सोन्या भारद्वाज, निळ्या पंखांचा खंडय़ा आणि मिठू पोपट बसले होते झाडावर गप्पा मारत सकाळी सकाळी.
‘‘सोन्या, तू दिसलास की ही माणसं जागच्या जागी थबकून बघत का रे बसतात?’’ खंडय़ानं भारद्वाजाला विचारलं.
‘‘अरे, माझा सोन्याचा रंग. या सोन्याच्या लोभी माणसांना वाटतं, मी दिसलो की यांचा दिवस सोन्यासारखा जाणार.’’ या बोलण्यावर त्याच्या पंखावर पंख आपटून खंडय़ानं टाळी दिली.
‘‘तूही छान दिसतोस रे इकडून तिकडे उडून बागडताना.. तुझ्या निळ्या पंखांमुळे.’’ ही पोपटपंची ऐकून खंडय़ाही हरखून गेला. तो पोपटाला म्हणाला, ‘‘तू तर या माणसांच्या गळ्यातला ताईत आहेस अगदी.’’
‘‘छे रे! पिंजऱ्यातला पाईक म्हण हवं तर. त्यांच्यासारखं बोलायला पढवतात आणि तेच तेच घोकायला लावतात सारखं. त्यांच्या हाती सापडू नये म्हणून मी तर बाबा त्या घरांच्या छपरावरही जात नाही कधी.’’ पोपट म्हणाला.
तेवढय़ात त्यांना साळुंक्यांचा किरकिराट ऐकू येऊ  लागला.
‘‘छे! काय वैताग आहे या साळुंक्यांचा. यांच्या या आवाजात आपल्याला एकमेकांचं बोलणंही ऐकू येत नाहीये.’’ भारद्वाजने आपली चीड व्यक्त केली.
‘‘हो ना! रंगांचं तर काय मॅचिंग आहे यांच्या! राखाडी पंख अन् पिवळी चोच आणि सारखं किर्रकिर्र.. ए गप बसा! काय गोंधळ चाललाय?’’ मिठूनं आपल्या रागाला वाट करून दिली.
तेवढय़ात घिरटय़ा घालणारा एक कावळा जोरात ‘काव काव’ करीत त्यांच्या अगदी जवळून गेला. खंडय़ा तर जरा हेलपाटलाच.
‘‘..आणि हा कावळा आणि त्याचे जातभाई.. काळा कुळकुळीत रंग, घाणीवर ताव मारणारा, येता-जाता कुणाच्याही गप्पांत मान वाकडी करीत चोच खुपसणारा. कशाला या पक्ष्यांना जन्माला घातलंय देवानं कुणास ठाऊक?’’ तिघांचाही राग होता कावळ्यावर.
‘‘अरे, अरे, खालच्या फांदीवर बघा जरा. तो बंटी बोका चढून आलाय झाडावर तुमच्या. पोपटावर डोळा आहे त्याचा.’’  किरकिराट करणाऱ्या साळुंकींच्या थव्यातली एक त्या तिघांना सावध करून गेली.
‘‘अरे बापरे.. खरंच की! आता मात्र तिघांची गाळण उडाली. भारद्वाजाची बायको त्याच झाडाच्या एका खालच्या फांदीवर पानांच्या आडोशाला असलेल्या घरटय़ात पिलाला घेऊन झोपली होती. बोक्याला आपलं धूड सांभाळत सांभाळत यांच्यापैकी एकाची तरी शिकार करायचीच होती. साळुंकीनं सावध केलं म्हणून बरं. खंडय़ा लगेच गेला उडून. पोपटही उडून गेला. सोन्याला मात्र झाड सोडणं शक्य नव्हतं. त्याचं कुटुंबच होतं ना तिथे! नशीब.. बोक्याला पटकन वर चढता येत नव्हतं. तेवढय़ात ‘काव काव’ असं नेहमीपेक्षा कर्कश्य आवाजात ओरडत कावळा बोक्याच्या डोक्याजवळून गेला. पुन्हा एकदा तसंच. पुन: पुन्हा.. बोक्याला त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्या हल्ल्याला चुकवत, स्वत:ला सांभाळत झाडावर चढायची कसरत करावी लागत होती. कावळ्याचा तो प्रकार चालूच होता. भारद्वाज आपल्या पिल्लांना घेऊन बसला आडोशाला. बोका कंटाळला आणि उतरला खाली झाडावरून. तसे भारद्वाज, खंडय़ा, पोपट पुन्हा थोडय़ा वेळानं अंदाज घेत एकत्र आले आणि त्यांनी बोलून दाखवलं, ‘‘आपण उगाचच नावं ठेवली साळुंकीला आणि कावळेदादाला.’’ साळुंकीला आणि कावळेदादाला बोलावून तिघांनी त्यांचे आभार मानले.
‘‘अरे, मी फक्त तुम्हाला सावध केलं. त्यात काय मोठंसं? पण कावळेदादानं तुम्हाला बोक्यापासून वाचवलं. तो असाच सर्वाच्या मदतीला धावतो. रस्त्यावरची घाण खाऊन स्वच्छता ठेवायला मदत करतो. लहान मुलांना घास भरवताना गोष्टीत चिऊबरोबर काऊही लागतो बरं का! पण अगदी स्वच्छंदी.. कुणाच्या अध्यात ना मध्यात असा आहे कावळा.’
तेव्हापासून तिघांनीही ठरवलं, की पुन्हा कुठल्याही दुसऱ्या पक्ष्याला नावं ठेवायची नाहीत. जगात प्रत्येकजण महत्त्वाचा असतो. कोण केव्हा आपल्या उपयोगी पडतं सांगता येत नाही, हेच खरं.
श्रीपाद पु. कुलकर्णी, shripadkster@gmail.com