08 March 2021

News Flash

मिले सूर मेरा तुम्हारा…

लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू घडवण्यात विष्णू मोठा वाकबगार होता. आपल्या गावातल्या लोकांना मागणीप्रमाणे मनपसंत वस्तू बनवून देण्यात त्याला नेहमीच आनंद वाटायचा.

| September 22, 2013 01:04 am


लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू घडवण्यात विष्णू मोठा वाकबगार होता. आपल्या गावातल्या लोकांना मागणीप्रमाणे मनपसंत वस्तू बनवून देण्यात त्याला नेहमीच आनंद वाटायचा. आजही दिवसभर काम करून तो अगदी थकून गेला होता. संध्याकाळ झाल्यावर दिवसभराच्या कामातून उरलेले वेगवेगळ्या आकाराचे लाकडाचे छोटे-छोटे तुकडे, ठोकळे, ढलप्या आणि पट्टय़ा त्याने एका कोपऱ्यात सारल्या. मग आपले ‘विष्णू आर्टस्’ हे दुकान बंद करून तो घरी गेला.
विष्णूने कोपऱ्यात सारलेल्या त्या वेगवेगळ्या तुकडय़ांचा एक छोटासा ढीगच झाला होता. रात्रीचा बराचसा वेळ शांततेत गेला. पहाटे एका गोल ठोकळ्याच्या पाठीत काहीतरी रुतू लागल्यामुळे त्याला जाग आली. त्याने वळून पाहिले तर काय? एक त्रिकोणी तुकडा त्याला खेटून झोपलेला!
‘‘ए, जरा सरक तिकडे! तुझं टोक रुततंय माझ्या पाठीत.’’ गोल ठोकळा त्रिकोणी तुकडय़ावर खेकसला.
झोपेतून अर्धवट जागे झालेल्या त्रिकोणी तुकडय़ाने थोडे बाजूला सरकायचा प्रयत्न केला. त्यासरशी गोल ठोकळा गडगडू लागला आणि धाडकन् खालच्या छोटय़ा पट्टीवर आदळला. त्या आवाजाने सगळ्या दुकानालाच जाग आली.
 ‘‘अगं, आई गं..’’ पट्टी किंचाळत उठली, ‘‘ए, जरा बघून चाल ना. का तुझ्या त्या गोल गरगरीत पोटामुळे तुला साधा पायाखालचा रस्ताही दिसत नाही?’’
‘‘अगं, तसं नाही गं,’’ गोल ठोकळा पुटपुटला, ‘‘त्या त्रिकोणी तुकडय़ाला जरा बाजूला सरक म्हटलं तर..’’
‘‘वा रे वा! म्हणजे ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझंच खरं..’’ त्रिकोणी तुकडय़ाने निषेध नोंदवला.
‘‘तसं नाही, पण तुला जरा पाय पसरून बसायची सवयच आहे.’’ घनाकार ठोकळा उपदेश करीत म्हणाला, ‘‘जरा माझ्यासारखं आटोपशीर बसायची सवय लावून घे.’’
घनाकार ठोकळ्याचे बोलणे मनावर घेऊन त्रिकोणाने कूस बदलण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ..! त्याचे पाय पसरलेलेच राहिले. त्यातच बाजूला असलेले लाकडाच्या ढलप्यांचे एक भेंडोळे त्याच्या डोक्यावर पडले. शिवाय या सगळ्या धडपडीत त्याला टेकून उभ्या असलेल्या एका चौरस तुकडय़ाने त्याच्या टपलीत मारली, ती वेगळीच.
त्रिकोणी तुकडय़ाचे निष्फळ प्रयत्न आणि घनाकार ठोकळ्याचे बोलणे ऐकून चौरस तुकडय़ालाही चेव चढला. तो म्हणाला, ‘‘आजकाल आटोपशीरपणाचं महत्त्वच कोणाला वाटत नाही. हा पाहा आयतोबा कसा पसरून झोपलाय..’’
‘‘अरे, रात्री जरा आडवा झालो तर लगेच आयतोबा काय म्हणताय?’’ टुणकन उडी मारून दोन पायावर उभा राहत आयत म्हणाला, ‘‘खरं तर तुम्हा सगळ्यांपेक्षा मी उंच आहे. त्यामुळे मला जास्त लांबचं दिसतं. आता खिडकीतून बाहेर बघितल्यावर दिवस उजाडलेला मला स्पष्ट दिसतोय. तुमच्या या भांडणात रात्र संपल्याचंही तुम्हाला कळलं नाही. आता थोडय़ाच वेळात विष्णू येईल आणि मग सगळ्यांची रवानगी होईल ती थेट कचऱ्यात.’’ त्याक्षणी आपण निरुपयोगी ठरून फेकले जाणार याचे सगळ्यांनाच वाईट वाटले. काहीसे हिरमुसून ते गप्प बसून राहिले.
