News Flash

फराळाची मज्जा

‘‘आजी, तू नेहमी म्हणतेस, आमच्या लहानपणी फराळाचे जिन्नस करण्याची मज्जा असायची. मग आपण करूया ना सगळे पदार्थ घरी,’’ रती लाडाने गळ्यात पडली.

| October 27, 2013 01:03 am

‘‘आजी, तू नेहमी म्हणतेस, आमच्या लहानपणी फराळाचे जिन्नस करण्याची मज्जा असायची. मग आपण करूया ना सगळे पदार्थ घरी,’’ रती लाडाने गळ्यात पडली.
‘‘होऽऽ पण एका अटीवर. आपण आजोबांबरोबर तुझ्या सगळ्या मामे, आते, चुलत, मावस भावंडांना घेऊन दिवाळीला गावी जाऊ. भरपूर फराळाचे पदार्थ करू. पण सगळं खाल्लं पाहिजे. तिथे पिझ्झा, पावभाजी, बर्गर असं काहीही मिळणार नाही. सगळ्यांचे आई-बाबा दिवाळीच्या दिवशी येतील. चालेल?’’
फोनाफोनी झाली आणि गावाकडचं घर मुला-बाळांनी गजबजून गेलं. रतीची कल्पना म्हणून तिचा पुढाकार. ‘‘आजी, आज काय करायचं?’’ सगळ्यांची भुणभुण चालू झाली.
‘‘आपण आधी चिवडा करू म्हणजे तुमचा तोंडात टाकण्याचा प्रश्न सुटेल. वैभव, ओंकार तुम्ही आजोबांबरोबर जाऊन यादीप्रमाणे वाणसामान घेऊन या. रती, तू प्रीतीला घेऊन मिरच्या आणि झाडाचा कढीलिंब तोडून आण.’’ दोघी खुशीत धावल्या. मग पोहे चाळण्याचा सामुदायिक कार्यक्रम झाला. कधी चाळणाऱ्याची चाळण हलायची, तर कधी नुसतं अंग किंवा डोकं हलायचं. इतरांची हसून हसून मुरकुंडी वळायची. भाजलेले दाणे सोलताना तोंडं फारच हलत राहिली. ‘आजी सालासकट भाजलेले दाणे किती मस्त लागतायत!’ मनापासून दाद मिळाली. आजीनं सूप आणल्यावर सगळ्यांनी त्याला हात लावून पाहिला. ते सगळे आजच सूप बघत होते. सुपाने पाखडून सगळी सालं खाली टाकणारी आजी तर जादुगारच ठरली. मग ‘मीऽऽ मी’ करीत सगळ्यांनी सूप हलवून, पाखडून सांडलवंड केली. सांडलेले दाणे खाताना जणू स्पर्धाच रंगली.
‘‘आता पोहे भाजले की ते कुरकुरीत झाले का ते सांगा हं.’’ सगळे सरसावून बसले. वैभव थोडेथोडे पोहे कढईत घालू लागला. ‘‘आजी, मी भाजते ना, मला येतं,’’ रतीची लुडबुड सुरू झाली. ‘‘हो भाज, पण सावकाश. तुझ्या वेण्या मागे घट्ट बांध. चटका लावून घेऊ नको.’’ ओंकारने डाळ निवडली, पण त्यात एकही खडा नव्हता म्हणून स्वारी हिरमुसली. आरुषने काजूचे तुकडे केले आणि खाल्लेसुद्धा. बेदाण्याची डेख काढण्यात प्रीती रंगून गेली. चिवडा तयार झाला. सर्वानी हातावर नमुना घेतला. पण तेवढय़ावर समाधान झाले नाही. रतीने चिवडा खाण्यासाठी कागदाचे तुकडे करून आणले आणि मस्त पंगत बसली.
