काही दिवसांपूर्वीच अर्णवच्या बाबांची पुण्यात बदली झाली होती. त्यामुळे राहण्याचे ठिकाण, शाळा, मित्र सर्वच त्याच्यासाठी नवे होते. तो मुळातच हुशार आणि सगळ्यांच्यात मिसळणारा होता, पण त्याच्या सोसायटीत समवयस्क मित्र नसल्याने त्याला घरीच एकटे खेळावे लागत असे. शाळेतही नवा असल्याने अजून कोणाशीही मैत्री जमली नव्हती. वर्गातल्या मुलांचे आधीपासूनच ग्रुप असल्याने त्याला अजून कोणी सामावून घेतले नव्हते. त्यामुळे तो तसा एकटाच पडला.
एकदा मधल्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर शाळेत फिरत असताना त्याला खेळाच्या हॉलमध्ये काही मुले कॅरम, बुद्धिबळ खेळताना दिसली. तिथल्या मुलांशी बोलताना कळले की शाळेतील शिक्षक शाळा सुटल्यावर या खेळांचे मार्गदर्शन करतात. बुद्धिबळ या खेळाबद्दल खूप उत्सुकता असल्यामुळे ते शिकायला मिळणार याचा त्याला अतिशय आनंद झाला.
सागर आणि श्री ही वर्गातील मुले त्याला तेथे दिसली. त्यांच्याकडे अर्णवने चौकशी केली. त्यांना अर्णवची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी अर्णवला खेळायला बोलावले आणि चार-पाच चालीत हरवून त्याची खिल्ली उडविली.
सागर म्हणाला, ‘अरे, बुद्धिबळ खेळण्यास बुद्धी लागते. कोणी ऐरागैरा खेळू शकत नाही हा खेळ. तू या खेळासाठी पात्र नाहीस.’
‘तू मैदानी खेळ खेळावेस हे उत्तम,’ श्रीने त्याला अनाहूत सल्ला दिला.
अर्णवने शिक्षकांजवळ बुद्धिबळ शिकण्याची इच्छा व्यक्त केली. ‘सहा महिन्यांनी होणाऱ्या आंतरशालेय स्पर्धाची तयारी करून घेत असल्याने नवे विद्यार्थी आता नकोत. स्पर्धेनंतर येऊन भेट.’ शिक्षक म्हणाले. अर्णव हिरमुसला. घराकडे परतल्यावर सोसायटीच्या पायरीवर बसून रडू लागला.
‘अरे, का रडतोस तू? काही होतंय का?’ जिन्यावरून खाली उतरणाऱ्या श्यामकाकांनी प्रेमाने त्याची विचारपूस केली. तेव्हा अर्णवने शाळेत घडलेला प्रकार त्यांना सांगितला.
‘एवढंच ना! मी शिकवतो की तुला बुद्धिबळ. पण डोळे पूस बघू आधी. शहाणी मुलं रडत नसतात,’ असे म्हणून ते त्याला स्वत:च्या घरी घेऊन गेले. हॉलमध्ये असलेली बक्षिसे, मेडल्स, प्रशस्तिपत्रके खेळातले काकांचे प्रावीण्य दर्शवत होती. तो अवाक झाला.
‘काका, शाळा सुटल्यावर रोज येऊ  ना?’ काकांकडून आश्वासन घेऊन अर्णव उत्साहात घरी आला.
काकांनी प्रथम त्याला बुद्धिबळाच्या मोहऱ्यांची माहिती दिली व प्राथमिक नियम समजावले. हळूहळू डावाची सुरुवात कशी करावी? कॅसलिंग करून राजा सुरक्षित कसा करावा? राजाला कोणी शह दिल्यास काय करावे, इत्यादी खेळातील तंत्र सांगितले.
आठ-दहा दिवसांनी काका त्याला म्हणाले, ‘चल, आज माझ्याशी खेळ! बघू या तुझी किती तयारी झाली ते.’ साहजिकच अर्णव हरला. चेहरा पाडून अर्णव म्हणाला, ‘मला हा खेळ कधीच खेळता येणार नाही बहुतेक. मी हा खेळ खेळण्यास पात्र नाही, असे सागर म्हणाला होता ते बरोबरच आहे.’
