06 July 2020

News Flash

नरक चतुर्दशी

दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात जेथे जेथे भारतीय माणूस आहे, तेथे तेथे दिवाळीचा सण साजरा होत असतो. दीपावली या

| October 27, 2013 01:00 am

दीपावली म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा सण. सबंध भारत देशातच नव्हे तर जगात जेथे जेथे भारतीय माणूस आहे, तेथे तेथे दिवाळीचा सण साजरा होत असतो. दीपावली या नावावरूनच हा दिव्यांचा उत्सव आहे हे कळून येतं. दिवाळी म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे, दु:खाकडून आनंदाकडे जाण्याचा सण.
दिवाळी शरद ॠतूमध्ये येते. आपल्या पूर्वज्यांनी ॠतू आणि सण यांची अगदी योग्य सांगड घातली आहे. शरद ॠतू म्हणजे साधारण आक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे दिवस असतात. धान्य तयार होऊन घरे नव्या धान्याने संपन्न बनलेली असतात. त्यामुळे सर्वाच्याच आनंदाला अगदी उधाण आलेलं असतं.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीपासून नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि यमद्वितिया म्हणजे भाऊबीज अशी पाच दिवस आपण दिवाळी साजरी करतो. या प्रत्येक दिवसाच्या संबंधी कथा वेगवेगळय़ा आहेत.
आज आपण चंद्रोदय व्यापिनी आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक  चतुर्दशी का साजरी करतो, त्या दिवशी दीपोत्सवही का साजरा करतो ते पाहू.
नरक चतुर्दशीसंबंधी एक कथा भागवत पुराणात सांगितलेली आहे. नरकासुराची माता भूदेवी. या भूमीदेवीचा मुलगा म्हणून याला भौमासुर असेही म्हणतात. या भौमासुराला आईकडून वैष्णवास्त मिळाले होते. म्हणून हा खूप बलाढय़ झाला होता, गर्वाने त्याने प्रजाजनांनाच नव्हे, तर देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. या उन्मत्त भौमासुराने वरुणाचे छत्र, इंद्राचे अमर पर्वतावरील मणिसंज्ञक स्थान आणि इंद्रमाता अदिती हिची कुंडले पळविली होती. याचबरोबर या नरकासुराने वेगवेगळय़ा राजांच्या सोळा हजार तरुण कन्या पळवून नेऊन आपल्या बंदिवासात ठेवल्या. नरकासुराच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. त्यामुळे इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि नरकासुराकडून या सर्वाची मुक्तता करण्याविषयी श्रीकृष्णाला सांगितले.
श्रीकृष्णाला हे कळताच श्रीकृष्ण गरुडावर बसून सत्यभामे बरोबर नरकासुराच्या प्राग्ज्योतिष नगरात गेला. प्राग्ज्योतिष नगरीत बळकट किल्ले, शस्त्रास्त्रांचे कोट पाण्याने, अग्नीने आणि वायूने भरलेले खंदक असा कडेकोट बंदोबस्त होता, या शिवाय अगोदर मूर राक्षसाच्या भयंकर बळकट बंदोबस्ताचा पाश सभोवार होता.
श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या साहाय्याने पर्वताचे पीठ केले. बाणांच्या साहाय्याने शस्त्रास्त्रांचे कोट मोडून टाकले. सुदर्शन चक्राच्या सहाय्याने अग्नी, पाणी, विषारी वायू यांचे खंदक भेदून टाकले. आणि प्रथम तलवारीने मूर राक्षसाला ठार मारले. त्याचा पांचजन्य शंख वाजविला. त्यानंतर त्याने नरकासुराच्या नगरीत प्रवेश केला. प्रथम श्रीकृष्णाने नरकासुराच्या सैनिकांना छिन्नविच्छिन्न केले. गरुडानेसुद्धा आपल्या पंखाने, चोचीने सैनिकांना व्याकूळ करून त्यांना जखमी केले. नरकासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला आणि त्याचे मस्तक उडविले. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला. आणि रत्नांनी चमकणारी दोन कुंडले, वैजयन्तीमाला वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याच वेळी भूमीमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली, की नरकासुराचा ‘भगदत्त’ नावाचा मुलगा आहे. त्याला तू संभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. त्यानंतर नरकासुराच्या वाडय़ात शिरून सोळा हजार राजकन्यांना बंदिवासातून सोडवून द्वारकेला पाठविले. त्याचबरोबर नरकासुराची विपुल संपत्ती, रथ-घोडे, सैन्य, धनधान्य, सोनेनाणी सर्व काही द्वारकेला पाठविले. आणि सत्यभामेसह इंद्राच्या मंदिरामध्ये जाऊन त्याने इंद्राच्या आईची कुंडले परत दिली. युद्ध जिंकल्याबद्दल इंद्राने श्रीकृष्णाचा आणि सत्यभामेचा सत्कारही केला.
श्रीकृष्णाने नरकासुराला ज्या दिवशी मारले तो दिवस आश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता. नरकासुराने आपली शेवटची इच्छा श्रीकृष्णाजवळ सांगितली आणि प्रार्थना केली. या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होणार नाही. आणि या दिवशी लोकांना दिवे लावून विजयोत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याच्या दोनही मागण्या मान्य केल्या.
नरकसुराच्या छळापासून लोक मुक्त झाले. म्हणून आनंदोत्सवानिमित्त या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्णाने नरकासुराच्या वाडय़ातील सर्व संपत्ती द्वारकेला नेलीच, शिवाय सर्व अन्यायग्रस्त स्त्रियांना द्वारकेला आणले. त्यांच्या त्यांच्या घरी मुलींना परत नेण्याविषयी आईवडिलांना विनंती केली. पण कोणीही (पीडित मुलींच्या आईवडिलांनी) मुलींना घरी नेले नाही. श्रीकृष्णाचा मोठेपणा हा की त्याने सर्व अन्यायग्रस्त स्त्रियांना आधार दिला. धन्य त्या श्रीकृष्णाची अन्याय, अत्याचार, दु:ख, वेदनांनी पीडित अशा सोळा हजार स्त्रियांचा तो रक्षणकर्ता बनला. त्याची आठवण म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात.
लोकांनी दु:ख, अन्याय, वेदना, अज्ञान, अंधार यांच्यापासून मुक्तता मिळविली म्हणून हा दिवस दिवे लावून आनंदोत्सव म्हणून साजरा केला जातो.
आत्ताच्या काळातही अज्ञान, रोग, दारिद्रय़, भ्रष्टाचार यांच्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्वानीच भगवान श्रीकृष्णासारखा दुष्टप्रवृत्तीचा नाश करायला हवा. तरच खऱ्या अर्थाने दीपोत्सव साजरा केल्याचा आनंद मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2013 1:00 am

Web Title: story of naraka chaturdashi
Next Stories
1 दिमाग की बत्ती.. : रंगांचे मिश्रण
2 आर्ट कॉर्नर : चमचमता मोर
3 वचनपूर्ती
Just Now!
X