ए का गावात एक साधूमहाराज राहत होते. त्यांना एकच हात होता. त्या एका हाताने जेवढे काम करता येईल तेवढे काम ते रोज दिवसभर करीत असत. पण त्या कामातून मिळणारा मोबदला त्यांना चरितार्थासाठी जेमतेम पुरेल इतकाच असे. आपल्यापेक्षा दुबळ्या-पीडित लोकांना मदत करावी, असे त्यांना वाटत असे. म्हणून दिवसभर काम करून उरलेल्या वेळेत ते गावातील एकेका भागामध्ये जात आणि आपल्या मधुर आवाजात गोड भजनं म्हणत रस्त्यावरून हळूहळू चालत लोकांना मदत करण्याची विनंती करीत. खांद्यावर झोळी अडकविलेले साधूमहाराज अनेकांना माहीतही झाले होते. त्यामुळे त्यांच्या भजनाचा आवाज ऐकून अनेक गृहिणी धान्य देण्यासाठी रस्त्यावर येऊन उभ्याही राहत असत. परंतु गावाच्या एका गल्लीतून जात असताना एका भव्य कमान असलेल्या घराचा नक्षीदार दरवाजा मात्र कधीच उघडला जात नव्हता की कोणी बाहेर येऊन आपणहून ‘भिक्षा’ देत नव्हते. साधुमहाराजांना याचेच आश्चर्य वाटत होते. म्हणून काही वेळा घराजवळ उभे राहून ते भजन म्हणत थांबतसुद्धा होते. पण कोणी त्यांची दखलही घेत नव्हतं.
एक दिवस कुतूहलाने साधूमहाराजांनी त्या भव्य नक्षीदार दरवाजावर टकटक असा आवाज केला. थोडय़ा वेळाने ‘‘कोण आहे?’’ अशी आतून विचारणा झाली. ‘‘मी भिक्षा मागण्यास आलो आहे,’’ असे साधूमहाराजांनी सांगितले. एका सशक्त पुरुषाने त्रासिक चेहऱ्याने ‘‘काय काम आहे? लवकर बोला,’’ असे म्हटले. साधूमहाराजांनी पुन्हा ‘‘मी भिक्षा मागण्यास आलो आहे,’’ असे म्हटले. ‘‘यथाशक्ती आपण भिक्षा द्यावी. मी यामधले दोन मुठी धान्य फक्त ठेवून बाकीचे सर्व माझ्यापेक्षा दीनदुबळय़ा, अपंग-आजारी लोकांना देत असतो. तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे दोन मुठी धान्य द्यावे,’’ असे म्हणताच घरमालक म्हणाले, ‘‘मला आत्ता वेळ नाही आणि भिक्षा मागायला तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?’’ हे ऐकताच साधूमहाराज त्यांना म्हणाले, ‘‘मला एक हात आहे. एका हाताने जमेल तेवढे काम मी करतोच. पण गरजूंना देण्यासाठी माझ्याजवळ काही शिल्लक रहात नाही. म्हणून मी त्यांच्यासाठी भिक्षा मागतो.’’
‘‘आत्ता मला वेळ नाही. मी तुम्हाला काहीच देऊ शकणार नाही’’ त्या गृहस्थांनी त्रासिक मुद्रनंच सांगितलं.
साधूमहाराज म्हणाले, ‘‘आपण खूप महत्त्वाच्या कामात आहात. आपण मला मदत करणार नाही. तरीपण माझी एक विनंती आहे तेवढी तरी ऐकून घ्यावी.’’
‘‘ठीक आहे. लवकर सांगा.’’ ते गृहस्थ म्हणाले. त्याबरोबर साधूमहाराज म्हणाले, ‘‘महाशय आपल्याला वेळ नाही आणि गरजूंना मदत करण्याची इच्छा नाही. तर माझ्या झोळीत जरा हात घाला.’’
साधूमहाराजांनी आपली झोळी पुढे केली. ते गृहस्थ खूपच रागावले. ‘‘हे काय करताय?’’
साधूमहाराज  म्हणाले, ‘‘रागावू नका. झोळीत हात घाला.’’
गृहस्थानी झोळीत हात घातला. ‘‘सांगा आत्ता काय करू?’’
साधूमहाराज म्हणाले, ‘‘मूठभर धान्य घ्या झोळीतून.’’
‘‘मला काय करायचंय तुमचं धान्य!’’ -इति गृहस्थ.
‘‘अहो, तुम्ही ते नका घेऊ. पण तुम्ही मूठभर धान्य झोळीतून घ्या. आणि पुन्हा ते धान्य माझ्या झोळीतच टाका. म्हणजे तुमच्या हाताला देण्याची सवय लागेल.’’ साधुमहाराज उद्गारले. त्या गृहस्थाने झोळीतले मूठभर घेतलेले धान्य झोळीत टाकले. तो समजायचं ते समजला. त्याची मान खाली गेली. ‘‘साधूमहाराज, थांबा जरा.’’ गृहस्थाने बायकोला हाक मारली आणि तिला म्हणाले, ‘‘अगं जरा सूप भरून तांदूळ घेऊन बाहेर ये.’’ गृहस्थाची बायको आली. तिने आणलेले सूपभर तांदूळ गृहस्थाने साधूमहाराजांच्या झोळीत घातले.
ल्ल   मेधा सोमण