त्याच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहून काका म्हणाले, ‘सायकल चालवायला शिकलास तेव्हा निदान एकदा तरी पडला असशीलच ना! मग काय? पडलास, थोडंसं लागलं म्हणून सायकल चालवणं सोडून दिलंस का? तसंच आहे हे. आणि हरला असलास तरी आठ-दहा दिवसांपूर्वीच्या खेळापेक्षा खूपच प्रगती आहे तुझ्यात.’ श्यामकाकांनी समजूत घातल्यामुळे अर्णवची कळी पुन्हा खुलली. खेळात होत असलेल्या चुका समजून घेऊन त्या टाळण्याचा त्याने निश्चय केला. खेळात उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊ  लागली.
काकांनी घोडा, उंट, हत्ती, वजीर यांची खास कैची त्याला शिकवली. म्हणजे या मोहऱ्यांनी शह देऊन प्रतिस्पध्र्याचे महत्त्वाचे मोहरे मारण्याचे तंत्र शिकवले. क्षुद्र वाटणाऱ्या प्याद्यांची या खेळात महत्त्वाची भूमिका असते, ते सांगून डावाची अंतिम स्थिती कशी हाताळायची हेही त्याला शिकवले. आता अर्णव कठीण पातळीचा खेळ लीलया खेळू लागला.
काकांनी खूश होऊन त्याला बुद्धिबळ खेळाची सीडी दिली. ‘अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता मोकळ्या वेळात संगणकाशी खेळून सराव कर बरं का!’ काकांनी सूचना केली.
या सर्व गोष्टीला आता तीन-चार महिने झाले होते. आंतरशालेय स्पर्धेसाठी स्पर्धक निवडण्यासाठी शाळेत बाद फेरीची स्पर्धा आयोजित करण्यात आली. अर्णवचे नाव पाहून सागर, श्री आणि इतर विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटले. अर्णवने त्या स्पर्धेत बाजी मारून तिसरा क्रमांक पटकावला.
‘शाबास अर्णव, तू आमच्यावर नाराज न होता स्वत:च्या हिमतीवर आंतरशालेय स्पर्धेसाठी पात्र ठरलास.’ शिक्षकांनी पाठ थोपटली.
मुख्य स्पर्धेस जेमतेम एक महिना उरला होता. ‘घडय़ाळ लावून चाली करायचा सराव कर. प्रतिस्पध्र्याला कधीही कमी लेखायचे नाही. गाफील राहायचे नाही,’ असा सल्ला देऊन काकांनी प्रतिस्पध्र्याच्या चालींचा अंदाज कसा बांधायचा ते अर्णवला शिकवले.
अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. ‘यशस्वी भव! ताण न घेता, हारजीत याबद्दल विचार न करता उत्तम खेळ कर.’ काकांनी आशीर्वाद दिला.
अर्णव पहिल्याच दिवशी अनेकांना हरवून उपांत्य फेरीत पोहोचला. त्याच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून प्रतिस्पर्धी वरचढ असताना अनपेक्षित चाल करून डाव कसा पलटावा याबद्दल काकांनी मार्गदर्शन केले.
अर्णव उपांत्य फेरीतून अंतिम फेरीत पोहोचला. आता चुरस वाढली. अंतिम फेरीतील स्पर्धक अनुभवी होता. सुरुवातीपासूनच त्याने डावावर पकड घेत अर्णवचे दोन-तीन मोहरे सहज आणि जलद मारले. तो स्पर्धक जिंकणार असे सर्वाना वाटू लागले. त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली. सर्व जण श्वास रोखून डाव पाहू लागले.
डावाच्या अंतिम टप्प्यात अर्णवने घोडय़ाची अनपेक्षित चाल करीत स्पर्धकाच्या वजिरास कैचीत पकडले. आणि हां हां म्हणता प्रतिस्पध्र्यावर आश्चर्यकारकरीत्या मात केली. यशाची माळ अर्थातच अर्णवच्या गळ्यात पडली. प्रतिस्पध्र्यानेही त्याचे मनापासून अभिनंदन केले.
शाळेत तर आनंदाला उधाण आले. सर्वानी जल्लोष केला. ‘आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या यशाने तू आज सर्वाना एक चांगले उदाहरण घालून दिले आहेस,’ शिक्षकांनी अर्णवचे कौतुक केले. त्याच्या वर्गमित्रांनी त्याची माफी मागितली आणि मैत्रीसाठी त्याच्याशी हस्तांदोलन केले.
ट्रॉफी घेऊन अर्णव काकांकडे गेला. ‘केवळ तुमच्यामुळे हे यश मला मिळाले. आता मोहीम जिल्हापातळी स्पर्धेची,’ असे म्हणून त्याने काकांना घट्ट मिठी मारली.