थोडय़ाच वेळात दाराबाहेर पावले वाजली. दरवाजा उघडून विष्णू आत आला. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा नीलेशही होता. शाळेला सुट्टी असली की तो विष्णूबरोबर दुकानात येऊन बसायचा. विष्णूने कौतुकाने त्याला लाकडाच्या वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांची छोटीशी पेटीही घेऊन दिली होती. वडिलांना मदत करताकरता नीलेश छोटी-छोटी कौशल्ये आत्मसात करायचा. इकडे-तिकडे बघता बघता नीलेशचे लक्ष कोपऱ्यातल्या ढिगाकडे गेले. त्यातल्या तुकडय़ांचे वेगवेगळे आकार पाहून त्याचे डोळे लकाकले.
आपली हत्यारांची पेटी जवळ ओढून नीलेश कामाला लागला. त्याने एका आयताकृती ठोकळ्याला तासून थोडासा आकार देऊन खालच्या बाजूला छोटय़ा गोलांची चार चाके लावली आणि एका टोकाहून दुसऱ्या टोकाला सुळकन जाणारी गाडी तयार झाली. मग नीलेशने एक घनाकार ठोकळा घेतला. त्याच्या डोक्यावर त्याने दोन त्रिकोणी तुकडे घट्ट बसवले. त्या त्रिकोणी तुकडय़ांवर पातळ चौकोनी तुकडे बसवताच एक ऐटबाज घर आकाराला आले. लाकडाच्या पातळ ढलप्यांचे छोटे-छोटे तुकडे कापून नीलेशने त्या उतरत्या छपरावर कौलेही बसवून टाकली.
त्या वेगवेगळ्या आकारांच्या तुकडय़ांना नवीन रूप देण्याच्या खेळात नीलेश मनापासून रमला होता. वेगवेगळे आकार एकत्र येत होते. कधी त्रिकोण, चौकोन आणि गोल एकत्र येऊन बलगाडी बनत होती, तर कधी गोलाच्या डोक्यावर त्रिकोणाला बसवून त्यातून विदूषकाचा चेहरा आकार घेत होता. लाकडाच्या छोटय़ा-छोटय़ा पट्टय़ा कधी वाकून-वळवून एकमेकींशी जमवून घेत होडी तयार करण्यात सहभागी होत होत्या, तर कधी त्याच पट्टय़ांपासून लाकडाची पवनचक्की आकाराला येत होती.
नीलेशने बनवलेली वेगवेगळी खेळणी बघून विष्णूही खूश झाला. नीलेशला शाबासकी देऊन
त्याच्या हातात रंगांच्या बाटल्या देत विष्णू म्हणाला, ‘‘एरवी हे सगळे तुकडे मी कचरा म्हणून फेकून दिले असते. तू त्या तुकडय़ांची कल्पकतेने जोडणी करून त्यातून मस्त खेळणी बनवली आहेस. आता त्यांना छान रंग देऊन त्यांच्यावर अखेरचा हात फिरव. ती खेळणी लहान मुलांना खूपच आवडतील, हे नक्की.’’ वडिलांनी शाबासकी दिल्यामुळे नीलेशला खूप आनंद झाला. चेहऱ्यावर आनंदाचे स्मितहास्य झळकत असतानाच तो ती खेळणी रंगवण्यात गर्क झाला. खेळण्यांवर जसजसे रंगांचे थर चढायला लागले, तसतशा प्रत्येक खेळण्याला आनंदाच्या उकळ्या
फुटू लागल्या. आपल्याच आकाराला विशेष समजणाऱ्या सगळ्या तुकडय़ांना आता एकीचे महात्म्य कळले होते.
आनंदाने गिरक्या घेत गाडीची गोल चाके विदूषकाच्या त्रिकोणी टोपीला म्हणाली, ‘‘एकमेकांशी भांडण्याऐवजी आपापलं वैशिष्टय़ जपून या नीलेशमुळे आपण एकत्र आलो. एकमेकांच्या सहकार्याने नवनवीन आकार मिळाले. त्यामुळे नकोसा कचरा ठरण्याऐवजी आपण हवीहवीशी वाटणारी खेळणी बनलो. आता लहान-लहान मुलं आपल्याशी मजेत खेळतील. काही झालं तरी एकमेकांशी जुळवून घेणं आणि कल्पकता यांना पर्याय नाही, हेच खरं!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 1:04 am

Web Title: story of vishnu
टॅग : Kids Story,Story
Next Stories
1 नभांगणाचे वैभव : खग्रास सूर्यग्रहण
2 आर्ट कॉर्नर : रिसायकल वॉलसर्कल
3 आर्ट गॅलरी
Just Now!
X