पायाच्या तळव्याला गुदगुल्या झाल्या नि चिनू वैतागलीच. ‘‘दादा, चूप रे, उठणारेय मी,’’ म्हणत तिने पांघरूण पार डोक्यावर ओढलं. तर परत पायाशी काही हुळहुळलं. दादाला पकडायचं म्हणून झोपेचं सोंग घेत पांघरुणातून ती हळूच डोकावली आणि गुदगुल्यांसाठी कारणीभूत असणारी गोष्ट पाहून तिने तोंडात बोटंच घातली. चक्क तिचं दप्तर तिच्या तळपायाला गुदगुल्या करून तिला उठवत होतं. चिनूची पार त्रेधा उडाली. ‘‘आं..’’ असा वेडावाकडा उद्गार काढत चिनू ताडकन् उठून बसली. ‘‘बरं झालं बाई चिनू तू उठलीस. लक्षात आहे ना आता शाळा सुरू होणारेय. मला फार कंटाळा आलाय. लवकर उठ बरं मला तयार कर.’’ बोलणारं दप्तर पाहून चिनू मूच्र्छित पडायचीच बाकी राहिली. ‘‘ए, ए, मीच आहे. घाबरू नको. माझ्याकडे बघ तर खरं.’’  चिनूचं धाबं दणाणलेलं पाहून तिला धीर देण्यासाठी जागच्या जागी हावभाव करत तिचं दप्तर तिचं लक्ष स्वत:कडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत होतं. ‘‘जाम कंटाळा आलाय बघ. गेला महिना-दीड महिना तू माझ्याकडे चक्क कानाडोळा केलायस. ढुंकूनही पाहिलं नाहीस साधं,’’ म्हणत दप्तराने गाल फुगवले. ‘‘हो, हो, पण तुझा कंठ एवढा दाटून का बरं आलाय?’’ चिनूने असं विचारताच दप्तर आपलं मन मोकळं करू लागलं. मधे मधे उसासे टाकत, पाण्याने भरून येणारे डोळे टिपत, मधेच गालातल्या गालात, तर कधी गडगडाटी हसत ते आपलं बोलतच सुटलं. आपला जिवश्च-कंठश्च मित्र अनेक वर्षांनी भेटावा आणि आठवणींचा बांध फुटावा तसं झालं होतं त्याचं. आपल्या अंतरीच्या खुणा अगदी मोकळ्या मनाने उघड करणं चालू केलं त्यांनं. ‘‘काय सांगू चिनू तुला, तुमचं ते रोज रिक्षातलं मजा करणं, रिक्षाकाकांशी आपुलकीने वागणं, लुटुपुटूचं भांडण, विनोद सांगून खुदुखुदू हसणं या सगळ्याची कित्ती कित्ती आठवण येतेय मला. आमचे बेल्ट वापरून लुटुपुटुची मारामारी करता ना तेव्हा आम्हालाही खूप मजा वाटते बरं का. तू किंवा तुझ्या बेंचवर बसणारी श्रिया एकमेकींच्या वस्तू चुकून आमच्यामध्ये ठेवता आणि काही वेळा त्या तशाच घरीपण घेऊन येता आणि दुसऱ्या दिवशी त्यावरून वाद घालता तेव्हा मला हसू अगदी आवरत नाही. चिनू, गेल्या वर्षी श्रियाच्या दप्तराशी माझी मैत्री झाली होती, यावर्षी बाईंनी बेंच बदलले तर मला नवा मित्र मिळेल ना!’’ या विचारानेच दप्तराच्या स्वरात भावविवशता आली. पण लगेचच सावरून ते म्हणालं, ‘‘तो नचि खेळाच्या तासाला तुझ्या डब्यातला खाऊ तुला न सांगता खात तुझी खोडी काढतो ना, तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. चिनू, एकदा तू अनूचा सुगंधित खोडरबर तुला आवडला म्हणून माझ्यात दडवून ठेवला होतास ना, तेव्हा शरमेनं माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं होतं.’’

