12 December 2018

News Flash

हसत, खेळत, नकळत ‘अभ्यास’

आज एकदम शाळा शाळा खेळायची आठवण कशी काय झाली?

‘‘अगं मुक्ता, तू आणि विराज पट्टय़ा काय आपटताय जमिनीवर? मोडून जातील ना त्या.’’ आजीला त्यांच्या खेळाचा अंदाज येईना.

‘‘आम्ही वर्गातल्या खोटय़ा मुलांना मारतोय. अभ्यास न करता सारखी आपापसात बोलत बसतात ना म्हणून.’’ मुक्ता बाईंच्या भूमिकेत शिरली होती.

‘‘आज एकदम शाळा शाळा खेळायची आठवण कशी काय झाली?’’ आजी अंदाज घेऊ लागली.

‘‘आज रतीताई शाळेत ‘बाई’ म्हणून शिकवणार आहे. म्हणून आम्ही घरी तोच खेळ खेळतोय.’’ – इति विराज.

‘‘अरे पण, तुमच्या वर्गात विद्यार्थी कुठे आहेत? या ‘ढ’  विद्यार्थिनीला यायचंय शाळेत. चालेल का तुम्हाला?’’ आजी स्वत:कडे बोट दाखवत म्हणाली.

‘‘आम्हाला चालेल. आम्हाला चालेल.’’ दोघांनीही खुदकन् हसून मान्यता दिली.

‘‘आपण असं करू या का मुक्ता, पहिला तास तुझा. त्यावेळी मी आणि विराज वर्गातली मुलं होतो, नंतर विराजचा तास. त्यावेळी आपण दोघी वर्गातली मुलं.’’ आजीने प्रस्ताव ठेवला.

‘‘पण शिकवावं लागेल हं आम्हाला काही तरी.’’ आजीने नाटक चालू केलं. ‘‘काय शिकवशील? पाढे शिकव नं, मला अगदी विसरायला झालं आहे.’’

‘‘चालेल. आपण दोनाच्या पाढय़ापासून सुरुवात करू.’’ मुक्ताने धावत अंकलिपीचं पुस्तक आणलं.

‘‘मुक्ता मॅडम, फळ्यावर लिहा नं.’’ आजीने जाणीवपूर्वक आग्रह केला. मुक्ताच्या आईच्या क्लासचा फळा भिंतीवर लटकवलेला होताच. खडूही होते. मुक्ताच्या पाढय़ांची गाडी मोठय़ा उत्साहात फळ्यावर धावू लागली. गाडी दहापर्यंत गेली. आपला हेतू साध्य झाला म्हणून आजीला जरा बरं वाटलं. मुक्ताने फळ्यावर दहाचा पाढा लिहिताना १ ते १० आकडे काढले आणि त्यावर शून्य देत गेली. आजीच्या हे लक्षात आलं. आजीच्या लक्षात आलं हे मुक्ताला कळलं.

‘‘असं कधीही काढायचं नाही.’’ मुक्ता मॅडमनी आपल्या बाईंचं सही अनुकरण केलं.

‘‘मी वाचू का?’’ म्हणत आजीने पाढे वाचायला सुरुवात केली. जाणूनबुजून चुकीचा अंक वाचला. मुक्ता मॅडमचं लक्ष आहे का याची चाचपणी ती करत होती; पण मुक्ता मॅडम जागरूक होत्या. आजीने पाहिलं, ती पाढे पुटपुटत होती. विद्यार्थ्यांची चूक दाखवत त्यांनी जोरात जमिनीवर पट्टी आपटली. तेवढय़ात विराजने हळूच शिपाई बनून तास संपल्याची घंटा वाजवली.

त्याला ‘सरांसारखं’ व्हायची अगदी घाई झाली होती. तो पटकन् पुस्तक उघडून उभा राहिला.

‘‘आता आपण इतिहासाचा धडा वाचू व त्याचे प्रश्न सोडवू.’’ एक परिच्छेद वाचून झाल्यावर स्वारी दमली. मुक्ता आता आजीच्या रांगेत बसली.

‘‘मुक्ता, आता तू वाच. मग आजी वाचेल.’’ विराजने सरांचं नेमकं अनुकरण केलं. आजीने थोडी मदत केल्यावर धडा एकदाचा वाचून झाला.

‘‘आता उद्या घरून प्रश्नांची उत्तरे लिहून आणा.’’ विराज सरांनी फर्मान काढले.

