दरोडेखोरांनी चोरल्यापासून! शंभरएक वर्षांपूर्वीच्या अमेरिकेतलं एक कृष्णवर्णीय कुटुंब. आई-वडील आणि दोन मुलं. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे गुलाम असलेले वडील मालकासोबत परगावी गेलेले. आईला दोन मुलांसोबत गुलाम खरेदी करायच्या बाजारातून एका सहृदय माणसाने विकत घेतलं. आपल्या घरीच एका वेगळ्या झोपडीत त्यांची राहायची सोय केली. एका रात्री याच झोपडीतून काही गुलाम-चोरांनी आईला चोरून नेलं. मोठा मुलगा आठ-दहा वर्षांचा, धाकटा काही महिन्यांचं तान्हं बाळ. दोघांना त्यांच्या मालक-मालकिणीने आधार दिला. मोठा मुलगा काही वर्षांत शिकण्याकरिता आणि काम शोधण्याकरिता घराबाहेर पडला आणि या दोन भावांचीही ताटातूट झाली. धाकटा मुलगा कृश, नाजूक तब्येतीचा. खूप अबोल, किंबहुना त्याच्या बोलण्यातच दोष होता. मोठय़ा मायेने आणि कष्टाने त्या पती-पत्नीने त्याला वाढवला.
शेतीकाम त्याला झेपायचं नाही, मात्र आईसारख्या असणाऱ्या मालकिणीच्या हाताखाली तो स्वयंपाकाचं कसब शिकला. उत्तम शिवणटिपण आत्मसात केलं. कपडे स्वच्छ धुवायची कला आत्मसात केली. मालकाच्या हाताखाली शेतात, परसबागेत काम करताना हा छोटा मुलगा एकाग्र होत असे. या रोपांशी, फुलांशी तन्मयतेने गप्पा मारत असे. उपजत जाणिवेने पाणी देण्याचं प्रमाण, रोपांची जागा, लागणारा सूर्यप्रकाश इत्यादी गोष्टी निगुतीने जपत असे. हळूहळू त्या पालनकर्त्यां उभयतांच्या नजरेत ही गोष्ट आली. सोबतच शालेय शिक्षण चालू होतं. कृष्णवर्णीय म्हणून होत असलेल्या हेटाळणीवर हा छोटा आपल्या अंगभूत गुणांनी मात करत गावात लाडका झाला.
अशी सुरू झालेली ही गोष्ट पुढे जाते तेव्हा हा मुलगा मोठय़ा कष्टाने शिकून, अनेक अडचणींवर मात करून एक अग्रणी शेतीतज्ज्ञ झालेला असतो. त्या चिमुकल्या मुलाचा तज्ज्ञ होण्यापर्यंतचा प्रवास विलक्षण आहेच, मात्र त्याच्याबाबतीतली एक गोष्ट माझ्या कायम स्मरणात राहिली आहे. त्यावेळचे गडगंज श्रीमंत, गुणग्राहक उद्योजक हेन्री फोर्ड एकदा या शेतीतज्ज्ञाला भेटले. त्यांच्या उत्तम संशोधनाची, समाजाभिमुख शेती-सल्ल्याची ख्याती फोर्ड यांच्यापर्यंत पोहोचली होतीच, तेव्हा त्यांच्या भेटीप्रीत्यर्थ फोर्ड यांनी या तज्ज्ञाला एक भेट द्यायचं ठरवलं. काय भेट आवडेल तुम्हाला?’ या प्रश्नावर ‘मला एक उत्तम प्रतीचा हिरा भेट दिल्यास आभारी राहीन,’ या उत्तराने फोर्ड आनंदी झाले. या कफल्लक दिसणाऱ्या बुद्धिमान माणसाने त्यांच्या तोलामोलाची गोष्ट भेट म्हणून मागितली होती. फोर्ड यांनी टपोरा हिरा निवडला, तो एका अंगठीत जडवला आणि या तज्ज्ञाकडे पाठवून दिला. पुढे काही वर्षांनी उभयतांची पुन्हा भेट झाली तेव्हा ती अंगठी बोटात नाही हे पाहून फोर्ड यांनी नाराजीनेच विचारलं, ‘तुम्हाला हिऱ्याची अंगठी पसंत पडली नाही का?’ त्यावर तज्ज्ञाने दिलेलं उत्तर थक्क करणारं आहे. ‘अहो, पसंत न पडायला काय झालं? तुम्ही निवडलेला हिरा अप्रतिमच आहे. मात्र तुमचा काही गैरसमज झालेला दिसतो.’
फोर्ड बुचकळ्यात पडलेले पाहून तज्ज्ञाने त्यांना सोबत चलण्याची विनंती केली. दोघं संस्थेच्या प्रयोगशाळेत आले. तिथे कार्बनच्या विविध रूपांचं एक छोटेखानी प्रदर्शन होतं. ‘माझ्या विद्यार्थ्यांना कोळसा, पेन्सिलमधलं शिसं वगैरे रूपं मी दाखवू शकत होतो, तुमच्या दानशूर वृत्तीमुळे आज माझ्या विद्यार्थ्यांना कार्बनचं शुद्ध रूप, हिरा पाहायला मिळतो.’ अतिशय मौल्यवान अशा या खडय़ाचं मोल या शेतीतज्ज्ञाकरिता कार्बनच्या एका रूपापेक्षा तसूभरही अधिक नाही आणि हा हिरा आपल्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो यासारखा दुसरा आनंद नाही ही गोष्ट फोर्ड यांना थक्क करून गेली.
‘बालमैफल’च्या माझ्या छोटय़ा दोस्तांनो, या शेतीतज्ज्ञाचं नाव आहे डॉ. जॉर्ज वॉशिंग्टन काव्‍‌र्हर. अलाबामा राज्यातल्या टस्कगी ही यांची कर्मभूमी. डॉ. काव्‍‌र्हर यांच्या जीवनाचं सार, त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘जिथे आहात तिथपासून, हाती असलेल्या साधनांपासून सुरुवात करा. त्यापासून काही नवं घडवा. कधीच समाधान मानून थांबू नका.’
माझ्या शाळेच्या दिवसांत सगळ्यात मोठा फायदा डॉ. काव्‍‌र्हर यांच्यावरच्या या पुस्तकामुळे मला झाला; तो म्हणजे फक्त परीक्षेकरिता अभ्यास करण्यापासून मी स्वत:ला ठामपणे लांब ठेवू शकलो. दहावीत कमी मार्क पडले तर काय, या भितीपेक्षा, माझा अभ्यास मला किती कळला, त्याचा उपयोग करून मी रोजच्या आयुष्यात कसे प्रश्न सोडवू शकतो याचा विचार करायला लागलो. लहानपणी वाचलेल्या या पुस्तकाचा परिणाम आजही माझ्यावर आहे. कधी अपयश आलं, निराश झालो की या पुस्तकाचं कोणतंही पान उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. आपले प्रश्न खूप छोटे भासतात. नवी उमेद येते.
हे पुस्तक कुणासाठी? मराठी वाचता येणाऱ्या पाचवी-सहावीपुढच्या सर्वासाठी.
‘एक होता काव्‍‌र्हर’- वीणा गवाणकर,
राजहंस प्रकाशन
ideas@ascharya.co.in

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता