श्रीनिवास बाळकृष्णन

आह ह्युक आहुई हू.. असा विचित्र हसणारा ‘गुफी’ कुत्रा! तसा ‘गुफी’ या शब्दाचा अर्थच मूर्ख. पण गुफी मूर्ख नसून वेंधळा आहे. आपल्या मराठी नाटक-सिनेमात जसे ‘श्री. गलगले’ असतात, तसा हा गुफी.

मागून ढगळ फुल पॅन्ट, बूट, टी-शर्ट, जॅकेट, कधी दागिने आणि सर्वात वैशिष्टय़पूर्ण अशी रॅम्पलड फेडोरा प्रकारची उंच टोपी- जी डोक्यापेक्षा थोडी छोटीच असते. त्याबाहेर त्याचे लांब कान लटकत असतात. त्याला मधे मधे दाढीचे केस येतात. मिकीसारखा पूर्ण गुळगुळीत शेव्ह कधीतरीच करतो.

आळशी माणसाचा उत्तम नमुना!

गुफीने १९३२ ला कामाला सुरुवात केली. तसा तो १९३० पासून छोटय़ा भूमिका करत होता. पण त्याला  ना ओळख होती ना नाव!

मिकी (माउस), डोनाल्ड (डक) आणि गुफी (डॉग) असे वेगवेगळे पुरुषप्राणी असूनही घट्ट मित्र!

गोंधळ घालणाऱ्या जॉर्जने गुफीचा स्वभाव सुधारण्यासाठी त्याचे लग्नही करून पाहिले. घरात १८ वर्षांनंतर गीफ नावाची ‘बायको’ आली. मॅक्स नावाचा खोडकर मुलगा, ग्रँडमा ही गुफीची आजी, गिल्बर्ट ही बहीण, तर अरिझोना नावाचा चुलत भाऊ.. असा हा गूफ परिवार येत गेला.

त्यासंबंधीचे विषय जसे- आहार कसा असावा, धूम्रपान सोडणे, मुलांचे संगोपन करण्यातल्या समस्या, शेजाऱ्यांशी असणारे संबंध, छोटे कुटुंब.. वगैरे चित्रित झाले.

रोजच्या जगण्यातला हा विनोदी गोंधळ पडद्यावर आणला आणि आपल्याला ‘माणूस’ म्हणून जास्त जवळचा वाटला.  (बऱ्याच कार्टूनमध्ये त्याचे स्टेटस सिंगल होते. मधेच तो एकल पालकत्व स्वीकारतो.) त्याचा भोळसट, मंद, वेंधळा स्थायीभाव असतानाही मधेच काही कार्टूनमध्ये तो स्वत:ची हुशारी दाखवून जायचा. हा अगदी आपल्यासारखा वागला, म्हणून ‘कुत्रा’ वाटलाच नाही. ‘अमेरिकन कुटुंबातला माणूस’ म्हणून त्यांना जवळचा भासला.

गुफीची ‘हाऊ टू..’ ही मालिका प्रचंड गाजली. यात बेसबॉल कसा खेळावा, बॉक्सिंग कसे खेळावे, मासे कसे पकडावे, विकेंड सुट्टी कशी घालवावी, असे भन्नाट विषय घेऊन गुफी येत गेला. आजही युटय़ुबवर हे पाहता येईल.

पुढे मिकी-डोनाल्डइतकाच ‘गुफी’ प्रसिद्ध झाला. इतका, की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकन वायू दलाचा एका विभागाचा मॅस्कॉट म्हणून आपल्या गुफीला वापरण्यात आले. १९३९ पासून त्याच्या व्यक्तिगत फिल्म येऊ लागल्या. त्याला दोनदा ऑस्कर नामांकन मिळालं. त्याने डोनाल्ड डकसोबतही एक मोठी मालिका केली. २०१६ पर्यंत तो विविध मालिकांतून आपल्याला भेटत राहिला. म्हणजे ८७ वर्ष तो काम करत होता. डिस्ने स्टुडिओच्या फ्रँक वेब यांच्या संकल्पनेला आर्ट बॅबीट यांनी आणखी सुधारित रूप देऊन ‘गुफी’ची निर्मिती केली. त्याचं वेगळ्या प्रकारचं हसणं पिंटो कोल्विगने दिलं होतं.

काळ बदलला तसा गुफी अधिकाधिक माणसासारखा दिसू-वागू लागला. डोळे छोटे झाले. आधुनिक कपडे आले. लांब असणारे कान टोपीत जाऊ लागले. दोन दात अधिक स्पष्ट झाले. त्याच्या मॅक्स नावाच्या मुलामध्ये तर ते लांब कान गायबच होते.

८७ वर्षांत गुफीत खूप बदल होत गेले. पुढेही बदल होत जातील. त्यासाठी तो लवचीक आहे. आपलं मनोरंजन करण्यासाठी काळाप्रमाणे स्वत:मध्ये झालेले बदल स्वीकारणारा तो अभिनेता आहे. तरी त्याला कसलाही मोठेपणा करायला आवडत नाही.

तो पक्का अमेरिकन आहे, म्हणूनच तो व्यवसायाशी, कामाशी प्रामाणिक आहे. तो साधा आहे, थोडा वेंधळा आहे म्हणून तो आपल्यातलाच वाटतो. आजही आजूबाजूला कोणात तरी गुफी असल्याचा भास होतो. मिकीसारखा स्टार हिरो नसला तरी आपल्याला सर्वात जवळचा गुफीच आहे!

chitrapatang@gmail.com