आता सर्वाना चकलीचे वेध लागले. सोऱ्यातून पडणारी चकली बघण्यासाठी डोकी जमिनीला टेकली. ‘‘आजी, मोठ्ठी चकली कर ना!’’ प्रीती कुरकुरली. ‘‘तुझ्या लग्नात रुखवतावर ठेवायच्या वेळी करू या हं,’’ असं म्हणत आजोबा स्वयंपाकघरात डोकावू लागले. ‘‘आजी, किती सोप्पं आहे. दे, मीही चकल्या पाडते.’’ रतीने सोऱ्या घेतला, पण चकली काही पडेना. सगळे तुकडे तुकडे झाले. ते तुकडे खाण्यासाठी मग आपापसात लढाई जुंपली. सगळ्यांचा नंबर झाल्यावर सोऱ्या पुन्हा आजीकडे आला. इतका वेळ गप्प असलेला आर्यमान चकल्या तळायला बसला. आजी जातीने लक्ष देत होतीच. चकली कुरकुरीत आहे का ते बघण्याची सर्वाना घाई झाली. ‘‘आजी, चकली अगदी ‘यम्मी’ झालीय,’’ ओंकारने असे म्हणताच सगळ्यांचे डोळे लकाकले, माना हलल्या. ‘‘आजी, पोट भरलं,’’ असं म्हणून आर्यमान उठताक्षणी आजोबांनी त्याची जागा घेतली.
‘‘चला, बघू, खोबरं किसायला.’’ चकल्या डब्यात गेल्यावर आजी करंज्यांकडे वळली. ‘‘आजी, मी किसते,’’ म्हणत रतीने नंबर लावला, पण किसणीवर खोबऱ्याची वाटीच नुसती पुढे-मागे हलायची. खाली कीस पडायचा नाही. तेवढय़ात तिच्या बोटाला किसणी लागली आणि मग ‘ते’ दिवसभर तिला पुरलं. वैभवला थोडं तरी किसता आलं. बाकीच्यांची चांगलीच ‘फ’ झाली. शेवटी ‘तूच कीस’ म्हणत ते काम आजीच्याच गळ्यात पडलं. खोबऱ्याच्या वाटीतली म्हातारी खायला मात्र हात पुढे होते. करंज्यांच्या पुऱ्या लाटायच्या, त्यावर गोड सारण ठेवायचं, कडा दाबून कातरण्याची गाडी चालवायची, यात सगळ्यांना मज्जा वाटली. ‘‘आजी, मी तळतो हं,’’ म्हणत आर्यमान पुढे आला. ‘‘हे बघा करंजी कशी पटकन् कूस बदलतीय. ही करंजी फुटली रे फुटली,’’ आर्यमानची कॉमेंट्री चालू होती. ‘‘करंजी फुटली नाही, ती हसली म्हण,’’ आजीने चुकीची दुरुस्ती केली.
‘‘आता भूमिती आठवायची बरं का मुलांनो,’’ असं आजीने म्हणताच सगळ्यांचे चेहरे प्रश्नांकित झाले. ‘‘आजी, आम्ही पुस्तकं आणलं नाही,’’ ओंकारने घाईघाईने सांगून टाकलं. ‘‘अरे वेडय़ांनो, मी शंकरपाळ्याची पोळी लाटून देईन. तुम्ही पतंगासारखे चौकोन कापा कातरण्याने. एकसारखे. फार बारीक नको. रेघ सरळ येऊ दे.’’ सगळे कातरण्याचं चाक फिरवायला आतुर होते. रतीने नैवेद्याच्या वाटीने एका पोळीचे गोल शंकरपाळे केले. पोळपाटावरची शंकरपाळी उचलून ताटात ठेवायचं काम मात्र सर्वाना जमलं. गोड पिठाची गोळी मध्ये मध्ये गालातही जाऊन बसत होती. लाडवाचे चेंडू हातात घोळवायलाही सगळ्यांना आवडलं. फराळाचे जिन्नस करण्यात मुलांचा वेळ कुठे गेला कळलंच नाही. ‘आपला हात जगन्नाथ’ या न्यायाने त्यावर ताव मारण्याचे कामही चालू होतं. त्याचबरोबर आता मुलांचे आई-बाबांच्या येण्याकडे डोळे लागले होते. कारण ते येताना फटाके आणणार होते!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2013 1:03 am

Web Title: story of diwali faral
Next Stories
1 नभांगणाचे वैभव : उल्कांची आतषबाजी
2 नरक चतुर्दशी
3 दिमाग की बत्ती.. : रंगांचे मिश्रण
Just Now!
X