माझ्या बालदोस्तांनो, तुम्हाला वर्षभर चाललेली ही जलपरीच्या राज्याची सफर कशी वाटली? तुमच्या प्रतिसादावरून आणि पत्रांवरून तरी ही सफर तुम्हाला आवडली असं वाटतंय. पण या शेवटच्या लेखामध्ये मी तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहे- ज्यामुळे माझी या जलपरीच्या राज्याशी मैत्री झाली. आता गोष्टी कितीही छान असल्या तरी वाचलेल्या गोष्टींना खऱ्याखुऱ्या अनुभवाची लज्जत आणि मजा कशी बरं येणार? खरं की नाही?

पहिला मंत्र म्हणजे तुम्ही जे कराल ते मनापासून आनंद घेत करा. समुद्रीजीवनाबद्दल काही शिकायचं असेल तर समुद्राशी मैत्री करणं आलंच. मात्र ती मनापासून आणि आनंदाने करा. समुद्रसफरींवर जा. समुद्रकिनारी वाळूमध्ये जा. खारफुटींना भेट द्या. पुळणी, खाजणं, खाडय़ा असं सारं पाहा. या सगळ्यामधलं प्राणी आणि वनस्पतीजीवन पाहा. त्याचा अनुभव घ्या. निरीक्षण करा. याविषयी अधिक माहिती घेण्याकरता काय करायचं ते तर तुम्हाला ठाऊकच आहे. याविषयी अधिकाधिक वाचा आणि स्वत:च्या ज्ञानामध्ये भर घाला. जसजसं तुम्हाला अधिक माहिती होईल, तसतशी तुम्हाला अधिकाधिक गंमत येईल.. जास्तीत जास्त आनंद मिळेल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही या गोष्टी पाहण्या-अनुभवण्याकरता जाल तेव्हा तिथे कचरा करू नका. प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळा. आपण वापरलेल्या आणि इतस्तत: टाकलेल्या प्लॅस्टिकमुळे साक्षात महासागरालाही हा कचरा व्यापून टाकतो आहे. तब्बल १९ दशकोटी पाऊंड्स एवढा अवाढव्य प्रमाणात प्लॅस्टिक कचरा समुद्रामध्ये आहे. आणि त्यात दरवर्षी काही दशलक्ष टनांची भर अव्याहत पडते आहे. या जलपरीच्या राज्याकरता आणखी एक गोष्ट तुम्ही करायला हवी. सागरी जीवांच्या वापरापासून बनलेल्या वस्तू तुम्ही विकत घ्यायला नकार द्या. उदाहरणार्थ शंख-शिंपले. याच निग्रहाची पुढची पायरी म्हणजे समुद्री माशांच्या विणीच्या काळामध्ये मासे खाणं कटाक्षाने टाळा. आपल्याकडे आपण श्रावण पाळतोच की. त्या प्रथेमागे हेच कारण आहे. आपल्याला अन्न म्हणून माशांचा पुरवठा महत्त्वाचा आहेच; मात्र आपल्या भरमसाठ मासेमारीमुळे जगभरातल्या ८० टक्के माशांच्या प्रजाती त्यांच्या प्रजननक्षमतेपेक्षा अधिक वेगाने मारल्या जात आहेत. जगभरातल्या मोठय़ा शिकारी माशाच्या लोकसंख्येमध्ये तब्बल ९० टक्के घट गेल्या काही मोजक्या वर्षांमध्ये झाली आहे. या विनाशाचं भान आपण बाळगायला हवं.

माझ्या दोस्तांनो, हे ध्यानात असू द्या की, जलपरीचं हे राज्य.. जगभरातले समुद्र, महासागर हे आपल्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचं सुदृढ अस्तित्व आपल्या अस्तित्वाकरता अत्यावश्यक आहे.

rushikesh@wctindia.org

शब्दांकन : श्रीपाद

(समाप्त)