‘‘काय तुला तेपण माहीत आहे?’’ आपलं भांडं फुटल्याचं समजल्यावर चिनूला तोंडघशी पडल्यासारखं वाटलं. तिचा चेहरा पडलाच. ‘‘पण तू तो लगेचच परत देत तिला सॉरी म्हणालीस ना, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला. मी मनातल्या मनात तुला शाबासकीची थापही दिली.’’ दप्तराने जोडलेली पुष्टी ऐकताच चिनूची कळी खुलली. ती काहीतरी बोलणार होती, पण तिला संधी न देताच दप्तराने आपले घोडे पुढे दामटायला सुरुवात केली. पण गंमत म्हणजे चिनूला ते ऐकायला मजा येत होती. त्यात रस वाटत होता. त्यामुळे कान-डोळे एकवटून तिने ते ऐकणं चालूच ठेवले. ‘‘चिनू, तुझी मराठी आणि इंग्रजीची पुस्तकं किती मस्त गप्पा मारतात माहितीए. वेळ कसा चुटकीसरशी निघून जातो त्यांच्या गप्पा ऐकण्यात. बाईंनी सांगितलेलं काहीबाही तू पेन्सिलने लिहून घेत असतेस ना, ते ते दोघं एकमेकांना सांगून आमची सगळ्यांचीच खूप करमणूक करत असतात.  जेव्हा मराठीच्या पुस्तकाने ‘अकरावा बृहस्पती’ याचा अर्थ मित्रत्व असा सांगितला होता तेव्हा हसता हसता पुरेवाट झाली होती सगळ्यांचीच. गणित आणि विज्ञानाच्या पुस्तकांच्या वाटेला आमच्यापैकी कुणीच फारसं जात नाही, ती एक कंपासबॉक्स वगळता. का म्हणून कुणी स्वत:च्या पायावर दगड मारून घेईल म्हणा! अशी एक-एक कोडी घालतात ना ते की बस्स. सगळ्यांची अगदी बोलती बंदच होते. तुझं इतिहास नि भूगोलाचं पुस्तक मात्र कानकोंडं होतं बिच्चारं. तू त्यांना वापरतच नाहीस ना, त्यामुळे त्याना गप्पांमध्ये भागच घेता येत नाही बाई. काही वेळा इतर सारे खोदून खोदून काही प्रश्न विचारतात तेव्हा थातूरमातूर उत्तर देत कसंबसं अब्रू वाचवतात ते, माहितीय का तुला. चिनू, ते विषयही महत्त्वाचे आहेत बरं का. खूप काही सांगण्यासारखं आहे त्या दोघांपाशी. पण तू त्यांना क्षुल्लक लेखतेस. तुला एक सांगू का, इतिहास डोळसपणे वाचलास तर आयुष्याचं भलंच होईल तुझ्या. आणि भूगोल डोळे उघडून पाहिलास तर सारं जग खुलं होईल तुझ्यासमोर.’’ बोलता बोलता चिनूला कानपिचकीही मिळाली.

‘‘आणि अजून एक लाख रुपयाची गोष्ट- म्हणजे महत्त्वाची गोष्ट सांगू का तुला? मी म्हणजे तुझं दप्तर ही फक्त तुझी संपत्ती आहे. मी तुझा शब्द झेलणे, तुझी पाठराखण करणे, ही माझी कामं तत्परतेने आणि जबाबदारीने पार पाडते म्हणूनच आपलं सूत जुळलेलं आहे. तुझं कोणतंही गुपित तू माझ्यातच ठेवतेस की. पण कधी कधी त्याचा अतिरेक होतो आणि माझं अठरा धान्यांचं कडबोळं होतं अगदी. उगाच काहीबाही भरणा करतेस आणि माझं ओझं होतं म्हणून ठणाणा करतेस. चिनू आपली फार चांगली मैत्री आहे; जशी तुझी आणि सायलीची आहे तशी, मग मला ओझं का म्हणतेस ग? तू माझी जबाबदारी आहेस हे उमजून तुझ्या सगळ्या महत्त्वाच्या वस्तूंची मी जिवापाड काळजी घेत असतानाच मीही तुझी जबाबदारी आहे हे समजून तूही माझी काळजी घेतली पाहिजेस. माझ्यात अनावश्यक गोष्टींचा भरणा करणं टाळलं पाहिजे. मला सुयोग्य रीतीने हाताळलं पाहिजेस. मला कुठेतरी कसंतरी फेकता नये. तुला माहीत आहे का, तुझ्या पाठीवर मी जर सुंदरपणे उठून दिसत असेन तर विद्यार्थी म्हणून तुझी शानही वाढत असते.’’

चिनूचे डोळे चांगलेच उघडले होते. पण आता हे कोण हाका मारतंय बरं? बाबा हाका मारत हलवत होते चिनूला. नवीन दप्तर आणायसाठी बाजारात जायची आठवण करून देत होते. ते ऐकताच चिनू अंथरुणात बसत म्हणाली, ‘‘बाबा, माझा विचार आता पुरता बदललाय. मी माझी जबाबदारी पेलायला आता सज्ज झालेय बरं का.’’ यावर बुचकळ्यात पडून बाबा चिनूकडे आ वासून पाहतच राहिले.

मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com