‘‘अहो सर, प्रश्न खूप अवघड आहेत. उत्तर सोडवून घ्या नं.’’ आजीने हळूच तक्रार केली.

विराज हुशार होता. कालच खऱ्या शाळेत बाईंनी धडा शिकवल्याचं तो बोलता बोलता बोलून गेला. त्यामुळे पानं उलटसुलट करत त्याने ‘सरां’च्या आविर्भावात पहिल्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. आजीला दुसराही प्रश्न अडला; पण मुक्ताने घाईघाईने उत्तर फोडून टाकले. आता तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आजीने पुन्हा मुद्दाम चुकीचे सांगितले. ‘विराज सर’ रागावले. आजीला उत्तर शोधून लिहिण्याची शिक्षा मिळाली. मुक्ताला आजीची दया आल्यामुळे ती मदतीला धावली.

आता विराज सरांचा ‘ऑफ पीरियड’ होता म्हणून मुक्ता मॅडम उभ्या राहिल्या.

‘‘आपण आता दूरदर्शनच्या पडद्यावर फिल्म बघू या बरं का! खोटी खोटी.’’

आजीमधला विद्यार्थी गोंधळला. याचा अर्थ काल खऱ्या शाळेत नक्की फिल्म दाखवली गेली असणार, हे तिने ताडले.

‘‘अहो मॅडम, कुठल्या विषयावरची फिल्म आहे ते सांगा नं.’’ – इति आजी.

‘‘अगं, भूकंप झाला की कशी गावंच्या गावं जमिनीच्या पोटात जातात. मग कधीतरी खोदकाम केलं की त्यावेळी खणल्यावर पूर्वीच्या लोकांची भांडी, मूर्ती, त्याचे अवशेष सापडतात.’’

‘‘मग हे गाव कुठलं आहे गं?’

‘‘हे मोहेंजोदडो आणि हडप्पा आहे. बघा कशा जुन्या वस्तू मिळताहेत ते.’’

दूरदर्शनच्या काचेत आपलेच चेहरे बघत आम्ही कल्पना करत होतो. फार वेळ या निर्गुणात रमणं कठीण होतं. त्यामुळे विराज सरांची मधेमधे बडबड सुरू झाली.

रोहित पक्षी खाडीवर कसे उडत येतात. काय खातात. कसे बरोबर त्या वेळीच येतात. त्यांचे उडताना पंख कसे हलतात, याचं प्रात्यक्षिक विराज सरांनी फिल्म पाहिलेली असल्यामुळे उडय़ा मारून दाखवलं.

सरांच्या उडय़ा थांबविण्यासाठी आजीने गोष्टीसाठी हट्ट केला. ‘‘सर, आता अभ्यास पुरे, गोष्ट सांगा की!’’

विराज सरांनी जरा विचार केल्याचं सोंग केलं. आणि मग ‘मोराचा रुसवा’ ही गोष्ट सांगितली.

‘‘आता मुक्ता, तू काहीतरी सांग बघू. तू आयत्या वेळच्या स्पर्धेत ‘माझी आजी’ या विषयावर बोलली होतीस ना ते सांग.’’ विराज सरांनी विद्यार्थिनीला उठवलं.

आजीच्या समोर आजीविषयी बोलताना मुक्ताला खूप गंमत वाटली. आजी गालातल्या गालात हसत होती.

शाळा सुटल्याची मोठ्ठी घंटा विराज सरांनी अगदी जोरात दोन पट्टय़ा आपटून दिली.

‘‘मुक्ता मॅडम, आम्हाला खूप भूक लागलीय. काहीतरी खायला द्या नं.’’ आजीने दोघांची नक्कल केली.

‘‘मुलांनी मॅगी सारखी खायची नसते; पण आजी, तू आज छान अभ्यास केलास म्हणून आजच्या दिवस तुला बक्षीस.’’ मुक्ताने चतुराईने मॅगी खायची संधी साधली.

‘‘मस्त हसतखेळत, नकळत अभ्यास झाला, नाही!’’ आजीला गुगल माहिती नसलं तरी तिने गुगली टाकली.

मॅगी खाण्याच्या नादात दोघांच्या कानांत ते शब्द शिरलेच नाहीत.

सुचित्रा साठे

suchitrasathe52@gmail.com

First Published on December 17, 2017 1:08 am

Web Title: suchita khare story for kids